Marathi Quote in Blog by Na Sa Yeotikar

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

आंब्याचे पान

हिंदू संस्कृतीमध्ये आंब्याच्या पानाला विशेष असे महत्व आहे. ज्या दोरीवर सर्व आंब्याची पाने एकत्र केली जातात त्यास तोरण असे म्हटले जाते. अगदी पुरातन काळापासून या आंब्याच्या पानाला घरच्या उंबरठ्यावरच्या दारावर जागा नेमून दिलेली आहे. हिरव्यागार लांब पानामुळे घराची शोभा आणखीन वाढीस लागते. तसे पाहिले तर निसर्गात अनेक झाडं आहेत आणि अनेक झाडांची पाने देखील आकर्षक आणि चांगली देखील आहेत तरी आंब्याच्या पानांची निवड शुभ कार्यासाठी केल्या जाते. लग्नाच्या आदल्या दिवशी वर आणि वधू च्या घरासमोर मांडव टाकल्या जाते. त्यासाठी याच पानांचा वापर केला जातो. फुलांच्या हारमध्ये देखील या पानांचा वापर केला जातो. या आंब्याच्या पानाला डहाळी देखील म्हटले जाते. तसं पाहिलं तर आंबा हा गुणकारी आहेच. खास उन्हाळ्यात आपण सर्वचजण आंब्याचा आस्वाद घेत असतो. आंब्यासोबत त्या झाडांची पाने देखील गुणकारी आहेत. या पानांच्या टोकात सी, बी व ए व्हिटॅमिन असते व त्यात अन्य पोषणमूल्येही आहेत. अँटी ऑक्सिडंट म्हणूनही ही पाने उपयुक्त असून ती पाण्यात उकळून अथवा चूर्ण स्वरूपात वापरता येतात. आंब्याची कोवळी पाने टॅनिनने युक्त असतात. डायबेटिसची सुरवात असेल तर ही पाने वाळवून पावडर करावी व पाण्यात रात्रभर भिजवून ती गाळून सकाळी हे पाणी प्यावे. त्याने मधुमेहाची लक्षणे कमी होतात, ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी, रक्तवाहिन्यांचे काठिण्य कमी करण्यासाठी ही पाने उपयोगी आहेत. मनात असलेली अस्वस्थता या पानांनी दूर करता येते. त्यासाठी अंघोळीच्या पाण्यात ही पाने टाकून त्या पाण्याने अंघोळ करावी. पित्तखडे अथवा मूत्रखड्याचा त्रास होत असेल तर पानांचे बारीक चूर्ण पाण्यात भिजवून रात्रभर ठेवावे व हे पाणी सकाळी प्यायलाने पित्तखडे, मूत्रखडे मोडतात व शरीराबाहेर पडतात. सर्व श्वासविकारांवर म्हणजे सर्दी, अस्थमा यावर पानांचा पाण्यात उकळवून केलेला काढा घेतल्याने बरे वाटते. त्यात थोडा मध घातला तर कफावर गुणकारी ठरतो. त्याने बसलेला आवाज सुटण्यासही मदत होते. अतिसार अथवा हगवण झाल्यास अथवा शौचातून रक्त पडत असल्यास सावलीत वाळविलेली पाने पावडर करून दिवसातून दोन ते तीन वेळा पाण्याबरोबर घ्यावी. कानदुखीचा त्रास होत असेल तर पानांचा रस काढून चमचाभर रस कानात थेंबथेंब टाकत रहावा. कानात घालताना हा रस थोडा कोमट करून घालावा. भाजल्याने झालेल्या जखमा आंब्याच्या पानांची जाळून राख करून ती जखमांवर लावल्याने लवकर भरून येतात. या राखेमुळे त्वचा गार राहते. उचक्या लागत असल्यास अथवा घशाचा त्रास होत असल्यास ही पाने जाळून त्याचा धूर श्वासमार्गे आत ओढावा. पोट स्वच्छ व हलके राहण्यासाठी एका झाकणाच्या डब्यात पाने पाण्यात टाकून झाकण लावावे व रात्रभर ते तसेच ठेवून सकाळी गाळून हे पाणी अनशा पोटी प्यावे. हा उपचार नियमाने केल्यास पोटाचे त्रास होत नाहीत. असे हे गुणकारी आंब्याचे पान आहे. तेंव्हा आपल्या घरात फक्त सणासुदीलाच नाही तर आयुर्वेदिक म्हणून या पानांचे स्वागत करू या.

संकलन :- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड

Marathi Blog by Na Sa Yeotikar : 111620413
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now