मराठीच्या वापरास स्वतःपासून सुरवात करू या
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध कवी वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस. मराठी राजभाषा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जात आहे. कोणतीही भाषा हे आपले विचार व्यक्त करण्याचे एक साधन असते. जगामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. प्रत्येकाची भाषा वेगवेगळी असते. प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान असतो. त्यामुळेच शैक्षणिक क्षेत्रात देखील प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा अशी रचना केलेली आपणास पहावयास मिळते. भाषा हे संपर्काचे सर्वात उत्तम साधन मानले जाते.
मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, जर्मन, पाली, तमिळ, कन्नड आशा विविध भाषा विविध प्रांतात बोलल्या जातात. प्रत्येक भाषेला एक विशिष्ट प्रकारचा गोडवा असतो. जीवनात जेवढ्या जास्त भाषा अवगत असतील तेवढी ती व्यक्ती प्रगल्भ विचारांची असते असा एक समज आहे. भाषेचा व्यक्तिमत्व जडणघडणीवर परिणाम होत असतो. समजा जगात कोणतीच भाषा अस्तित्वात नसती तर आपण विचारांचे आदान प्रदान कसे केलें असते. पूर्वीचे मूक चित्रपट आठवा. म्हणजे भाषेचे महत्व पटेल.
आज हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे आज जागतिक मराठी भाषा दिन. जेष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस.अन्य सर्व भाषा पहिल्या तर मराठी भाषेला जो गोडवा आहे तो अन्य भाषेला नाही हेच आपणास दिसून येते. मराठी भाषेत जेवढा शब्द संचय आहे तेवढा अन्य भाषेत कदाचित नसेल. मराठी भाषा पावला पावलावर बदलते असे म्हणतात. त्यातही अनेक उपप्रकार आपणास पहावयास मिळतात. काही काही शब्द तर केवळ मराठी भाषेतच पहावयास मिळतात. या भाषेला एक समृद्ध असा वारसा लाभलेला आहे.
अन्य भाषांच्या अतिक्रमणामुळे मराठी भाषेच्या अस्तित्वाचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. भाषांची कितीही आक्रमणे झाली तरी नराठी भाषेला स्थिरत्वाचा कोणताही धोका नाही. काहीजण मराठी भाषा वाचवा असा टाहो फोडून अकारण भाषा अस्तित्वाची भीती दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या संतांनी भाषेला एक वेगळा आकार दिला आहे.एखाद्या राज्यात ज्यावेळी एकापेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात त्यावेळी भाषिक स्पर्धा सुरू होते. विचारांच्या मताच्या देवाण घेवाणीत भाषीक सरमिसळ होते. त्यामुळेच मराठीवर इंग्रजीचे अतिक्रमण होताना दिसते.त्यामुळेच तर आपण मराठी ही अभिजात भाषा करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहोत.
आणखी एक गोष्ट म्हणजे कोणत्याही भाषेची सक्ती करुन ती भाषा अस्तित्वाच्या वृष्टीने जतन करता येत नाही. एखादी विशिष्ठ भाषाच बोलली पाहिजे असा आग्रह आपण धरू शकतो मात्र सर्व त्या मार्गांचा अवलंब करुन आपण सक्ती करू शकत नाही. त्यासाठी त्या भाषेची आस्था प्रेम मनात असावे लागते. मी मराठीचा कट्टर पुरस्कार करणारा असेन तर माझ्या लिखाणात एखादा जरी इंग्रजी शब्द वापरात आला तरी मला त्याची सतत टोचणी लागून राहिली पाहिजे.
शालेय स्तरावर मराठीचाच वापर करणे, सर्व व्यवहारांची भाषा मराठी करणे, सर्व परिपत्रके मराठीतून काढणे, सर्व फलक मराठी भाषेतच लावणे, सर्व परीक्षांचे माध्यम मराठी ठेवणे, मुलाखती मराठीतून घेणे आशा काही उपाय योजना करण्याची गरज आहे. आमचे किती साहित्यिक अन्य भाषिक शब्दांचा वापर न करता केवळ मराठीतून त्यांचे विचार व्यक्त करतात.इंग्रजी माध्यमाचा वापर करणे ही एक फॅशन बनत चालली आहे. ती वेळीच रोखली पाहिजे. आपण घरात देखील बोलताना जाणीवपूर्वक इंग्रजी शब्दांचा वापर टाळला पाहिजे. मार्केट ऐवजी बाजार, टी च्या ऐवजी चहा, ब्रेकफास्ट ऐवजी न्याहरी, टिफिन ऐवजी जेवणाचा डबा, लव्ह ऐवजी प्रेम, फँक्शन ऐवजी कार्यक्रम, बर्थ डे ऐवजी वाढदिवस असे मराठी शब्द वापरा. सुरवात आपण करु या. दुसऱ्यांना उपदेश करण्या पेक्षा स्वतः कृति करू या. मराठी भाषेविषयी कृतज्ञता व्यक्त करू या. मराठी भाषेचा अभिमान बाळगू या.
प्रदीप जोशी, मुक्त पत्रकार, मोबाईल क्रमांक 9881157709