Memories of B.Ed. Physical - 1 in Marathi Moral Stories by श्रीराम विनायक काळे books and stories PDF | बी.एड्. फिजीकल - 1

Featured Books
Categories
Share

बी.एड्. फिजीकल - 1

           बी.एड्. फिजीकल भाग 1

 

             तीतारीख होती बुधवार दि. २७ एप्रिल ७७! कांदिवली गव्हर्नमेण्ट कॉलेजच्या बी.एड्. फिजीकल  कोर्ससाठी  प्रवेश अर्जा सोबतजोडायला सिव्हिल सर्जनचं फिटनेस सर्टिफिकेट घ्यायला मी मुणग्यातून सकाळच्या  देवगड  गाडीने रत्नागिरीला जायला निघालो  होतो. आदल्या दिवशी गोरेगावच्या निळूभाऊ गोखल्यांचं टपाल आलं. त्यातून तो प्रवेश अर्ज आलेला होता. अर्ज पाठवायची अंतीम  तारीख  होती ३० एप्रिल. मी साधले  क्लार्कनाअर्ज दाखवला. त्यानी छापिल  प्रवेश अर्जावर थेट माहिती न  भरता कोरा फुलस्केप घेवून त्यावरमाहिती भरून घेतली. अर्जासोबत शालेय व महाविद्यालयीन काळात  जिल्हा/ राज्यस्तरावर खेळांमध्ये वैयक्तिक किंवा सांघिक सहभाग, मैदानी क्रीडा प्रकारांमध्ये मिळवलेली नैपुण्य पदकं, प्रशस्तीपत्रं जोडायची होती. मी शालेय वा महाविद्यालयीन स्तरावर कधिच खेळात भाग घेतला नव्हता. पण अलिकडेच फेब्रुवारीत मिठबावला नॅशनल फिजिकल एफिशियन्सी डाईव्ह मध्ये शाळेतल्या मुलाना घेवून तीन दिवस जात होतो.त्यावेळी इतरही तीन-चारहायस्कूल मधले  शिक्षक आलेले होते. तिथल्या संयोजक पीटी शिक्षकानी मुलांसोबत आलेल्या सगळ्याच शिक्षकाना मैदानी क्रीडा प्रकारांमध्ये ओपन गटातून  थ्रीस्टार- ब्लु  रिबन प्रमाणपत्र मेहेरबानी दाखल दिली होती. ते प्रमाणपत्र मी जोडलं.

        साधलेनी तो प्रवेश अर्ज  हेडमास्तर चिलेसराना दाखवला. कांदिवली कॉलेज हेराज्यातलं मोठं फिजिकल कॉलेज आहे. तिथे राज्य स्तरावरच्या क्रीडा पटूना प्रवेश मिळतो. ही माहिती त्यानी सांगितली. आमच्या संस्थे मार्फत दरवर्षी जिल्हास्तरिय व्हॉलिबॉल स्पर्धा व्हायच्या. त्याचं संयोजन हेडसर करायचे. त्यानी मुणगेहायस्कूलच्या टीम मधून उपविजेत्या संघात माझा सहभागअसल्याची  दोन वर्षांची दोन सर्टिफिकेट मला दिली.तसेच शालेय क्रीडा स्पर्धा संयोजनमध्ये माझा सहभाग असल्याबद्दलही सर्टिफिकेट दिलं. प्रवेश अर्ज त्यानी स्वत: व्यवस्थित भरून दिला. अर्जासोबत बी.ए.चं  मार्कलिस्ट, डिग्री सर्टिफिकेट जोडल. त्यावेळी झेरॉक्स ची सोय नव्हती. सगळी प्रमाणपत्रं कोऱ्या कागदावर हाती  लिहून काढावी लागत. चिलेसरानी स्टाफवरच्या  शिक्षकांवर ते काम सोपवून माझं ओझं हलकं केलं.शिक्षक म्हणून  सेवेचा अनुभव असल्यामुळे मला त्या कोट्यातून प्रवेश मिळेल असं सर बोलले. तेंव्हा खरं तर १मे रोजी वार्षिक परीक्षेचा रिझल्ट असल्यामुळे तो मोठा गडबडीचा काळ होता. माझ्याकडे असलेल्या वर्गाच्या रिझल्टचं  काम मी पुरतावीत आणलेलं  होतं. म्हणून सरानी मला त्या गडबडीच्या काळातही रत्नागिरीला जावून यायला रजा दिली होती.

         मी तळेबाजार तिठ्ठ्यावर उतरलो तेव्हा फोंडागाडी सुटतच होती. त्या गाडीने  नांदगाव नी तिथून कणकवली  गाडीने दुपारी पाऊण वाजता मी रत्नागिरीलासिव्हिल हॉस्पिटल स्टॉपवर उतरलो. मी कॉलेजला रत्नागिरीला गोगटे कॉलेजला असल्यामुळे कधितरी सिव्हिल हॉस्पिटल  आवारातल्या साईनाथ कॅन्टिनमध्ये आम्ही मित्र मिसळपाव खायला जायचो. त्यावेळी तिथे पुजारी नावाचे आमच्या गावा शेजारच्या बांदेवाडीचे  एक वार्डबॉय होते .  त्यांच्याशी माझी ओळख होती.आम्ही कधि भेटलो तर एकमेकाना ओ गाववाले म्हणून हाकारित असू. मी जनरल वॉर्डात जावून त्याना भेटलो. त्या दिवशी संगमेश्वर जवळच्या गावात विषारी  दारु पिवून तीन चारलोक दगावले होते.त्या प्रकरणाच्या चौकशीसाठी सिव्हिल सर्जन तिकडे गेले असल्यामुळे लगेच सर्टिफिकेटच काम होणं अशक्यअसल्याचं ते म्हणाले. माझी निकड कळल्यावर  ते  मलाघेवून तिथल्या डिस्पॅच क्लार्क नेरूरकरना भेटले.

         मी हायस्कूल शिक्षक असल्याचं कळल्यावर नेरूरकरनी अगत्याने माझी चौकशी करून  युक्ती सांगितली.सर्जन साहेब बाहेर गेले असले तरी तिथल्या आर्.एम्.ओ. साहेबांकडे चार्ज होता. त्यांची सही घेता येणार होती. पण सिव्हिल  सर्जनचीच सही घेण्याची अट होती. त्यावर तोडगा म्हणजेआर्.एम्.ओ. साहेबांनी फॉर म्हणूनसही केली की  मग फिटनेस सर्टिफिकेटवर सिव्हिल  सर्जनचा स्टॅम्प असा रेटून मारायचा की फॉर ही अक्षरं बुजून जातील. मग नेरूरकरनी समक्ष आर्.एम्.ओ. साहेबांना भेटून फिटनेस सर्टिफिकेट  भरून घेवून त्यांची सही घेतली. आर्.एम्.ओ. साहेबांनी वीस रुपये घेवून सही केली नी सिव्हिल सर्जनचा स्टॅम्प मारल्यावर फॉर म्हणून लिहा असं सांगितलं. नेरूरकर साहेबांची सही घेवून आले. सर्टिफिकेटवर सिव्हिल सर्जनचा स्टॅम नी सील करून दिलं. मगआम्ही तिघानीही साईनाथ कॅन्टिनमध्ये मिसळ पाव खाल्ला. तिथून सबपोस्ट ऑफिसमध्ये जावून प्रवेशअर्ज कॉलेजच्या नावे  रजिस्टर करून मी परतीचा प्रवास सुरू केला .

         साडेतीन वाजताच्या वेंगुर्ला  गाडीने सात वाजता वाजता नांदगाव नी तिथून आडबंदरला जाणारा ट्रक मिळाला. अभावितपणे थेट मुणगे हायस्कूल पर्यंत जायची माझी आयतीच सोय  झाली. जांभळीच्या साण्यावरून नारिंग़्र्यात  शिरल्यावर उताराजवळ वळणात ट्रक थांबला  नी आम्ही जावून येतो म्हणत ड्रायव्हर क्लिनर खाली उतरले. अर्ध्या तासानंतर दोघेही परत आले तेंव्हा उग्रदर्पआला नीती दुक्कल  कुठे जावून आली ते मीओळखलं. आता ड्रायव्हर साहेब जरा 'तराट ' ड्रायव्हिंग करू लागले होते. पावणे नऊला मी हायस्कूल समोर ट्रक मधून उतरलो. त्यावेळी सड्यावर वस्ती झालेली नव्हती. हॉटेलवाले  हरीभाऊ मात्र  हॉटेलातच  बिऱ्हाड करून रहायचे. मी हाक मारल्यावर ते बाहेर आले. मी तेंव्हा कारिवण्यात मावशीकडे रहायचो. पण एवढ्या  रात्री  पाऊण तास चाल मारून खाली जाण्याऐवजी माझे  सहकारी  प्रताप सावंत सर हायस्कूलच्या मागिल बाजूला नाटेकरांच्या शेतघरात रहात त्यांच्याकडे थांबलो.

         पंधरा दिवसानी निळूभाऊंचं पत्र आलं. कांदिवली  कॉलेज मध्ये स्टेट लेव्हलवर चे  युनिव्हर्सिटी झोनल लेव्हल वरचे चॅम्पियन अशांचाच विचार होतो. अर्थात काही सीट इन सर्विस  लोकांसाठी राखीव असतात  त्यातून  प्रवेश मिळतो का?  पाहुया. तिथले सुपरिटेण्डण्ट  आमच्या बाजुलाच राहतात. ते लक्ष ठेवून राहतील असे त्यानी कळविले होते. अर्धा जून महिनासंपला. मी कुठच्या हायस्कूलला संधि मिळते का ? प्रयत्नात होतो. त्यावेळी नव्यानेच  स्टाफ अप्रूव्हल ची प्रथा सुरू झालेली होती. रत्नागिरीलाशिक्षण विभागामार्फत पदवीधर उमेदवाराना नेमणुका देत आहेत असं कळलं म्हणून आठवडाभर रहाण्याची  तयारी  करून कागदपत्रे घेवून मी वीस तारीखला रत्नागिरीला गेलो. माध्यमिक विभागा मध्ये  इंग्रजी व गणित या दोनविषयांच्या उमेदवारांची नोंदणी  सुरू होती. त्यानी  माझे सर्टिफिकेट, मार्कलिस्ट पाहून नाव नोंदून घेतले व २५ जुनला येवून भेटायलासांगितले.

          मी लिमये वाड्यात आक्काकडे मुक्कामाला थांबलो होतो. दुसरे दिवशी जेवण  झाल्यावर  एक वाजताच्या दरम्याने शेजारच्या सुहास सोहोनीशी  गप्पा मारीत असताना अकस्मात दादा आले. मी अवाक  झालो."काल संध्याकाळ च्या टपालाने निळू भाऊंचेपत्र आले. तुला कांदिवलीत बी.एड्. फिजिकल साठी अडमिशन मिळालेली आहे. २५जूनपूर्वी  हजर व्हायचं आहे."दादानी झटक्यात सांगून टाकलं. म्हणजे लगेच निघायला हवं होतं. मी त्या अगोदर कधीच मुंबईलागेलेला नव्हतो. सुहासदादाने सगळी  चौकशी केली.मालाडला माझी मावशी रहायची. दुसरी दुगामावशी तिचा मुलगा विजय गिरगावला सेण्ट्रल सिनेमाच्या मागे रहायचा आणि अडमिशन करणारे निळूभाऊ गोरेगावला. सगळ ऐकल्यावर सुहासदादाने योग्य पर्याय सुचवला. त्याचे सख्खे काकाउत्तमराव सोहोनी गिरगावला पोर्तुगिज चर्च जवळ रहायचे.आम्ही लगेच सुहासच्या एजन्सित गेलो.तिथून त्याने उत्तम काकाना फोन लावला. ते  मला बॉम्बे सेण्ट्रलला उतरून घेतील नी गिरगावलादुगामावशीच्या विजयकडे सोडतील असे ठरले. बुकिंग मिळाल्यावर त्याना पुन्हा फोन करून कळवायचे होते.आम्ही  मग बस स्टॅण्डवर मुंबई गाडीचे बुकिंग करायला गेलो.

         आम्ही स्टॅण्डवर पोचलो तो समोर  माझा मित्र नी सुहासचा गाववाला  सोमेश्वरचा चंदू लिमये दिसला. तो नुकताच कंडक्टरवम्हणून लागलेला होता नी त्याच  दिवशी  पाचच्या गाडीवर त्याची मुंबई ड्युटी होती,  आणि ती उरकून तोच मला उत्तम काकांकडे नेवून सोडणारवहोता. मुंबई सेंट्रल डेपोत ड्युटी संपवून गाडी डेपोत लावून  झाल्यावरचंदू लिमयेने मला उत्तम काकांकडे गिरगावला नेवून पोचवले. आंघोळ चहा फराळ केल्यावर त्यानी मला तिथून जवळ सेण्ट्रल सिनेमा जवळ असलेल्या विजय दादाकडे पोचवले. मीअकस्मात गेलेला बघून मावशी सकट सगळेच चकित झाले. विजयदादा संध्याकाळी बॅन्केतून आल्यावर आम्ही निळूभाऊंकडे गोरेगावला गेलो. कांदिवलीला फी पूर्ण  माफ होती.फक्त ग्रंथालय डिपॉझिट २० रुपये आणि वर्ष अखेर परिक्षा फी ४० रुपये भरावे लागणार होते. रहायला मोफत वसतीगृह होतं. कॉमन मेस प्रशिक्षणार्थी मुलं चालवीत नी  येणारं बील सर्वानी मिळून भरायचं होतं.मात्र होस्टेल वर रहाणं कंपल्सरी होतं.

                                                                                       ( क्रमश: )