एक कप चहा
प्रिय चहा
चहा या दोन अक्षरी शब्दांत खूप मोठी ताकत आहे. कारण या चहामुळे दोन मनाचे मिलन होते, थोडावेळ एकमेकांना बोलता येते, कितीही घाईत असलो तरी चहा घेण्यासाठी थोडा वेळ विश्रांती नक्की मिळते. चहाला इंग्रजीत टी असे म्हणतात तर हिंदीत चाय म्हटले जाते. तसे हिंदीत एक गाणं सुद्धा खूप प्रसिद्ध आहे, शायद मेरी शादी का खयाल दिल में आया है, इसिलिए मम्मीने मेरे तुमहें चाय पे बुलाया है। आज ही प्रथा कायम आहे की, मुलगी बघायच्या कार्यक्रमात पोहे खाणे झाल्यानंतर नवरी मुलगी हातात चहाचा ट्रे घेऊन येते आणि आपला परिचय देते. बऱ्याच कामासाठी चहा हे एक निमित्त म्हणून त्याचा वापर केला जातो. एखाद्या ठिकाणी काही सौदा किंवा व्यापार झाला म्हणजे लगेच तोंड गोड करण्याची प्रथा असते. चहा हे एक गोड पेय, त्यामुळे सर्वजण चहा घेतात. दोन मित्र बाजारात खूप दिवसांनी वा काही तासानंतर असो त्यांची भेट झाली की, पहिलं वाक्य, चल एक कप चहा घेऊ. चहा पिता पिता मग खूप गप्पाटप्पा, अनेक विषयांवर चर्चा होते. याच दरम्यान गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या गप्पा रंगतात. म्हणून काहीजण खास करून टी पार्टी आयोजित करतात, चाय पे चर्चा करण्यासाठी. म्हणजे येथेही चहा हे एक निमित्त असते. तेच जर मित्राने चहा पिऊ असं म्हटलं नाही तर तो चारचौघात सांगतो त्याने मला साधं चहा सुद्धा विचारलं नाही. घरी नातलग किंवा पाहुणे आले की चहा विचारावं लागते आणि चहा पाजवावे लागते. नाहीतर समाजात साधी चहा देखील दिली नाही म्हणून आपली खूप बदनामी होते. घरी आलेल्या नातलगांची सरबराई करण्याचे प्रमुख साधन म्हणजे चहा. सकाळ व सायंकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात चहानेच होते. लहानपणी कपबशीचा आवाज आला की जाग यायची, कधीकधी चहाचा वास देखील नाकात जायचं आणि मग जाग यायचं. पावसात भिजून आल्यावर आणि हिवाळ्याच्या थंडीत गरम चहा खूप चांगले वाटायचे. चहामुळे तरतरी येते, सर्व काही योग्य होते, असे मनाला वाटते.
दुधाची चहा आणि काळी चहा असे चहाचे प्रामुख्याने दोन प्रकार मोडतात. दुधाच्या चहात साखर, चहापत्ती आणि दूध एकत्रित गरम केल्या जाते तर काळी चहा म्हणजे डिकाशन चहा यात दूध नसते. पण ही चहा दुधाच्या चहापेक्षा चांगली असते. या डिकाशन चहात आद्रक, दालचिनी आणि तुळशीची पाने टाकल्यास ते खूप चांगले वाटेल. लहान मुलांनी शक्यतो चहा पिणे टाळावे असे घरातील वडीलमंडळी म्हणतात मात्र लहान मुलांना दुधापेक्षा चहा पिणे खूप आवडते. सकाळचा चहा आणि पेपर याचे अतूट नाते आहे. चहाविना पेपर वाचावे वाटत नाही आणि पेपरविना चहा प्यावे वाटत नाही. चहा आणि बिस्कीट याचे नाते देखील असेच आहे. काही मंडळी चहासोबत पाव म्हणजे ब्रेड किंवा खारी असे पदार्थ देखील खातात. जेव्हा खूप काम करून जरासा थकवा जाणवायला होते त्यावेळी चहा पिण्याची ईच्छा निर्माण होते. माणसाला स्वयंपाकातले कोणते पदार्थ तयार करता येवो किंवा न येवो मात्र चहा करता आले पाहिजे. नाही तर मित्रांमध्ये आपले हसे होते आणि मित्र म्हणतात, तुला, साधी चहा करता येत नाही. स्वयंपाक शिकण्याची पहिली पायरी म्हणजे चहा करता येणे.
चहाचा शोध कसा लागला असेल ? हे एक संशोधन करण्याची बाब आहे. एक व्यक्ती झाडाखाली पाणी उकळत ठेवला होता तेव्हा वरून झाडाचे एक पान त्या उकळत्या पानात पडले तेव्हा त्या पाण्याला त्या पानाचा वास आला. त्याने ते पिऊन बघितले तर त्याचा थकवा दूर झाल्याचे जाणवले. मग त्यांनी त्या पानाचा भारतात प्रसार आणि प्रचार केला.
- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769