बी. एड्. फिजीकल भाग 8
मुलींपैकी विनोदबाला, कुंदन , सुषमा , मोहिनी, चित्रे, मोने, वळवईकर, ज्युलिया या मुली मला छोटे भैय्या म्हणत. त्याही आमच्या रूमवर लेसनचीचर्चा करायला येत. त्यांना लागणारी चित्रं काढून द्यायला मला हक्काने गळ घालीत. काहीवेळा रात्री दीड दोन वाजेपर्यंत जागून मला काम पुरं करावं लागे. मग सकाळी मला उठवतानाचावरेकर माझी कानउघाडणी करी. माझ्याकडे चित्र काढून मागायला कूणी आला तर त्यालाही सुनावीतअसे.
गणेश चतुर्थी नंतरचा दुसरा गुरुवार होता. बोरीवलीचे लेसन उरकल्यावर मी परस्पर मालाडला जात होतो . मालाड स्तेशनला उतरल्या पश्चिमेला स्टेशन पासून दोनेक मिनीटाच्या अंतरावर एस्. व्ही .रोड लागे. तो क्रॉस करून पलिकडच्या तुरेल पाखाडी रोडने मावशीकडे जाता येई. तिथे कायम मरणाची रहदारी असे. क्रॉसिंगला पाच सहा मिनीटं मोडत. त्यादिवशी क्रॉसिंग करताना मी चारेक पावलं गेलो असेन नसेन तोच भरधाव आलेल्या बाईकवाल्याने मला जोरात डॅश मारला.काय होतं हे कळण्यापूर्वीच मी धाडकन् आडवा झालो. हातातलली गुंडाळ फळा, तक्ते, छत्री नी सामानाची पिशवी इतस्तत: विखुरली. मी कुशी वळूनउठणार इतक्यात सिनेमात दाखवतात तशी एक कार माझ्या दिशेने येताना दिसली. मागोमाग सिनेमात दाखवतात तसा कर्कश हॉर्नचा आणि मागोमाग कर्रऽऽर्र चुईंऽऽक् असा ब्रेकचा आणि भीषण आवाज आला. मला वाटलं बहुतेकहा शेवटचा आवाज मी ऐकत आहे नी आता आपला खेळ खलास. मी भीतीने श्री गजानन असं नाव घेत डोळे गच्च मिटून घेतले.काही सेकंदात दोन माणसं पुढे आली. त्यानी मला उठवण्यासाठी खांदे पकडले तेंव्हा मी डोळे उघडले माझ्या डोक्यापासून जेमतेम सहा इंचावर कारचा टायर होता.लोकानी माझं सामान गोळाकेलं मला रस्त्या पलिकडे नेलं. कारवाला ही खाली उतरून आला. भाई कैसे हो ...कुछ चोट वोट तो नही आई है ना.... मी हात जोडीत म्हटलं...नहीं नहीं भाई साब मै ठीक हूं ... आपकी बडीमेहेरबानी.... तोही हात जोडीत म्हणाला शुकरतो भगवानका मानो..... बाइकवालेने तुमको डॅश दिया वो मैंने देखा था , मैंए तुरंतही हॉर्न और ब्रेक मारा.... साला वि बाईकवाला भाग गया.... लोकं बोलत होती. " लगताहै ये मास्टरजी है .... देखो भाई आपका सब सामान बराबर है ना सब्र से देखिये.... मदतकर्त्यांना चरण स्पर्श करून मी सद्गदित स्वरात म्हणालो, आपके बडे एहसान है....
दसरा झाला त्यादिवशी दामूनगरला बाजुच्या झोपडपट्टी मध्ये कबड्डी टूर्नामेंट सुरू झाल्याची बातमी लागली.सहा ते रात्री दहा अकरा वाजेपर्यंत फ्लड लाईट लावून खेळ सुरू असत. आमच्या सहाध्यायींपैकी कुणी तरी एन्ट्री भरली होती. रविवारी सेमी फायनलच्या वेळी काही तरी बाचाबाची झाली. अपोझीट टीम वाले तिथलेचलोकल ते हाणामारीला उठल्यावर आमची टीम पळूनआली. आल्याआल्या ही वार्ता कळल्या बरोबर रूमवरथांबलेले सगळे लोक मेसजवळ जमले. कॉलेजचा लोगोअसलेले टी शर्ट घालून पन्नासेक लोक टूर्नामेण्ट सुरू होत्या तिथे पर्यंत पोहोचलो. दमदाटीकरणारे दोघे पोरगे अचूक सापडले. बाकीच्या तीनचार पोरांची शोधा शोध सुरू झाली. वातारवरण गरम झालेलं होतं. आमची जमात बघितल्यावर जाणते लोक पुढे आले. त्या एरियातल्या भाईला कुणी तरी त्याला बोलावून आणलं. तो बॉडीबिल्डर होता, त्याला पंडितजीच्या हॉटेलमध्येआम्ही बरेच वेळा पाहिलेलें होतं. तो आला तोचहात जोडीत. “माफ किजीये मास्टरजी..... इन पंटरोने तुम्हे पहचाना नही.... ये तो गधेहै .....” त्याचा सोबत्यानी लपून बसलेल्या तिघानाही शोधून काढून समोर आणलं.”भाई त्याना म्हणाला, “ये लोग तो गुंडा गर्दी करनेवालोमें से नही है ...... ये स्कूलमे पढानेवाले मास्टर लोग है ” आमच्या लोकाना हात धुवून घ्यायची सुरसूरी आलेली होती. पण मी प्रभु, चावरेकर यानी मध्ये पडून आमच्या लोकाना आवरलं. त्या पंटरना कान धरून पन्नास उठाबशा काढायची शिक्षा केली नी प्रकरण मिटवलं. मध्येच रखडलेली सेमी फायनल झाली. दुसरे दिवशी फायनल मध्ये आमच्याच कॉलेजची टीम जिंकली. रोख ५०० रुपये नी शिल्ड मिळालं. पुढे मार्व्याला स्काऊट कॅम्पच्या वेळी बक्षिसाच्या रकमेची पार्टी केली.
फर्स्ट टर्म संपण्यापूर्वी आम्हा प्रशिक्षणार्थींचे प्रत्येक मेथडचे दोन या प्रमाणे १६ क्रिटिसिझम लेसन्स झाले. यात माझा इंग्रजीचा. प्रभूचा गणितचा,विनोदबालाचा हिंदीचा. गोवेकरचा विज्ञानचा असे तास होते. आमचा लेक्चर हॉल खुप मोठा होता.प्लॅट फॉर्म समोर बेंचिस मांडून दोन दिवस हे सेशन चाललं. कांदिवलीतल्या हायस्कूल मधला वर्ग बोलावलेला असे. कानडे, चव्हाण हे दोन अपवाद वगळता इतर सर्वांचेच पाठ उत्कृष्ठ झाले. समिंग अप करताना प्राचार्य खासनिस आणि गोंदकर यानी माझा कौतुकानेउल्लेख केला.मी हजर झाल्यावर माझ्या मनात आरंभी निर्माण झालेला न्यूनगण्ड साफ नाहिसा झालेला. आता अनेकजण लेसन नोट काढणं, पाठा आधी सराव करणं यासाठी माझ्याकडे अक्षरश: हांजी हांजी करीत. आमचा ग्रूप लिडर डुंबरे तर दर वेळी माझी मदत घेतल्यावर हाऊस फॉर्मेशनच्या वेळी मला डावलल्याबद्द्ल हळहळ व्यक्त करायचा. अलिबाबाच्या गोष्टीत दाखवतात तसले दोन मोठे मातीचे घडे मेसजवळ ठेवलेले असत. तिथून तीन - चार मिनीटांच्या अंतरावर दवाखान्या समोरच्या नळावर दोन बादल्या भरून घेवून ते घडे रोज सकाळीताज्या पाण्याने भरावे लागत. रोज आळीपाळीने दोन जणाना ड्युटी लागायची. ते किमान तासाभराचं काम होतं .त्या साठी त्याना मॉर्निंग असेंब्लितूनसवलत मिळे. माझी पाळी आली की अनभुले पैलवान,ग्रुप लिडर डुंबरे, काझी आणि माझ्याकडून चित्रं,लेसन नोट काढून घेणारे कदम, पाटील,धडस, कोटनीस हे सहाध्यायी असेंब्लिहून आल्यावर माझ्या वाट्याचा घडा भरीत असत.
दिवाळी सुटी संपून सेकंड टर्म सुरू झाली. माझ्याकडून चित्रं काढून घेणाऱ्या मोहिनी, कुंदन, चित्रेयानी मला खोके भरभरून दिवाळीचा फराळ आणून दिला. विनोदबालाने तर तर एक सुंदर टर्किश टॉवेल भेट म्हणून दिला. भरपूर लांबरुंद, फिक्कट गुलाबी रंगाचा मऊसूत असा तो टॉवेल खूप महागडाहोता. माझ्याकडे मालाडच्या मावशीने दिलेला एक सुती टॉवेल होता. तिच्या निवसकर नावाच्या मैत्रिणीची छोटी मुलं माझ्याकडे शिकवणीला येत. तिच्या मिस्टरनीही दिवाळी भेट म्हणून मला छनसा टॉवेल दिलेला होता. तो मी वापरायलाही सुरूवात केली होती. म्हणून बालाने दिलेला टॉवेल मी प्रभूला भेट दिला. टर्म सुरू त्याच दिवशी असेंब्लीन घेता आमच्याकडून क्रीडांगण आणि मेस ते लेक्चर हॉल -ऑफीस पर्यंतच्या रस्त्याच्या कडेची साफसफाई करून घेण्यातआली. सर्वाना एकेक धारदार विळा दिलेला होता. पावसाळ्यात उंच गोंडेरी गवत आणि खाजकुयली वाढत असे. ते कापून त्याचे जागोजागी ढीग करून ते पेटवून देण्यात येत. खाजकुयली आणिगवताचे तुरे जरा लागले तरी प्रचण्ड खाज व्हायची. पण घाटावरच्या सगळ्या मुलाना हे माहिती नसल्यामुळे चांगला प्रसाद मिळाला. आम्हा कोकणातल्या लोकाना या गोष्टी माहिती होत्या. म्हणून आम्ही जपून काम करायचो. आमचा गट रस्त्याच्या कडेला काम करीतअसताना मी आणि टी. बी. पाटील लीडरला सांगून लघुशंकेसाठी जरा लांब झुडुपाच्या आडोशालागेलो. आम्ही आलो तेव्हा आमच्या गटावर देखरेख करणाऱ्या प्राध्यापकांच लक्ष गेलं . (मी त्यांचा नामोल्लेख जाणीव पूर्वक टाळीत आहे.) त्यांचे कोणी नातेवाईक सचिवालयात मोठ्या हुद्द्यावर होते म्हणून तेजरा रुबाब दाखवायचे. आम्हाला काहीही बोलू नदेता ते म्हणाले, “कायरे? ही काय मोगलाई वाटली काय तुम्हाला? तुम्ही काम न करता मजेतफिरत राहिलात तर कामं कोण तुमचा बाप करणार?”
सरानी बाप काढला ही बाब माझ्या जिव्हारी लागली. मी त्याना चांगला धडा शिकवायच असं ठरवूनच बोललो,सर आधी शब्द मागे घ्या. आम्ही लीडरची परवानगी घेवून लघवी करायला गेलो होतो. पाहिजे तर आम्हाला शिक्षा करा. पण आमचा बाप काढणं तुम्हाला शोभतं का? जरा विचार करा.” (क्रमश:)