ती शांत वाहत होती...
तळाशी साचलेले लपवत होती
अडथळे वाटेतील चुकवत होती
चांगले वाईट सामावून स्वतःमध्ये
आजही ती....शांत वाहत होती.
माता म्हणून कधी मिरवायची ती
अभक्षासही सहज जिरवायची ती
कुणीही यावे अंतरंग ढवळावे,
पाण्यात आसवांना वाहवायची ती.
किती अतिक्रमणे किती बांध
लुटले किती परी फुटला ना बांध.
सहज सोसते आल्या महापूरा
स्मरूनि शिक 'सुख समजून नांद'
अलिकडे जरासा कोरडेपणा मनात
अंतरी उमाळा परी तिष्ठावे किती उन्हात?
तिही शिकलीय बांध घालाया परी..
वळीव एखादा घेऊन घुसते अंगणात...
© संजय गुरव ( सदासन)