न्याय
न्यायालयात खच्चून गर्दी होती. आरोपीच्या पिंजऱ्यात एक सत्तरीचा वृद्ध आपल्या आठ वर्षाच्या नातवाला घेवून थरथरत उभा होता. “ भिऊ नका आजोबा, मी तुमच्या वर अजिबात अन्याय होऊ देणार नाही” न्यायाधीशांनी त्यांची अवस्था बघून त्यांना दिलासा दिला व आरोप काय असे सरकारी वकिलास विचारले.
”मिलॉर्ड, यांना बेकरितून पाव चोरतांना प्रत्यक्ष पकडले आहे”.
“आजोबा, हे खरे आहे?”
“खरे आहे”आजोबा कापऱ्या स्वरात म्हणाले.
“का बरं” न्यायाधीशांनी विचारले.
“काय करू बाबा, दोन दिवसापासून उपाशी होतो,खिशात एक पैसा नव्हता.पावाचा वास आल्यावर नाही रहावलं म्हणून”.
“पुरे झाले,मला कळले तुम्हाला काय म्हणायचे आहे ते. तुमच्याजवळ पैसे असते तर तुम्ही नक्कीच असे केले नसते.पण काही झाले तरी हा गुन्हाच आहे म्हणून मी तुम्हाला १०० रुपये दंड ठोठावित आहे. क्षणभर थांबून ते पुढे म्हणाले “ पण तुमची एकूण परिस्थिती बघता तुमचा दंड मीच भरीत आहे”.
नंतर उपस्थित लोकांकडे एक नजर टाकत ते म्हणाले “ आपण सर्व समाजाचे मान्यवर घटक आहात आपल्या समाजव्यवस्थेत नक्कीच काही त्रुटी आहेत त्यामुळेच या सत्तरीच्या वृद्धाला पोटासाठी चोरी करावी लागते. अप्रत्यक्षपणे आपण सर्व याला जबाबदार आहात म्हणून आपणा सर्वांना प्रत्येकी १०० रुपये दंड ठोठावण्यात येत आहे. जमा झालेली सर्व रक्कम आजोबांना देण्यात येईल”.
बघता बघता ५०००रुपये जमा झाले ते आजोबांना देत न्यायाधीश दयाद्र अंतःकरणाने म्हणाले “आजोबा मला माफ करा.मी तुम्हाला पूर्ण न्याय देऊ शकलो नाही.या पैशाने तुमचे फारतर दोन महिने सुखात जातील”.
तेवढयात बेकरी मालक उभे राहून म्हणाला “ महाराज,आजोबांची हरकत नसेल तर त्यांनी माझ्याकडे चौकीदार म्हणून काम करावे”.
त्याचे बोलणे संपताच लगोलग एक श्रीमंत कापड व्यापारी उभे राहून म्हणाला “मी त्यांच्या नातवाच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेतो”.
न्यायाधीशांच्या डोळ्यात आनंदाश्रु आले व ते म्हणाले “ आता न्याय पूर्ण झाला”.