बी. एड्. फिजीकल भाग 2
दोन मुलाना एक खोली मिळे. खोलीत दोन कॉट,दोन टेबलं नी खुर्च्या मिळत. आंघोळीसाठी २५बाथरूम्स नी २५ संडासहोते. मोठ्या कॉन्क्रिटच्या टाक्या होत्या नी २४ तास पाणी मिळायचे. प्रत्येकाने आपला बेड बेडिंग, डास खूप असल्यामुळे मच्छरदाणी व बादली तांब्या भांडे न्यायचे होते. दुसरे दिवशी सामानाची जमकरून शुक्रवारी ११ वाजता सामान खोलीत टाकून मी लेक्चर हॉलमध्ये प्रवेश केला. प्रा.सानप मॅडम रोलकॉल घेत होत्या. मी परवानगी विचारून वर्गात प्रवेश करताच मला भेदक नजरेने न्याहाळून मॅडम बोलल्या, “तुमचं नाव काय? तुम्ही कुठून आलात?क्वालिफिकेशन काय?”
मी म्हणालो , “ श्रीराम विनायक काळे.मी कोकणातून, आयमीन देवगड तालुक्यातूनआलो.१९ ७६मध्ये मुंबई युनिव्हर्सिटीमधून बी.ए. झाल. सब्जेक्ट इंग्लिश स्पेशल.”
“अच्छा ,मग बी.ए.नंतर वर्षभर काय करीत होतात?”
“ वर्षभर हायस्कूलमध्ये उपशिक्षक म्हणून जॉब केला.”
“ ओ माय गॉड..... इट्स् एन्चाटिंग..... बाय द वे आपलं एज? ”
“ट्वेण्टी टू, रनिंग.......”
“व्हेरी नाईस,माय स्वीट चॅप,युआर वेलकम्ड.....हॅव युवर सीट”
आता मी समोर पाहिलं. साधारण३०×५० एवढा तोभव्य हॉल होता. प्रवेशद्वारा शेजारी ८×१० प्लॅट फॉर्म होता नी त्यासमोर दहा एक फूटअंतर सोडून त्या पुढे वर्गाच्या मागिल भागापर्यंत दोनफूट रुंद लाकडी टप्पे होते नी प्रत्येक टप्प्यावर उजव्या हाताला रुंदफळी बसवलेल्या खुर्च्या हारीने मांडलेल्या होत्या . पुढच्या रो मध्ये अर्ध्या भागात मुली बसलेल्या होत्या.त्याच रो मध्ये काही खुर्च्या सोडून मी बसलो.माझं नी मॅडमचं बोलणं सुरू असताना वर्गात जोरदार खसखस पिकली होती. मी बसल्यावर वर्गावरनजर फिरवून मॅडम म्हणाल्या, “आमच्या प्रश्नोत्तरांमध्ये खिदळण्या सारखं काय होतं? विसाव्या वर्षी इंग्लिश प्रिन्सिपल घेवून मुंबई युनिव्हर्सिटीची डिग्री मिळवणं हे दात काढून हसण्याइतकं सोपं आहे का? अण्ड ही हॅज वन ईअर एक्सपिरियन्स ऑफ टीचिंग....” आता वर्ग चिडीचूप झाला.मॅडमचं मानसशास्त्राचं लेक्चर सुरू झालं. त्यांची पर्सनॅलिटी पाहून मी अत्यंत भारावून गेलो होतो. त्यांचाआवाजही अत्यंत मधूर, आर्जवी आणि बोलणं विद्वत्प्रचूर! लेक्चर नोटस् घ्यायला मी त्यांच्या लेक्चर्सना शिकलो.
त्यानंतर आणखी एक लेक्चर झालंनी शॉर्ट रेसेस झाली. माझ्या मागच्या बाजूला बसलेल्यांपैकी एक उंचापुरा बलदण्ड शरिरयष्टी असलेला निळसर लेन्सचा चष्मा लावलेला प्रशिक्षणार्थी माझ्यासमोर येवून थांबला.“मी, देवगडचा, म्हणजे मुणग्यातला. आर.डी.प्रभू.... आता वीस मिनिटं सुटी आहे,चल,बाहेर जावून येवुया. ” आम्हीबाहेर पडलो. मी मुणगे हायस्कूलला जाताना हिंदळे गाव संपल्यावर बाणाची कोनी म्हणून एकस्टॉपलागतो. तिथून चढावाच्या बाजूला या माणसाला खांद्यावर बंदूक घेवून फिरताना तीनचार वेळापाहिलेलं होतं.त्याचा कायम काळा शर्ट असायचा म्हणून तो माझ्या पक्का स्मरणात होता. मी तसं बोलल्यावर तो म्हणाला, “ हो बरोबर आहे. काळाशर्टही माझी खास चॉईस . बाणाची कोनीस्टॉप पासून आमची बाग सुरू होते . खाली पायथ्याला आमचं घर आहे. बागेच्या वरच्या अंगाला सडा सुरू होतो तिथेगच्च झाडी आहे.तिथे हुकमी शिकार मिळते.” आमचं बोलणं सुरू असताना कोकणातून आलेलेआणखी तीन महाभाग गोवेकर, रावूळ नी रत्नागिरीचा चावरेकर ओळख काढायला आले.
आता प्रभु आणि चावरेकर लेक्चरला माझ्या शेजारी येवून बसले.कॉलेजमध्ये १०० अडमिशन्स ह्वायच्या. यंदा ३५ लेडीज नी बाकीचे जेण्टस होते. कॉलेजचं रोजचं रुटीन म्हणजे सकाळी ६.३० ते ८.३० व ४.३० ते६.३० ग्राउण्ड ड्युटी असे.यावेळी कबड्डी, फुटबॉल, बॅडमिंग़्टन, व्हॉलि बॉल, बास्केट बॉल हे गेम, रनिंग. लॉंगजम्प, हायजम्प, हॅमर थ्रो, जॅव्हेलियनथ्रो, डिस्कस थ्रो, शॉट पट, पामेल हॉर्स जम्प, रेसलिंग, मलखांब, योगासनं, लेझिम,घुंगुरकाठी, डम्बेल्स,करेल एक्झर साईझ, टेबल ऑफ एक्झर साईझ, जिम्नास्टिक फ्लोअर इव्हेण्टस्. रेसलिंग , बॅलन्सिन्ग बीम या सर्व क्रीडा प्रकारांच प्रशिक्षण चालायचं. दुपारी११ ते ४ लेक्चर्स व्हायची. ही सगळी माहिती मला प्रभुने सांगितली. लेक्चर्स संपल्यावरकाही मुलीनीही माझी चौकशी केली. इतर प्रशिक्षणार्थींच्या तुलनेत मी अगदीच बारकुडा नी पोरसवदा. अगदी मुलींमध्येसुद्धा माझ्या अंगलटीशी तुलना होणारी कुणी मुलगी नव्हती. आम्ही गप्पा मारीत रूमकडे जात असता दोनतीन पैलवानगडी म्हणाले, “ह्ये कुस्तीत कायम फॉलोऑन घेतय बगा. आख्या क्वालेजात ह्येला काय जोड मिळंना....... पोरगं सोडाच पन ल्येडिज मदीबी ह्याला जोड न्हाई मिळायची.” ती चेष्टा असली तरीते सत्य होतं.
मॉर्निंग इव्हिनिंग असेंब्लीला मुलंमुली सर्वानाच हाफचड्डी नी टीशर्ट हा युनिफॉर्म होता. त्यावेळी स्त्रियांमध्येही पंजाबी ड्रेस रूढ झालेला नव्हता. शॉर्ट नी टी शर्ट घातलेल्या मुली हे दृष्य आमचलाही खटकायचं . पण दोनचार दिवसानी आम्हाला काही वाटेनासं झालं. आमच्या तीन मॅडम सुद्धा असेंब्लीला फुलपॅण्ट किंवा ट्रॅकसूट नी टीशर्ट घालून यायच्या. क्रीडा प्रकार सादर करताना सहज मुक्त वावर करण्यासाठी दुसरा कोणताच ड्रे्सकोड योग्य नी सुटसुटीत ठरणारा नव्हता. मी जॉईन झालो त्याच संध्याकाळी आमची कुलांमध्ये विभागणी झाली. मुलांची भोसला,जवाहर,रणजित नी सुभाष आणि मुलींची भारती, ज्योती अशी कुलं ही गेल्या कित्येक वर्षांची परंपरा होती.हाऊस लीडर नी असिस्टंट लीडर कॉलेजने नियुक्त केलेले होते. उर्वरित लोकांची नैपुण्य क्षेत्रं सरानी वाचून दाखवली. ती माहिती ऐकल्यावर मी मनात भलताच खजिल झालो.
सर्व कुलप्रमुखानी चिठ्ठया उचलून कुलांची नावं निश्चित झाली.मग एकेकाने उपस्थितांमधला एकेक जण आळीपाळीने निवडायचा की तो त्या संबंधित कुलात समाविष्ट होई. पंधरा मिनिटातआम्ही कोकणातले रावूळ ,गोवेकर ,मी व आणखी सातआठ जण शिल्लक राहिलो. कोणीच कुलप्रमुख आम्हाला समाविष्ट करून घेईना.मग प्राचार्यानी आम्हाला आडनावांच्या अल्फाबेटिक ऑर्डर प्रमाणे चार कुलात विभागून टाकले नी मी रणजित कुलात गेलो. त्या कुलात चावरेकर ही होता. तो आणि मी एका रुममध्ये पार्टनर झालो. प्रभु सुभाष कुलात गेला होता.नी नशिबाने रावूळ नी गोवेकर याना एक कुल मिळालं नी त्यांची जोडीशाबूत राहिली. कुलांमध्ये एकेक जण निवडताना मला आपल्या कुलात घेण्यासाठी प्रभुने त्यांच्या कुलप्रमुखाला खुप विनवण्या केल्या.पण त्याच्या मुच्छड कुल प्रमुखाने दाद दिली नाही. त्याचं नाव होतं थोरात......त्या काळी कामधेनु किटकनाशकांच्या जाहिरातीत एक बेताच्या उंचीचा भरदम छपरी मिशीवाला शेतकरी असायचा तो थेट थोरातासारखा दिसे.मी त्याला कायम कामधेनुच्या जाहिरातीतला मुच्छड म्हणत असे. ती काही हिणकस टीका नव्हती. त्यामुळे त्या बापड्यालाही चिडता येत नसे. वसईच्या भाई चौधरीने कामधेनु किटक नाशकाची एक जाहिरात पैदा करून ती मेसमध्ये चिकटवून ठेवली होती.
संध्याकाळी आम्ही कुलनिहाय नेमून दिलेल्या दोन हॉस्टेलमध्ये रूम निवडून त्यात शिफ़्ट झालो. प्रभुने त्याच्या कुलाला दिलेल्या रोमध्ये टोकाला जी खोली शिल्लक राहिली नी जो भिडू उरलेला होता तो पत्करला.पुढे वर्षभर प्रभु कायम माझ्या रुममध्येच असायचा . तीन फुटी कॉटवर दोघाना झोपणं शक्य नव्हतं,म्हणून फक्त जोपण्यापुरता तो आपल्या खोलीत जायचा. आबा चौधरी कायम चिडवायचा.... चुकला प्रभु काळ्याच्या खोलीत मिळेल ...... आम्ही तिघे एकाच खोलीत तिसरी कॉट टाकून रहायला ही तयार होतो पण तशी परवानगी मिळाली नसती.
त्या वर्षी लेडिज ३५ नी ६५ जेण्टस होते म्हणून आबा चौधरीला कोणी पार्टनरच मिळाला नाही नीत्याला एकट्याला एका टोकाला स्वतंत्र खोली मिळाली.तो वसईचा असल्यामुळे कायम चान्स बघून घरी पळायचा. पण सकाळच्या असेंब्ली पूर्वी हजर व्हायचा. आणि मुलांवर वेळे काळेची काही रिस्ट्रिक्शन्ससुद्धा नव्हती.आमचा एक कलिग़ केरळचा टी.एम्.ईसो नावापुरता हॉस्टेलवर असे.असेंब्ली झाली की तो बाईक घेवून कायम त्याच्या कोणा पाव्हण्याकडे गुल व्हायचा. तो तर वर्षभरात एकदाही मेसवर जेवला नाही की मेसचं मासिक बीलही दिलं नाही.मेसमधल्या खाण्याला तो कायम “ये खाना तो कुत्ताभी नहीं खायेगा.... ”असं म्हणे. दुपारी तो आपला डबा सोबत आणून आपल्या रुममध्ये बसून खात असे. सुरुवातीला काहीजण मला आस्थेने सांगत की,“तू ह्ये कॉलिज सोडून जा. कुटं तरी येक्याडेमिक कॉलेज मदी तुला नक्की प्रवेश मिळंल..... इतलं कष्ट तुला झेपनार न्हायती. आमी आपलं रेड्यागत निबार हाऊत.”
( क्रमश: )