बी. एड्. फिजीकल भाग 9
तो माणूस फार घमेण्डखोर नी उर्मट होता. माझी कॉलर धरून धमकावीत ते बोलले, “काय रे फुकण्या मला काय समजलास रे तू? तुझी औकात काय?” आता मात्र माझा संयम सुटला त्यांचा हात झिंजाडून बाजुला होत मी चिडून म्हणालो, “तुम्ही मोठे अहात, तुमचा आदर ठेवूनच मी बोलतोय्.... पन तुम्ही मला गुंडा सारखं वागवलत. मी काही ऐरा गैरा नाही. रत्नागिरीचे शिक्षक आमदार ज.ग.भावे यांचा मी विद्यार्थी आहे. माझी काहीही चूक नसताना तुम्ही माझा बाप काढलात, औकात काढलीत....मीआमदार भावेसरांकडे न्याय मागेन. त्या आधी मी ही गोष्ट प्राचार्यांच्या कानावर घालतो.”आता मात्र सरांच्या पाया खालची वाळू सरकली.त्यांचा चेहेरा पडला. आमच्या भोवती जमलेल्या मुलांवर ते ओरडून म्हणाले, “ इथे काय तमाशा चाललाय का? चला चालते व्हा इथून. आपलं काम करा. ” मुलं बाजुला गेली. ग्रूप लीडर म्हणाला, सर हे मला सांगून गेले होते. अरे काळे आता सोडून दे विषय ... सरांचा काहीतरी गैरसमज झाला. तू काय एवढं मनाला लावून घेतोस?”
मी डोळ्यात पाणी आणून म्हणालो “मी काय खून केलेला नाही कोणाचा.... माझं काय व्हायचं असेल ते होवो.... हे उच्च विद्या विभूषित प्राध्यापक..... आमचा बाप काढणं शोभतं का याना? मला गुंड समजून माझी कॉलर धरली सरानी..... मी हे प्रकरण धसाला लावणार.” आता मात्र सर पुरते वरमले माझ्याजवळ येवून माझ्या पाठीवर थोपटून ते म्हणाले, “काळे , काल आमची ड्रिंक पार्टी झाली त्याचा हॅंन्गओव्हर होता. सकाळी माझं नी मिसेसचं कडाक्याचं भांडण झालं त्या रागाचा वचपा तुमच्यावरनिघाला. मला खरंच तुमचा इन्सल्ट करायचा नव्हता, चुकून नको ते शब्द माझ्या तोंडून गेले. प्लीज बी क्वाईट.....” मी त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तेंव्हा मात्र हात जोडीत सर म्हणाले, “प्लीज काळे......हे प्रकरण वाढवू नका. आमदार भावेना मी ओळखतो.ते माझ्या वडिलांचे मित्र आहेत. प्लीज....ही गोष्ट प्राचार्यां पर्यंत नेवू नका मला प्रमोशन ड्यू आहे.... तुम्ही हे प्रकरण धसाला लावलंत तर मला कामाला लावाल.......” मी मग काही न बोलता बेणणीच काम सुरू केलं. सरानी ग्रूप लीडर डुंबरेला बाजूला घेवून त्याच्याशी काहीतरी गुफ्तगू केलं.
डुंबरे माझ्या जवळ येवून म्हणाला, “काळे..... अरे सर भलतेच टरकले आहेत. ते म्हणाले की काळेला काही काम न करता बसून रहायला सांग. मी काही बोलणार नाही. पन ही गोष्ट प्राचार्यांपर्यंत जायला नाही पायज्ये..... तू खरंच बसून आराम कर.... किती झालं तरी ते आपले सर आहेत आपण कुटलंत्याना पुरं पडणार..... सोडून दे, नी गप रहा” दहा वाजता प्राचार्य ऑफ़िसला जाण्यासाठी रस्यावरून येताना दिसले तेव्हा ते जवळ येण्या पूर्वी सर माझ्याजवळ येवून म्हणाले, “काळे तुमचा माझ्यावरचा राग गेला की नाही? प्लीज ही गोष्ट प्राचार्यांपर्यंत नेवू नका. या पुढे माझ्याशी संबंधित काही अॅक्टिव्हीटी असेल तेंव्हा मी तुम्हाला कायम सवलत देईन.” मग मी म्हणालो, “ठीक आहे सर, तुम्ही माझी कॉलर पकडलीत ते ही खटकलं मला. मी काही गुंड नाही. पण मी झालं गेलं सोडून देतो. तुम्ही माझ्याबद्दल आकस ठेवू नका.”आता मात्रं सरांच्या डोळ्यात पाणी तरळलं. माझ्या पाठीवर थोपटून सर म्हणाले, “सो सॉरी....माझा खरंच तोल गेला.” अकरा वाजता लंच ब्रेक झाला.
आम्ही रूमवर जाईपर्यंत माझी नी सरांची भानगड षट्कर्णी झालेली होती. आमचा ग्रूप माझ्यावर भलताच खूश झाला. कारण ते सर सगळ्यानाच अद्वा तद्वा करीत. सगळ्यानी अगदी चवीचवीने डुंबरे नी टी.बी. पाटीलचं वर्णन ऐकून घेतलं. रावूळ म्हणाला,“मेलो लय घमेण्डी... काळ्यान बरी चाक उतरल्यान तेची... पण काळे तूसंध्याकाळी तेंका भेटॉन माझा चुकला असा म्हण. माजा आयक् तू, तेका मिळालो येवडो दनको पुरे झालो. तेना खुन्नस ठेवल्यान तर तुका भारी पडात..... नी आपल्याक कायव करून फक्त बी.एड्.पदरात पाडून घेवचां हा....ते़वा संध्याकाळी तेंका भेटोन चूक माग, नी राग धरू नका अशी विनंती कर. तेच नाय , ह्येच्या फुडे खैचोच प्राध्यापक तुका तरास देणार नाय. ही गोस्ट कॉलेजभर झाल्याशिवाय ऱ्हवणार नाय. ” आता दुपारी अडीच वाजता पुन्हा कामाला यायचं होतं. संध्याकाळ पर्यंत सगळी मुलं नी प्राध्यापक यांच्याही कानावर सगळ्या गोष्टी गेल्या होत्या. बेणणी झाल्यावर ग्राउंड मार्किंग करायचं होतं. हे काम दोन तीन दिवस चालायच होतं.तो पर्यंत लेक्चर्स बंद होती.
दुपारी आम्ही पुन्हा कामाला लागलो. तासाभराने ग्राऊंड ची साईड बेणून झाल्यावर प्रा. कांग़णेआणि 'ते' सर यानी ट्रॅक मार्किंगसाठी काही मुलं घेतली. त्या सरानी या कामासाठी मला बोलावून घेतलं. मी त्याना बाजुला घेवून राऊळने सांगितल्या प्रमाणे सराना नमस्कार करून सारवा सारवी केली नी माझ्याबरोबर प्रभू नी चावरेकर यांचीही वर्णी लावून घेतली. हे निवांत काम होतं. टेप धरणं. चेन ने मार्किंग डॉट टाकणं. चॉक पीट टाकणं अशी हलकी कामं होती. संध्याकाळी असेंब्ली संपवून जात असताना प्रा. गोंदकर, प्रा. शिंदे नी प्रा. कुलकर्णी यानी मला बाजुला बोलावून घेतलं.'त्या' सरांशी झालेली गोष्ट त्यांच्याही कानी गेलेली होती. त्या संदर्भातच मी पुढे जावून काय करणार आहे कि काय? याची माहिती त्याना काढायची होती.त्यानी विषय काढल्यावर मी अगदी जपून शब्द वापरीत तपशील सांगितला."सरानी माझी कॉलर धरली नी बाप काढला हे मला खटकलं" एवढंच बोललो.
गोंदकर सर बोलले, “ते जरा शॉर्ट टेंपर आहेत. त्यांचे नी मिसेसचे क्लॅशेस झालेले होते म्हणून ते तोल गेल्या सारखं वागले. पण यापूर्वी त्यानी कधिच कोणत्या विद्यार्थ्याशी असं वर्तन केलेलं नाही." मग प्रा. कुलकर्णी म्हणाले, " तुम्ही प्राचार्यांकडे,तुमचे कोण आमदार आहेत त्यांच्याकडे तक्रार केलीत तर त्यांच्या अंगलट येईलच पण कॉलेजच नावही बदनाम होईल. तेव्हा तुम्ही ही स्टेज गाठू नका." प्रा. शिंदे म्हणाले,“तुम्ही पुढे काय करणार अहात?" त्यावर मी बोललो," रागाच्या भरात आपण योग्य केलं नाही हे त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे मी आता त्यावर पडदा टाकलाय. मी सुसंकृत कुटूंबात वाढलेला आहे. माझे वडिल शिक्षक आहेत.मी सरांविरुद्ध असं काही पाऊल उचललं तर त्याना आवडणार नाही. मी तो विषयच मनातून काढूनटाकला."प्रा. गोंदकर माझी पाठ थोपटीत म्हणाले, "शाबास, तुम्ही ही गोष्ट धसाला लावणार नाही याची मला खात्री होतीच."
४०० मीटर रनिंग ट्रॅक मार्कीग हे कसबाचं असतं. दोन साईडला स्ट्रेट लाईन मार्क केल्यावर चेन ने मेजर प्रमाणे कर्व्ह लाईन मार्क करून घेतात. हे अचूक कराव लागतं. स्टँडर्ड ट्रॅक च्या स्ट्रेट पेक्षा कर्व्ह जादा ठेवायचा असतो म्हणजे अॕथलिच वेगाने पळताना बॅलन्स जाण्याचा धोका रहात नाही. दुसरे दिवशी सकाळ सत्रात बेणणी पूर्ण झाल्यामुळे सगळीच मुलं ग्रूपवाईज ग्राऊण्ड मार्किंगला लागली होती. आठ रनिंग ट्रॅक मार्किंग़ झाल्यावर आतल्या भागात गोळा, भाला, थाळी फेक, मैदानं मार्किंग करून झाली. मग कबड्डी, व्हॉली बॉल, फूटबॉलची ग्राउंड मार्क केली. बास्केट बॉलचं पीच डिस्पेन्सरी जवळ लॉन होतं तिथे मार्क करायचं होतं . गेमची कोर्टस् मार्क करायचं काम तीन दिवस चाललेलं होतं. सगळेजण मार्किंगच्या कामात मात्र हौशीने सहभाग देत होते. कारण भविष्यात आमच्या संस्थांमध्ये ही जबाबदारी आमच्यावर येणार होती. ह्या कामाला चॉकपीटची पंचवीस तीस पोती लागली. आता लांबून बघितल्यावर ग्राऊंड इतकं सुंदर नी विलोभनीय दिसायला लागलं की कधीएकदा इव्हेंट सुरू होतात असं वाटायला लागलं. दुसरे दिवशी उंच उडी, लांब उडी आणि हाफ स्टेप जम्प ट्रेनिंग सुरू झालं. हाय जम्प चं ट्रेनिंग 'ते' सर देत. ते म्हणाले , हेवी वेट वाल्याना हाय जम्प अवघड जाते. कान फोडलेले पैलवान गडी आहेत ना त्यांचा इथे उजेड नाही पडायचा.या इव्हेण्टमध्ये परफॉर्मरची बॉडी हलकी असली पाहिजे. ( क्रमश:)