#काव्योत्सव -२ (सामाजिक)
ती आवरत होती,
तिचं दुकान.
दुकान म्हणजे काय -
रस्त्याच्या कडेला
विकायला ठेवलेल्या - मेणबत्त्या.
मी सहजच म्हणालो,
'काय, चांगली दिसतेय विक्री सध्या,
निघतच असतो हल्ली,
कुठे ना कुठे - कँडल मार्च'
तशी कसनुसं हसत ती म्हणाली,
'व्हय, बरं चाललंय,
पन राती वाडूळ न्हाई थांबता येत,
लेक दुसरीला हाय,
एकलीच असती घरी.
काळजी वाटती...'
-नागेश./20418