बी.एड्.फिजीकल ,कांदिवली भाग २०
कोणी सी.पी.एड्. (Certificte in Physical Eduction) तर कोणी एन्. डी. एस्. (National Defence Service) असे शॉर्ट टर्म कोर्स झालेले. ऑर्गनायझर एन.डी.एस.वाले. क्रीडांगणावर गेल्यावर काउंटींग देताना ‘एक दोन ती चार पॉंच छे सात आठ आठ सात छे पॉंच चार तीन दोन एक’ असे उलटे “बॅक काऊंट” द्यायला लागले. ते आवाज चढवून मला गप्प करायला लागल्यावर मात्र मीही आवाज चढवला. “तुम्ही प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांसमोर बोलत अहात याचे भान ठेवा,” ही तंबी दिल्यावर मात्र ते नरम आले. काय रूल्स अहेत ते सांगा म्हटल्यावर मी लगेच पुढे गेलो नी खडू घेवून बेसिक रुल लिहून दिले. मग सम आणि विषम स्पर्धक किंवा गट असतील तेंव्हा राउंड(फेरी/पाळी) कसे ठरवायचे? बाय/ पुढची चाल कुणाला कशी द्यायची? त्याचे सोदाहरण स्पष्टीकरण केले.
लेझिम घाटी आणि देशी दोन्ही प्रकार, डंबेल्स, करेल, घुंगूर काठी चे पाच सहा प्रकार आम्ही करून दाखवले. तेली मॅडमनी जिम्नास्टिक फ्लोअर एक्झरसाईझचा सुंदर डेमो दिला. ते पाहून कसालचे हेडमास्तर चकितच झाले. ते म्हणाले, “अहो आमच्या शाळेत ही साधनं धूळ खात पडलेली आहेत. मी माझ्या शाळेतल्या दोन शिक्षकाना तुमचा लंच अवर झाल्यावर पाठवतो. त्याना लेझिम, डंबेल्स, घुंगूर काठीचे हे प्रकार शिकवा. या प्रशिक्षण वर्गात आलेल्या सर्व फिजीकल टीचर्सना खरं तर हे प्रकार शिकवणं गरजेचं आहे. मी आजच शिक्षणाधिकारी साहेबाना भेटून तसं पत्र क्रीडाधिकारी सराना द्यायला सांगतो.” आमच्या सोबतच्या प्रशिक्षणार्थींपैकी कुणालाच कवायत प्रकारांशिवाय फारश काहीच माहिती नव्हती. त्यानीही कसालच्या हेडमास्तरांची सुचना उचलून धरली. त्या दिवसापासून रोज संध्याकाळी दोन तास साधनसहित प्रकारांचं प्रशिक्षण सुरू झालं. आमच्यापैकी एकजण त्याचा डेमो देत असे. आता कोर्स संचालक आमच्याशी वरमून असत. कांदिवलीचा लौकिक त्याना आता समजला होता. रात्री काहीच प्रोग्रॅम नसायचा. म्हणून आम्ही ऑर्गनायझरना विचारून रात्री वसतीला राऊळ कडे जात असू. चार पाच दिवस रोज रात्री राऊळची पत्नी आमच्यासाठी जेवणाचा खास मेन्यू ठरवीत असे. शिवाय पहाटेच उठून सर्वांसाठी दुपारच्या जेवणाचा डबाही बनवून देत असे.
मी त्या दरम्याने राजापूर तालुक्यात नव्याने सुरू झालेल्या अनुदानित हायस्कूल मध्ये हेडमास्तरच्या पोस्ट साठी प्रयत्न करीत होतो. कोर्सच्या सहाव्या दिवशी मुटाटच्या हेडमास्तरानी कोर्स ऑर्गनायझरना मला काही महत्वाच्या कामासाठी रिलिव्ह करायचं पत्र देवून माणूस पाठवला होता. नाणारचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष आलेले होते आणि माझा नक्की निर्णय विचारण्यासाठी त्याना माझ्याशी बोलायचं होतं. मी कोर्स अर्धवट सोडून निघून गेलो.पुढे जून पासून नाणारला मुख्याध्यापक म्हणून हजर झालो.आता बी.एड्. फिजीकलशी माझा संबंध पुरता संपुष्टात आला. तसंही मी बी.एड्. करून शाळेत नोकरीला लागल्यावर माझ्याकडे नाममात्र दहावीचे दोन शारिरीक शिक्षणाचे तास असत . तेही मी इंग्रजी शिकवायला वापरी. अर्थात शाळेत मास ड्रिल मात्र मीच हौशीने घेत असे . तसेच लेझिम डंबेल्स, करेल, घुंगूर काठी, पिरॅमीडचे पाच प्रकार आणि पाचवीच्या ल हान वर्गाला दहा दहा मुलांचे गट करून दोन हातात दहा फुटी बांबूचे रंगीत तुकडे पकडून करायचे कवायत प्रकार माझ्या हौशी खातर ऑफ तासाला बसवून घेतले होते. पहिल्या दिवशी हा डेमो पाहिल्यावर हेडमास्तरांसह सगळे स्टाफ मेंबर्स अक्षरश: थक्क झाले. दुसरे दिवसा पासून हेडमास्तरांपासून ते शिपायापर्यंत सगळा स्टाफ सरावाच्या वेळेला मदतीला येवू लागली नी हा डेमो बाळसेदार व्हायला लागला. चार पाच दिवस सराव घेतल्यावर मुलं सगळे प्रकार अगदी बिनचूक सादर करू लागली.
इन्स्पेक्शनला उप शिक्षणाधिकारी मोरेसाहेब आलेले होते. आठव्या पिरीयडला सुरुवातीला खडे आणि बैठे व्यायाम प्रकार झाल्यावर सहा वर्गानी एकाच वेळी लेझिम, डंबेल्स, घुंगूर काठी, करेल, पिरॅमीड व बांबू एक्झरसाईझ सुरू केल्यावर साहेब थक्क झालेच पण येणारे जाणारे गावकरीसुद्धा मुद्दाम थांबून पहात राहिले. मोरे साहेबानी खरोखरच माझी पाठ थोपटली आणि म्हणाले, “खूप वर्षामागे मी फिजीकल ट्रेनिंग कोर्स केला होता. तेंव्हा कांदिवलीचेच इंस्ट्रक्टर आलेले होते. तेव्हा पासून कांदिवलीचा लौकिक मी ऐकून होतो. तुम्ही त्या संस्थेचं नाव राखलंत. मी इतकी हायस्कूल्स फिरलो पण असं प्रात्यक्षिक नाही बघितलं. ”
मी बी.एड्. करून आल्यावर तीन वर्षात मला राजापूर तालुक्यात नाणार हायस्कूल मध्ये हेडमास्तर म्हणून संधी मिळाली. त्यानंतर दोन वर्षानी मी शाळेच्या गॅदरिंगसाठी प्रा. शैलजा सानप मॅडम ना चीफ गेस्ट म्हणून बोलावलं. मॅडम प्रेमाने आल्या. मी त्याना आणायला राजापूरला गेलो होतो. राजापुरचे बी.डी.ओ. गोखले साहेबांशी माझी चांगली रिलेशन्स होती, त्यानी मॅडमना न्यायला आणि पोहोचवायला जीप दिली होती.
शाळा आणि परिसर त्याना खूप आवडला. मी त्याना मोटर लॉंचने खाडीतून विजयदुर्गला नेवून किल्ला दाखवला. रात्री मॅडमचा शाल ,श्रीफळ ,साडी देवून सत्कार केला. मॅडमनी त्यावेळी केलेलं भाषण समोरचा बहुसंख्य जानपद श्रोतृवृंद लक्षात घेवून केलेलं होतं.म्हणून ते सर्वाना फार आवडलं. प्रोग्राम झाल्यावर दुसरे दिवशी मी त्याना राजापूर पर्यंत पोहोचवायला गेलो होतो. त्यावेळी गोवा लक्झरी गाड्या सुरू झालेल्या होत्या. त्या एकदम टकाटक असत आणि बसायच्या सीटही आरामशीर असायच्या. तसेच गोवा गाड्या वाटेत फार वेळ काढीत न रहाता एस्टी गाड्यांपेक्षा तीन चार तास लौकर मुंबईला पोहोचत असत. मी तिथल्या गुरव एजंटला गाठून अशाच एका लक्झरी गाडीत रात्री आठ वाजता त्याना बसवून दिलं.मॅडमच्या नकळत लक्झरी घ्या तिकीटाचे पैसे ड्रायव्हरला दिले. चार दिवसानी त्यांचं पत्र आलं. लक्झरी अधे मध्ये वेळ न काढता पहाटे पाच वाजता मुंबईला पोहोचली होती. तिकीटाचे पैसे मी दिले ही गोष्ट मात्र त्यांना खटकली असं त्यानी लिहीलं होतं.
मी हेडमास्तर असताना क्रीडा विभागाकडून क्रीडांगण समतल करण्यासाठी १०,००० रुपये अनुदान मिळायचं. त्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी मी स्पोर्ट्स ऑफिसला गेलो होतो. नी अहो आश्चर्यम्....माझा इन्सल्ट करणारे ‘ते’ सर डिस्ट्रिक्ट स्पोर्टस ऑफिसर म्हणून आलेले होते. मी सराना नमस्कार केला. त्यानी मला प्रेमाने जवळ घेतल. मी हेडमास्तर झाल्याचा त्याना खुप आनंद झाला होता. मी कामाचं बोलल्यावर त्यानी मंजूर प्रकरणाची फाईलच मला दाखवली. मी मला पाहिजे त्या टिपण्या करून घेतल्या. गावातल्या लोकानी श्रमदानाने ग्राऊंड मधले उंचवटे नी बाजूची दरड खणून चार दिवसामध्ये लेव्हलिंगचं काम केलं.मी नमुन्या प्रमाणे प्रस्ताव तयार केला. नी समक्ष जावून प्रस्ताव सादर करून आलो. त्यावेळी सर मुंबईला गेले असल्यामुळे आमची भेट झाली नाही. मात्र पंधरा दिवसात मंजूरीची ऑर्डर नी १०,००० रुपये अनुदानाचा डी.डी. रजिस्टर पोस्टाने आला. महिनाभरातच सर बदली होवून अन्यत्र गेले. सर फक्त सहा महिने स्पोर्टस ऑफिसर म्हणून आमच्या जिल्ह्यात होते म्हणे. त्यानंतर एकदा रत्नागिरीला मारुती मंदिर जवळच्या स्टेडिमचं उद् घाटन झालं त्या समाऱभाला प्रा. गोंदकर आले होते. त्यांनी सॉव्हनीर मधल्या माझ्या घरच्या पत्त्यावर पत्र पाठवून मला भेटायला ये म्हणून कळलं होतं. त्या दरम्याने मी पडेलला गेल्रो होतो तेंव्हा सरांचं पत्र मला मिळालं.पण कार्यक्रम आधीच होवून गेला होता. मला सरांना भेटता आलं नाही याचं खूप वाईट वाटलं.
लिमयेलाही कांदिवलीतले सर स्पोर्टस् ऑफिसर म्हणून आल्याचं कळून तोही त्याना भेटायला गेला. पण लिमये भेटायला गेला तेंव्हा चार दिवसांपूर्वीच सर बदली होवून गेलेले होते. मी पुढच्या पाच वर्षात एम्. एड्. केलं नी बी.एड्. (फिजिकल) ही डिग्री बिन गरजेची झाली. खूप वर्षानी रत्नागिरीला गेलो असताना अकस्मातपणे लिमये भेटला. जुन्या आठवणी निघाल्या. आमची बॅच गेल्यावर खासनिस सर रिटायर्ड झाले. त्यानंतर फक्त एक बॅच झाली आणि गव्हर्नमेण्टने तिथले प्रवेश बंद केले. पाचसहा वर्षात तिथे सेवेत असलेल्या कर्मचारी वर्गाला त्यांच्या केडरप्रमाणे शासनाच्या अन्य विभागांमध्ये सामावून घेतलं नी कॉलेजला टाळं लागलं. खासनीस सरानी निवृत्त झाल्यावर वडाळ्याला नवीन फिजीकल कॉलेज चालू केल ते मात्र अद्याप कार्यरत आहे.
मध्यंतरी एकदा मी सहज कांदीवलीला चक्कर मारून आलो. तिथला बाड बिस्तारा गुंडाळून गेट सील केलेलं होतं. आता सगळा परिसर भकास नी वैराण दिसत होता. पुढे जावून आत डोकावून पहायचं धाडसही मला झालं नाही. प्रभु मुणगे हायस्कुलला होता. कधी देवगडला आल्यावर तो आवर्जून मला भेटायला यायचा. असाच तो आलेला असताना मी त्याला कांदिवलीत कॉलेजपर्यंत जावून आल्याचं बोललो. योगायोग असा कि तोही महिनाभरापूर्वी कांदिवलीला जावून आला होता. त्यालाही अशीच उद्विग्नता आली होती. स्वार्थी राजकारण्यानी आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी ४० वर्ष क्रीडा क्षेत्रात आपल्या कार्यशैलीचा ठसा उमटवणारी नामांकित संस्था नामशेष करून टाकली याचं अतीव दु:ख आम्हाला झालं होतं. आणखी दुर्दैवाची बाब म्हणजे आता तो परिसर टाइम्स ऑफ इण्डियाच्या नावाने ओळखला जात होता. कालाय तस्मै नम:! (क्रमश: )