?"फोन"?
आजच्या युगात अविभाज्य घटक झालाय हे खरंय..बाय द वे फोन मीन्स 'स्मार्टफोन' बरं का, टेलिफोन नाही!! माणसं स्मार्ट असोत वा नसोत, फोन स्मार्ट असणं आवश्यक झालंय.?
'खिडक्या,यंत्रमानव….' असं वरवर अर्थहीन वाटणारं नाव वाचून स्मार्ट लोकांना लिखाणाचा विषय लक्षात येईलही. पण जे स्मार्ट नाहीयेत (नथिंग पर्सनल बरं का!!?)
त्यांच्यासाठी थोडं स्पष्टीकरण- स्मार्ट फोनची दिवसेंदिवस वाढणारी बाजारपेठ सध्या चार मुख्य प्रकारच्या फोन्सनी व्यापली आहे!
खिडक्या -'विंडोस' फोन,
यंत्रमानव -'ऍन्ड्रोइड फोन्स,
सफरचंद - 'ऍपलचा iफोन' (न्यूटनचं सफरचंद नाही स्टीव्ह जॉब्सचं)
काळबेरं - ब्लॅकबेरी
फोनसाठी वापरलेला प्रतिशब्द आहे (या फळासाठीचा मराठी प्रतिशब्द कुणाला माहित असल्यास सांगावा). सहा-सात वर्षांपूर्वी भारतात फार थोड्या लोकांकडे नोकियाचा ९३०० अर्थात कम्युनिकेटर असायचा (आत्मस्तुती: माझ्याकडे पण होता). आपल्याकडे वापरला गेलेला तो पहिला स्मार्टफोन…पण तो स्मार्टफोन कमी आणि 'शोफोन' जास्त होता कारण त्याचा वापर दिखाव्यासाठीच जास्त करायाचो. या फोनचे व्यावहारिक,तांत्रिक फायदे कुणी घेतलेले मी ऐकले नाहीयेत किंवा त्याच्यासाठी आवश्यक तंत्रज्ञानसुद्धा तेव्हा उपलब्ध नव्हतं (इंटरनेट, थ्रीजी, वाय-फाय वगैरे). मग साधारण २००८ च्या आसपास स्मार्टफोनचा गवगवा सुरु झाला. मोबाइल फोन ही गोष्ट एव्हाना कॉमन झाली होती पण आयफोन प्रकार नवीन होता. स्टीव्ह जॉब्सने "मोबाइल फोन निव्वळ बोलण्यासाठी नसतो आणि त्याचा वापर इतर गोष्टींसाठी व्हायला पाहिजे! फोन जीवनशैलीचा भाग व्हायला हवा" असं विधान
आयफोनसंदर्भात केल्याचं वाचलेलं आठवतंय! मला जेव्हा पहिल्यांदा आयफोनच्या तंत्रज्ञानाबद्दल कळलं तेव्हा मला त्याचं अजिबात कौतुक वाटलं नव्हतं..कारणं पुन्हा एकदा- फोन वापरायला आवश्यक तंत्रज्ञानाचा अभाव आणि अवाजवी किंमत! माझ्या दृष्टीने तेव्हा नोकियाचे चांगले कॅमेरे असणारे किंवा सोनीचे गाणी ऐकायला बनवलेले फोन्स ही मोबाइल विषयक अपेक्षांची लिमिट होती! मग शिक्षणानिमित्त दौंड ला आलो आणि स्मार्टफोन लोकांच्या जीवनशैलीचा भाग होताना पाहिलं. सगळ्यांनी घेतला म्हणून, स्वस्तात मिळतोय म्हणून, गरज आहे म्हणून अशी वेगवेगळी कारणं स्वतःलाच देत शेवटी स्मार्टफोन घेतला आणि स्टीव्ह जॉब्सला मनातल्या मनात नमस्कार केला....?
#HeartBucket