#ठेवा
संस्काराचा ठेवा
आज आपण जे जीवन जगत आहोत ते आपल्या पूर्वजांच्या अमूल्य अशा ठेवीवरच. आपल्या लेकरांचे आयुष्य सुखी समाधानी व्हावे म्हणून बहुतेक जण बँकेत पैश्याची ठेव ठेवतात. त्यामुळे त्यांना वाटते की, आपल्या पुढील पिढीला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्याचसोबत दुसरे काहीजण असतात जे की आपल्या पिढीला पैश्यांची ठेव न ठेवता संस्काराची ठेव देतात. पैसा आज आहे उद्या नाही, पण संस्कार न संपणारे असते. पैश्यामुळे भावा भावात किंवा नातलगात भांडण होतात, वाद होतात. काही वाद तर कोर्टात देखील गेल्याचे ऐकण्यात येतात. ज्यांना वाटते की जीवनात पैसा हेच सर्वस्व आहे, ते मुळात खूप चुकीचे आहे. आपण पैसा ठेवून जातो म्हणजे आपल्या पाल्याना आळशी बनवीत नाही हे कशावरून ? त्याउलट जर आपल्या मुलांना एक रुपया कमावण्याची शिकवण दिली तर जास्त योग्य राहील. यासाठी एक छोटी गोष्ट नमूद करावे वाटते. एक माणूस संताकडे जीवनाचे शिक्षण घेण्यासाठी जातो. तेंव्हा तो संत त्या माणसाला एक रुपया आणण्यास सांगतो. तो आपल्या घरी जातो आणि बाबांकडून एक रुपया घेऊन येतो. संत त्याला तो रूपाया विहिरीत टाकायला सांगतो. तो मागेपुढे विचार न करता रुपया विहिरीत टाकतो आणि घरी जातो. असेच काही दिवस उलटतात. एके दिवशी त्याला घरातून एक ही रुपया मिळत नाही तेंव्हा तो कुठं तरी काम करतो, एक रुपया कमावतो आणि संताकडे जातो. यावेळी देखील संत त्या व्यक्तीला तो रुपया विहिरीत टाकण्यास सांगतो. दरवेळी मागेपुढे विचार न करता विहिरीत रुपया टाकणारा व्यक्ती आज विहिरीत टाकण्यास नकार देतो. यावर संत त्याला शिकवण देतो की, फुकट मिळणाऱ्या वस्तूला आपण कधीच किंमत देत नाही. आपण कमावलेल्या वस्तूचे मोल आपल्याशिवाय कोण जाणू शकतो. ही शिकवण म्हणजे संस्काराचा ठेवा घेऊन तो व्यक्ती जीवनात अपार कष्ट करतो आणि यशस्वी होतो. असे अनेक प्रकारची शिकवण आपणांस आपल्या वाड वडिलांकडून मिळालेली असते. त्याचे जतन करून पुढील पिढीला संक्रमित करणे आवश्यक आहे.
- नासा येवतीकर, 9423625769