बी.एड्. फिजीकल भाग २२
(अंतीम भाग )
कांदिवलीची कार्य प्रणाली अशी होती की अगदी ग़ोणपाट छाप प्रशिक्षणार्थी सुद्धा शेवटी शेवटी कां होईना वर्गात बऱ्यापैकी टिकायला लाग़ते. सातत्यपूर्ण सराव आणि निरिक्षण यातून माणूस घडतो हे इंगित वर्षअखेअरीला मला उमगलं. त्या काळी कांदिवलीतला शिक्षकआणि तिथलं प्रशिक्षण हा शारिरीक शिक्षण क्षेत्रातला ब्रॅण्ड होता. आज असं एखाद्या क्रीडा प्रशिक्षण महाविद्यालयाचं नाव ठेपून घेता येत नाही हे वास्तव आहे. १९३८ मध्ये महाविद्यालय स्थापन झाल्यावर तत्कालीन ब्रिटिश प्राचार्य हे नामांकित शिक्षण तज्ञ होते. आज मला त्यांचं नाव स्मरत नाही आणि गुगलवरही कांदिवली शा.शिक्षण महाविद्यालयाची काहीही माहिती उपलब्ध होत नाही.
कांदिवली महाविद्यालया इतका प्रशस्त परिसर क्वचितच एखाद्या महाविद्यालयाला लाभलेला असेल. इथे ४०० मीटरचे आठ ट्रॅक शास्त्रशुद्ध बसतील अशी दोन भव्य क्रीडांगणं होती. कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर तर आदर्शत्वाचा वस्तुपाठच होता. जिममध्ये कुस्तीसाठी मातीचा हौदा होता. जिम तर एवढा मोठा होता की पाऊस असेल त्या वेळी पाच सहा गट मुक्त सराव करू शकत. खासनीस सर हे त्याच महाविलयातले पदवीधर. पुढे पोस्ट ग्रॅज्युएट होवून त्यांनी याच ठिकाणी आपलं करियर सुरू केलं, आमची बॅच हे सरांच शेवटचं वर्ष. हे महाविद्यालय शासन बंद करणार हे त्यानी बरोब्बर ओळखलेलं होतं,म्हणून कांदिवलीतून बाहेर पडल्या पडल्या त्यानी वडाळ्याला नवीन शारिरीक शिक्षण कॉलेजची मुहूर्तमेढ रोवली.
शिक्षक म्हणून माझी जडण घडण कांदिवलीने केली. बी.एड्. हे प्रशिक्षणच असं आहे की शारिरीक, बौद्धिक आणि भावनिक असा त्रिस्तरीय विकास बी. एड्. मुळे होतो. माझ्या सद्भाग्याने तज्ञ व्यासंगी प्राध्यापक मला लाभले.आरंभीच्या प्रतिकूल वाटलेल्या परिस्थितीने मला असं काही घडवलं पुढच्या आयुष्यात अनेक जबाबदाऱ्या पेलून आलेल्या आव्हानाना यशस्वीपणे तोंड देता येईल असं सामर्थ्य मला कांदिवलीत लाभलं.'त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक' या उक्तिप्रमाणे स्वसामर्थ्याची जाणीव मला कांदिवलीने करून दिली. इतकंच नव्हे तर कायम चरितार्थाचं साधन प्राप्त करायला मी कांदिवली मुळे सक्षम झालो. प्रशिक्षण पूर्ण होण्या आधीच मला तीन ते चार ठिकाणांहून सेवेच्या संधी चालून आलेल्या होत्या.
त्यावेळी अप्रशिक्षित पदवीधर म्हणजे न घरका न घाट का अशी तऱ्हा होती. फी डोनेशन यासाठी पुरेशी पुंजी नसल्याने सडत असलेल्याना कांदिवलीने पोटाशी कवटाळून घेतलं. असंख्य विद्यार्थी प्रशिक्षित पदवीधर हे बिरूद मिळवून उच्चपदाला पोहोचले. वसतीगृह सुविधा मोफत होती. फक्त फॉर्म फी आणि दुवक्त भोजन एवढ्या अल्प खर्चात मुंबई सारख्या मायानगरीत दहा महिने अगदी राजेशाही थाटात राहून उज्वल भवितव्याकडे वाटचाल करता येण्याची सुवर्ण संधी कांदिवलीने बहाल केली. शिस्तीचा बडगा असला तरी जाच नव्हता. मला प्रवेश मिळाला नसता तर मला काय भवितव्य होतं? हा प्रश्न मनात आला की कृतज्ञतेने माझं मन भरून येतं नी आपोआप हात जोडले जातात.
माझ्यासारख्या परिस्थितीशी झगडून वर येवू पाहणाराना संधी मिळाली की न्यूनगंड नाहिसा होवून स्वकर्तृत्वाची जाणीव व्हायला लागते आणि आत्मविश्वास वाढतो. अशी चतुरस्त्र संधी मला कांदिवलीत मिळाली. इथेच मिश्र संकृती, भिन्न भिन्न स्वभाव आणि वृत्तीच्या समूहात राहून मी माणसं ओळखायला शिकलो. इथेच जीवाला जीव देणारे सुहृद मला भेटले. रक्ताच्या नात्याइतकी पवित्र नाती जुळावी असे 'आप्त' मला या दहा महिन्याच्या अवधित भेटले. कांदिवलीने दिेलेलं अनुभवाचं पाथेय मला अगदी या क्षणापर्यंत पुरतं आहे. त्या संस्थे बद्दलचं ऋण व्यक्त करावं आणि निदान साहित्य विश्वात तरी या संस्थेच्या नावाचा ओबड धोबड कां होईना ? चिरा उभा करावा; माझ्या असंख्य वाचकांच्या मना मनात स्मृती ज्योत जागवावी यासाठीच तर हा सारा प्रपंच.
**************
आता मनीचे ऐका थोडे ..........
मी १९९० पासून चालु २०२५ साला पर्यंत जवळ जवळ ८० लघुकथा लिहिल्या आहेत. सगळ्या कथा छापिल मिडियात दिपावली अंकामध्ये प्रसिद्ध झाल्या. माझे ३ कथासंग्रह प्रसिद्ध झाले. २० २० नंतर मास मिडियात ई पोर्टल ही संकल्पना झपाट्याने विकसित होवू लागली. आरंभी प्रतिलिपी पोर्टलवर मी काही कथा दिल्या. पण त्या पोर्टलवर धारावाही मालिका हा प्रकार मुख्यत्वे लोकप्रिय असल्याने मला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. नंतर पाच सहा महिन्यानी मातृभारती वेब पोर्टलची माहिती मिळाला. या पोर्टलवर धारावाही मालिका आणि लघुकथा या दोन्ही प्रकाराना वाचकांचा चांगला प्रतिसाद असल्याचे दिसून आले. म्हणून मी तिथे कथा पहिल्याच कथेला भरगोस प्रतिसाद मिळाल्यावर मी त्या पोर्टलवर नियमितपणे कथा पोस्ट करायला सुरुवात केली. तसतसा वाचकांचा प्रतिसादही वाढायला लागला. आज माझ्या ६६ कथा मातृभारतीवर प्रसिद्ध झालेल्या असून ८३, ३०० एवढे वाचक आहेत.
मातृभारतीवरचे काही वाचक मला फोन मेसेज मालिका लिहावी असा आग्रह करीत असतात. म्हणून आपण अशी एखादी धारावाही मालिका/लघु कादंबरी लिहावी असा विचार गेली दोन वर्षे मनात घोळत होता. पण त्यासाठी योग्य विषय मला अलिकडेच सुचला.मी ३००ते ४०० शब्दांपर्यंतच्या अनेक दीर्घ कथा लिहीलेल्या असल्यामुळे बी.एड्. फिजीकल ही १८००० पेक्षा जास्त शब्द संख्या असलेली मालिका हातावेगळी करता आली. छापील मिडिया माध्यमात कथासंग्रह प्रसिद्ध करणे हे थोडेसे जिकीरीचे काम आहे. चांगला प्रकाशक गाठायचा तर साहित्य विश्वात साहित्यिक म्हणून प्रसिद्धी असावी लागते. त्यासाठी तुमची साहित्यिक वर्तुळात उठबस असणे अपरिहार्य आहे. मला लेखक म्हणून ओळखणारे असंख्य वाचक आहेत. पण सिंधुदुर्ग मधिल साहित्यिक वर्तुळात मला फारशी ओळख नाही. म्हणून दर्जेदार लेखन केलेले असून मला फक्त तीनच कथा संग्रह पसिद्ध करता आले.
मातृभारतीवर कथाप्रसिद्ध करता करता मला श्री. सुनीळ सामंतांचे ई साहित्य प्रतिष्ठान गवसले. हे प्रतिष्ठान गल्ल्लाभरू हेतूने सुरू केले नसून तो उदात्त हेतूने सुरू केलेला साहित्य यज्ञ आहे. वाचकाना भरभरून सहित्य उपलब्ध व्हावे आणि लेखकाना चांगले व्यासपीठ मिळावे या विशुद्ध आणि निरपेक्ष भावनेने सामंतानी प्रतिष्ठानचा वसा सुरू ठेवलेला आहे. ई साहित्य हे चिरंतन टिकणारे माध्यम आहे. यामध्ये वाचकाना मुक्तद्वार प्रवेश असल्यामुळे वाचकांची संख्या दिवसे दिवस वाढत आहे. या साहित्य यज्ञात निरपेक्ष हेतूने सहभाग द्यायचा म्हणून मी आज पर्यंत सहा कथासंग्रह प्रसिद्ध केले असून ही मालिकाही ईबुक रुपाने प्रसिद्ध करणार आहे. शासकीय शारिरीक शिक्षण महाविद्यालय, कांदिवलीची अल्पांशाने तरी माहिती मिडियावर कायमस्वरूपी टिकून राहील.
'बी.एड्. फिजीकल कॉलेज कांदिवली' ही काही काल्पनिक घटना प्रसंग यांची गुंफण नाही. १९७७/७८ शैक्षणिक वर्षात प्रशिक्षण पूर्ण करीत असताना मला आलेल्या अनुभवांची ही मालिका आहे. यात नमूद केलेले प्रसंग,घटना आणि व्यक्ति उल्लेख हे तत्कालिन वास्तव आहे. काही वर्णने अतिशयोक्त वाटावी इतकी अद्भूत आणि रंजक आहेत पण ती सत्य आणि सत्यच आहेत. त्या शैक्षणिक वर्षातील माझ्या समग्र अनुभवांचा लेखाजोखा घ्यायचा शिकस्तीचा प्रयत्न मी केलेला आहे. अर्थात माझे अनुभव शब्दबद्ध करताना ते रटाळ नी एकसूरी होवू नयेत याचा शिकस्तीचा प्रयत्न मी केलेला आहे. त्यामुळे वाचकाना एखादी अद्भुतरम्य कादंबरी वाचीत आहोत असे वाटेल, याचा मला भरवसा आहे. या अनुभव कथनात अनेक ठिकाणी मी ड्रॉईंग स्केचेस, आरेखने आणि अक्षर लेखन केल्याचे उल्लेख आहेत.
पण वास्तवात मी काही कला शिक्षक नाही. पण ८वी ते १०वीत तीन वर्षं आम्हाला चित्रकला हा ऐच्छिक विषय होता. ड्रॉईंगच्या एलिमेण्टरी आणि इंटर मिजिएट या दोन परीक्षा मी दिलेल्या होत्या. मला लाभलेले कला शिक्षक , पडेल हायस्कूलचे महांबरे आणि खारेपा टण हायस्कूलचे मेस्त्री सर हे तासाला वर्गात फिरून मुलांच्या वहीत त्यानी काढलेली चित्रे दुरुस्त करून देत असत. त्यामुळे मला चित्रकलेची दृष्टी लाभली आणि आरेखनाचा चांगला सराव झाला . मराठी शाळेत असताना फडके गुरुजीनी पुस्ती लेखन शिकविताना बोरू कसा छाटायचा आणि त्याचा छाट स्थिर ठेवून अक्षरे कशी काढायची? हे अक्षरश: हाताला धरून शिकविलेले होते. मी स्वत:च्या कल्पनेने आरेखन करू शकत नाही. पण नमुना पाहून चित्रे काढू शकतो. हे कसब मला आयुष्यभर पुरले. १९८६ नंतर मी देवगड अध्यापक महाविद्यालयात प्राध्यापक झाल्यावर दिग्दर्शन पाठ सादर करताना मी स्वत: काढलेली चित्रे, शब्द पट्ट्या नी तक्ते वापरीत असे.
शारिरीक शिक्षण महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य, सर्व प्राध्यापक, कर्मचारी, मेसमधील नोकर वर्ग, नव्व्याण्णव सहाध्यायी आणि मला सहाय्य करणारे मुंबईस्थित आप्त आणि परिचित कै. सौ. विद्या /विष्णू उकिडवे, कै. सौ. नीला/ निळकण्ठ गोखले, सौ.वैशाली/श्री.विजय गोखले, तसेच मला प्रवेश मिळण्या साठी मनापासून सहकार्य करणारे श्री. भगवती हायस्कूल मुणगेचे हेडमास्तर श्री.हरीभाऊ सुबराव चिले, प्रशिक्षण काळात माझ्यावर बंधु भगिनीवत् माया करून मला जपणारे राघोजी प्रभू, आत्माराम रावूळ, अरूण फडणीस, सदाशिव चावरेकर, विनोदबाला शर्मा, मोहिनी चित्रे, या सर्वांचे ऋण मी व्यक्त करू इच्छितो. यापैकी प्रभू आणि फडणीस हे आज या जगात राहिलेले नाहीत. शर्मा, चित्रे यांच्याशी माझा संपर्कही राहिलेला नाही.
मला आणखी एकाच गोष्टीचे अतीव दु:ख होते की, आदर्श कार्यप्रणाली जपून क्रीडाविश्वात माईल स्टोन ठरलेले शारिरीक शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय समूळ नेस्तनाबूत करायचे नष्टचर्य तत्कालिन राजकारण्याना कां सुचले असेल? या कॉलेजचे नामोनिशानही आता उरलेले नाहे. निदान परिकथे सारखे कां असेना या महाविद्यालयाचे नाव तरी ई पोर्टलवर शाबूत रहावे म्हणून शारिरीक शिक्षण कॉलेज, कांदिवली असा नाव निशीवार उल्लेख शिर्षकाद्वारे मी करून ठेवला आहे. जो वाचील त्याला कॉलेजचे अल्पांशाने दर्शन तरी नक्की घडेल आणि त्याच्या भावविश्वात ते घर करून राहील.
प्रा.श्रीराम काळे
बी.ए.बी.एड्.( फिजीकल) एम्,ए. एम्.एड्. एम्.फिल्.
शारिरीक शिक्षण महाविद्यालय, कंदिवलीची प्रार्थना
हे जगत्राता विश्वविधाता हे सुखशांती निकेतन हे
प्रेमके सिंधू दीनके बंधू दु:ख दारिद्र्य नि वारण हे
नित्य अखंड अनंट अनादि पूर्णन् ब्रह्म सनातन हे
जग आश्रय जगपती जगवंदन अनुपम अलख निरंजन हे
प्राणसखा त्रिभुवन प्रतिपालक जीवनके अवलंबन हे
हे जगत्राता विश्वविधाता ........
॥ कृतार्थो ऽस्मिती ॥
लेखन पर्व समाप्त