स्मशानभूमी बदलत आहे वैकुंठधाम मध्ये...
स्मशानभूमी अलीकडच्या काळात वैकुंठ धाम या नावाने ओळखली जाते. गावात स्वच्छता अभियान सुरू झाले अन गावाचा चेहरा मोहराच बदलून गेला. गावोगावच्या स्मशानभूमी देखील त्याला अपवाद राहिल्या नाहीत. तेथे देखील आता अध्ययावत कमानी झाल्या आहेत.स्मशानभूमी भिंतीवर व फलकावर मृत्यूवर आधारित साहित्य वाचायला मिळत आहे. माणस बागेत फिरायला रोज जातात मात्र जवळचे कोणी मरण पावले किंवा मरणोत्तर विधी असला तरच स्मशानभूमीत पाऊल टाकतात. तेथील शांतता एकांतपणा हा अन्यत्र कोठेही पहावयास मिळत नाही.
पूर्वी गावाच्या बाहेर, ओढा किंवा नदीजवळ उघड्यावर अंत्यविधी केले जात असत. धगधगती चिता पाहून अक्षरशः भीती वाटत असे. पूर्वी स्मशानभूमी हा शब्द देखील भयावह वाटत होता. आज वैकुंठ धाम शब्द वापरताना भीतीचा लवलेश देखील वाटत नाही. आजची वैकुंठधाम बंदिस्त आहेत. पालिका किंवा महापालिका त्याची देखभाल करतात. ती इतकी आकर्षक झाली आहेत की अगदी फिरायला गेल्यासारखा माणूस तेथे जात आहे. गर्द झाडी, बसायला बाक, पाण्याची भरपूर उपलब्धता, विद्युत दाहिनी, अंत्यसंस्कार साहित्य, आदी सुविधा झाल्या आहेत. मरणाची भीती वाटू नये म्हणून भिंतीवर मानसिकता बदलणारे मजकूर लिहले आहेत. वैकुंठधाम प्रवास, प्राण घेण्यासाठी रेड्यावर बसून येणारा यम अशी चित्रे आहेत.
मृत्यू समान आहे तो सर्वांना सारखा आहे या सारखी वाक्ये मृत्यू बाबतची भीती दूर करतात. एका स्मशानभूमीत ( वैकुंठधाम) एक फलक पहावयास मिळाला त्यावर लिहले होते की मृत्यू हा महान आहे. सर्वांसाठी समान आहे. राजा असो व रंक, त्याला निसर्गाचे दान आहे. मृत्यूने परिवर्तने घडतात. शत्रू सारे मित्र बनतात. कालचे शिव्याशाप देणारे आज डोळे भरून रडतात. तोंड फिरवणारे सारे रांगेत येऊन दर्शन घेतात. नरकाची इच्छा धरणारे स्वर्गासाठी साकडे घालतात. छातीला छाती भिडवणारे खांद्यांसाठी पुढे धावतात. जीव घेण्यास आसुसलेले पुढे होऊन फुले वाहतात.मृत्यू समोर माना वाकतात, मान देण्यास संगिनी वाकतात. मृत्यू हा अटळ असतो म्हणून तो सत्य असतो. जीवनात काही मिळो वा ना मिळो मृत्यू सर्वांना मिळतो.
वैकुंठधाम मधीक वातावरणच काहीसे वेगळे असते. एका बाजूला रोज कोणाची तरी चिता पेटलेली असते. दुसऱ्या बाजूला कोणाचा तरी दशक्रिया विधी चाललेला असतो. दोन्ही दुःखाचे प्रसंग मात्र त्याची तीव्रता वेगवेगळी. पहिल्या विधीसाठी कोणताही काळवेळ नसतो तर दुसऱ्या विधीसाठी बारा वाजण्याची वेळ ठरलेली. हे दोन विधी जरी स्मशानभूमीत केले जात असले तरी ते एकाच ठिकाणी नसावेत असे मला वाटते. पुरुष, स्त्रिया, लहान मुले यांच्या मानसिकतेचा विचार करायला हवा.
प्रदीप जोशी मुक्त पत्रकार, मोबाईल क्रमांक 9881157709