बी.एड्.फिजीकल,कांदिवली भाग२१
दुसरा मित्र राऊळ सावंतवाडी जवळ नेमळे हायस्कूलला, चावरेकर रत्नागिरीला शिर्के हायस्कूलला, आणि लिमये नाणिज हायस्कूलला शिक्षक होते. मी राजापूर तालुक्यातली हेडमास्तरची पोस्ट सोडून देवगड बी. एड्. कॉलेजला प्राध्यापक पदावर गेलो. त्यामुळे प्रभू नी राऊळ यांच्याशी माझा कायम संपर्क राहिला. राऊळ नेमळे हायस्कूलला होता. सावंतवाडीकडे खेप झाली की मी आवर्जून नेमळ्याला जावून त्याला भेटत असे. प्रभू बी.एड्. झाल्यावर त्याला गावातच मुणगे हायस्कूलमध्ये जॉब मिळाला. शेवटच्या टप्प्यात तो हेडमास्तर झाला. तेव्हा मी त्यांच्या ग़ॅदरिंगला चीफ गेस्ट म्हणून गेलो होतो. मध्यंतरी एकाविवाह सोहोळ्याच्या निमित्ताने कुरुंदवाडला दमित्री जोशी मेडिकल वाल्यांकडे गेलो होतो. या गावचा फडणीस माझ्याबरोबर कांदिवलीला होता असं मी म्हटल्यावर त्यांची मिसेस बाहेर गेली. दोन मिनिटात तात्या फडणीस दत्त म्हणून माझ्यासमोर येवून उभा राहिला. जोशींच्या शेजारचा वाडा फडणीसांचा. दीड- दोन तास मनमुराद गप्पा झाल्या नी मीअगदी नाइलाजाने जायला निघालो. फाडणीसचा आग्रह मोडून जाणं माझ्या अगदी जीवावर आलेलं होतं.पण त्यावेळी मला थांबणं शक्य नव्हतं. दोन वर्षापूर्वी अगदी अकल्पितपणे प्रभू या जगातून गेला. वर्षभरापूर्वी तात्या फडणीसही गेला. अर्थात तात्याच्या मृत्युची बातमी मला नुकतीच, ही धारावाही मालिका लिहून झाल्यावर दहा मार्च २०२५ ला समजली. अजूनही बी.एड्.च्या आठवणी आल्या की मला प्रकर्षाने दोघांचीही आठवण येते.
गेली पाच वर्षं गाव सोडून मी वारजे -पुणे येथे स्थायिक झालो आहे. प्रभू गेल्यावर मी एकदा पुणे देवगड रातराणीने गावी जात होतो. कात्रजला एक गृहस्थ गाडीत चढले. माझ्या शेजारची सीट मोकळीच होती तिथे ते बसले. पाच मिनिटानी आमची बोलाचाली सुरू झाली त्यांच नाव कांबळे. तेही शिक्षक असल्यामुळे अगदी मोकळेपणी गप्पा सुरूझाल्या. माझी पदवी विचाल्यावर ते म्हणाले, “कांदिवलीचे बी एड्. का? किती साली होतात?”मी बोललो “७८मध्ये.” ते त्यावर म्हणाले,“मी शेवटच्या ७९च्या बॅचचा. आम्ही डिग्री घेवून कॉलेज बंद पाडूनबाहेर पडलो.” मला काय बोलावं तेच सुचेना. आता बॅचमेट असल्यासारख्या जुन्या आठवणी निघाल्या. दोघानीही सोबत डबे घेतलेले होते. माझी सून प्रवासात जास्तीचे जिन्नसदेते. चार थालीपीठं होती. त्यानी पुऱ्या बटाटा भाजी आणलेली होती. त्याना ब्राह्मणी पद्धतीची गूळ घातलेली थालिपीठं म्हणजे जीव की प्राण. मी सगळा डबा त्याना दिला.मलाही त्यांच्या कडचा पुरी भाजी हा आवडता मेन्यू मिळाला . जेवल्या नंतर त्यानी जी माहिती सांगितली ती ऐकून मी अक्षरश: थिजून गेलो.
कांबळेना बी.एड्. फिजीकल केल्यावर कांदिवलीतच के.इ. एस. मध्ये जॉब मिळाला. ते आपला परफॉर्मन्स मेन्टेन करण्यासाठी रोज संध्याकाळी डोंगरीतून वरहोवून कॉलेजच्या गेट समोरून स्टेशनकडे जावून राऊण्ड पुरा करून रूमवर जात. ते बाहेर पडल्यावर अॅडमिशन बंद झाल्या. कॉलेज फक्त कागदावर नी सगळा स्टाफ फक्या मारीत बसून पगार घेत होता.मग कोणाकोणाला केडर प्रमाणे सामावून घेणात आले नी तीन शिफ़्टना तीन वॉचमन, क्लार्क नी प्रशासक एवढीच माणसं उरली. ४/५ वर्षाच्या काळाततीन प्रशासक बदलले. एक महाभाग भलताच बिलींदर निघाला. त्याने रिकामपणाचा चांगला उपयोग करून घेतला.दरडी खणून डंपिंग वाल्यांना आणि बिल्डर्सना माती विकायचा उद्योग सुरू केला. प्रिमायसेस मध्ये शेकडो उंच उंच डेरेदार वृक्ष होते. काही वृक्षांची खोडं दोघांच्या कवेत मिळणार नाहीत एवढी मोठी. पण शोध घेतला असता कागदोपत्रीच्या नोंदींपेक्षा प्रत्यक्षात तिप्पट चौपट झाडं होती. दरवर्षी नव्याने वाढलेल्या कित्येक झाडांची रेकॉर्डला नोंदच नव्हती हे त्या चाणाक्ष माणसाने अचूक ओळखलेलं. विद्यापीठ, शासन यांच्या कित्येक फिजीकल व्हेरिफिकेशन कमिट्या आल्या नी पार्ट्या खावून गेल्या. वाढत जाणाऱ्या मालमत्तेची पडताळणी करून नोंद करायची असते हे काम झालंच नाही. जी झाडं नोंद केलेली होती ती नेमकी कोणती, त्यांची मोजमापं, नेमकी स्थानं रजिस्टरला दाखलच केलेली नव्हती. त्या बेरकी माणसाने यागोष्टींचा अभ्यास करून मोडस ऑपरेण्डी निश्चित केली. मोठमोठ्या झाडांची बेछूट कत्तल करून, क्रेनने मोठ मोठ्या कण्टेनरवर चढवून लंपास करण्यात आली. मूळं खणून- उखडून काढून कटाईचे पुरावेच नाहिसे करण्यात आले. माती आणि झाडं विक्रीचं काम कित्येक महिनेअगदी राजरोसपणे निरंतर सुरू होतं.
बिल्डर लोकानी डम्पिंगसाठी तिथल्याडेगा, दरडी खणून हजारो डंपर भरून माती लंपास केली. तो गव्हर्नमेण्ट रिस्ट्रिक्टेड एरिया असल्याने ना कोणी याची दखल घेतले, नाकाही तक्रार केली. कांबळे रपेट मारायला जात तेव्हा कायम पाच सहा डंपर, कण्टेनर जा ये करताना दिसत. ते कित्येक महिने ही लूट उघड्या डोळ्यानी पहात होते. जवळ टाईम्स ऑफईण्डिया सारखी अग्रणी वृत्त संस्था २४ तास कार्यरत असून त्यानाही या बेकायदेशिर कृत्यांचा सुगावा लागला नाही.त्या कोणा नशिबवान प्रशासकाचे भाग्यच फ़ळफ़ळले. तिथल्या वॉचमन, कारकूनाला चिरीमिरी मिळाली असेल तेवढीच.बाकी करोडोची माया एकट्याच्या खिशात गेली.प्रिमायसिस मधून डंपर बाहेर पडल्यावर बाहेरच्या पोलिस आर.टी.ओ वगैरेना मॅनेज करायची जबाबदारी लाकूड, माती नेणारानी करायची असे. शेवटच्या टप्प्यात हाभ्रष्टाचार आहे.... या बाबी अवैध आहेत हे अगदी उशिराने तिथल्या नगर सेवकाच्या लक्षात आल्यावर थोडीफार बोंब झाली.
या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात लूट नेमकी किती झाली हे करणारा पण सांगू शकला नसता. जुजबी चौकशीचा फार्सही झाला. समितीला भ्रष्टाराचा कोणताही ठोस पुरावा सापडला नाही. कारण मुळात काय होते याचीच नोंद अपूर्ण होती. मग काय गेले नी किती गेले याची
मोजदादच कोण कशी करणार? कमिटीला मॅनेजकरून अधिक बभ्रा होवून प्रकरणअंगलट येण्या आधीच मंत्रालयातल्या उच्चपदस्थांच्या अंगावर चार तुकडे फेकून त्यांचे भुंकणे बंद करून स्वत:ची बदली करवूनघेवून तो प्रशासक सहीसलामत निसटला. नंतर तो एरिया सील केलेला होता. या ठिकाणी भारतातली एक अग्रगण्य क्रीडा संस्था जिने क्रीडा जगतात क्रांतीकारी पर्व सुरू केले, जिथून असंख्य क्रीडाप्रशिक्षक बाहेर पडले, आणि जिचं नाव क्रीडा क्षेत्रातच नव्हे तर शिक्षणक्षेत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरानी लिहीलं जायला हवं होतं त्या संस्थेबद्दल चिटकोरभर माहितीही गुगलवर मिळत नाही हा त्याहूनही मोठा दैवदुर्विलास आहे.
कांदिवली कॉलेजने मला काय दिलं? या प्रश्नाचं उत्तर शोधायला लागल्यावर माझे डोळे पाण्याने भरून येतात.तिथल्या १०० लोकांच्या बॅच मध्ये मी सगळ्यात किरकोळ देहयष्टीचा. त्यामुळे सुरुवातीला‘ह्ये हितं मरंल’ असं म्हणणाराना लेसन सुरू झाल्यावर मी माझा वकूब दाखवून त्यांची बोलती बंद करून दाखवली . अर्थात या साठी लागणारी जिगर मी कांदिवलीत शिकलो. कितीही परखड परिस्थिती असली तरी न डग़मगता राहून आपलं इप्सित हासिल करायचं. परिवर्तन हा सृष्टीचा स्थायी भाव आहे या गीतेच्या तत्वज्ञानाचा मतितार्थ मला खऱ्या अर्थाने कांदिवलीतउमगला. सुबत्तेपेक्षाही प्रतिकूल परिस्थिती माणसाला खंबीर बनवते.परिस्थितीचं आव्हान सांभाळून ज्याने यश मिळवलेलं आहे असा मनुष्य आयुष्यात कधिच कुणापुढेही हार पत्करीत नाही हे माझं प्रांजळ मत आहे. हे मत म्हणजे स्वानुभवातून स्फुरलेलं निखळ तत्वज्ञानआहे. येणारी पहाट सुवर्णदीप प्रज्वलीत करून माझं औक्षण करणार आहे हा आशावाद कांदिवलीने माझ्या मनात जागवला. दुर्दम्य इच्छा शक्तीच्या बळावर तुम्ही प्राप्त परिस्थितीशी दोनहात करून ती वाकवू शकता आणि तिच्यावर सहजी मात करू शकता हेमर्म मला कांदिवलीत उमगलं.
प्राचार्य खासनीस सरांची व्याख्यानं हा स्वतंत्र चिंतनाचा विषय. त्यांच्या तत्वज्ञानाच्या तासाला मी पानंच्या पानं भरून नोटस् घेत असे. सरांच्या हे लक्षात आल्यावर एकदा लेक्चर संपल्यावर त्यानी माझी डायरी मागून घेवून वाचली. त्या तासाला धेय्य आणि उद्दिष्टं यातला फरक सरानी सांगितला होता. ते वाचल्यावर सरानी माझा वकूब ओळखला होता. पुढच्या लेक्चरला हे गोष्ट सरानी वर्गात सांगितली.“असे विद्यार्थी भेटले की शिकवावंस वाटतं. माझ्या संपूर्ण करियर मध्ये वर्ड टू वर्ड परफेक्ट डिक्टेशन घेणारा काळे हा मला भेटलेला दुसरा विद्यार्थी.” आश्चर्याची म्हणजे सरानी शिकवलेला भाग डोक्यात अगदी जसाच्या तसा फ़िट्ट बसायचा. पुढे मी बी. एड.कॉलेजमध्ये तत्वज्ञान विषय शिकवताना सरानी त्या वेळी शिकवलेला टॉपिक आला. की मला लेक्चर नोटस् बघावीच लागत नसे. प्रा.सानप मॅडम आम्हाला प्रायोगिक मानसशास्त्र शिकवीत. त्यातल्या प्रयोगांचं प्रत्यक्ष अध्ययन अध्यापनात कसं उपयोजन करायचं याचं प्रतिपादन त्या अस्खलितपणे करायच्या. माझ्या मानसशास्त्राच्या प्रत्येक प्रयोगाला त्यांचा Good रिमार्क असायचा.अशयाचं सुलभी करण ही त्यांची हातोटी होती. तसेच समर्पक आणि आशयपूर्ण उदाहरणं त्या द्यायच्या.मानस शास्त्रातल्या स्मरण या घटकावर बोलतानात्यानी मे आणि प्रभूची जोडी हे उदाहरण दिलं होतं. आमची दोघांची देहयष्टी म्हणजे पूर्ण विरोधाभास. विसंगती किंवा विरोधाभासामुळेही एखादी गोष्ट आपल्या चट्कन लक्षात रहाते.या उदाहरणावर तर सगळे खळखळून हसलेहोते. आपलं कथन आशयपूर्ण कसं करायचं हे मीत्यांच्या कडून शिकलो तसंच संपूर्ण वर्गावर त्यांच अगदी बारीक लक्ष असायचं. त्यामुळेही त्यांच लेक्चर चुकवायचं धाडस सहसा कुणीही विद्यार्थी करीत नसे. (क्रमश: )