🌿🌿 अंबाडीची भाजी
🌿 अंबाडीची भाजी बरेच लोकांना खूप आवडते
🌿 खरेतर लग्नापूर्वी मला ही भाजी फारशी आवडत नसे
माझी आई ही भाजी शिजवुन पिळून पीठ लावुन वरती लसणाची चरचरीत फोडणी देऊन करीत कोरडी करत असे
वडील त्यावर अगदीं ताव मारत असत😋
मला मात्र ही भाजी केली की सोबत गुळांबा लागत असे 😀
मग कुठे चाखत माखत जेवण होई😀
🌿 लग्नानंतर मात्र सासुबाईंनी केलेली ही भाजी जेव्हा पहिल्यांदा पानात पडली
तेवहा मुकाट खावी लागली
(तेव्हा गुळांबा वाढायला आई समोर नव्हती.. शिवाय पानात काही टाकायचे नाही हे पण वळण होतें)
त्या दिवशी सासुबाईंनी ही भाजी त्यांच्या पद्धतीने केली होती
जी मला अतिशय आवडली
आणि मग कायमच आवडू लागली
सासुबाई ही भाजी इतकी चविष्ट करीत की त्यांच्या हातची ही भाजी खायला त्यांचे दिर किंवा इतर नातेवाईक आवर्जून येत असत
त्या सुध्दा ही भाजी भरपूर प्रमाणात करीत
शेजारी पाजारी लोकांना वाटीत अथवा डब्यात घालुन देत..
जेव्हा अंबाडी खुप छान मिळत असे त्या सिझन मध्ये त्या शेजारी असणाऱ्या त्यांच्या दोघा दिरांना आवर्जून जेवायला बोलावून घेत असत..
ते पण अशा बोलावण्याची वाट पाहत असत
अगदीं त्यांच्या जावांनी सुध्दा या भाजीतले बारकावे त्यांच्याकडून शिकून तीच पद्धत चालू ठेवली..
आमचे अहो तर ती भाजी चक्क नुसती कांदे पोह्या सारखी बशीत घेऊन खात असत 😀
मी पण ही भाजी सासूबाईंकडून शिकुन घेतली
पण प्रत्येक वेळी करताना त्यांच्या हातची चव मात्र आठवतेच...❤️
🌿 मी ही भाजी आवडीने खाते समजल्यावर आईला नवल वाटले
घरी ही मुलगी भाजी पानात घातलेली कशीतरी खात होती..... आणि आता आवडते म्हणते 😀😀😀
मग मी तीला ही त्यांच्या पद्धतीची भाजी खाऊ घातली...
तीला सुध्दा इतकी आवडली की तिने माझ्याकडुन शिकून घेतली...❤️
आणि ती सुद्धा त्या प्रकारे ही भाजी करू लागली..🙂
🌿 या दिवसात अंबाडी खुप चांगली मिळते
लगेच सासूबाईंच्या पद्धतीने ही भाजी केली ..
🌿 प्रथम अंबाडीच्या भाजीची पाने काढून बारीक चिरून घेतली
एका पातेल्यात ही भाजी बुडेल इतके पाणी घालून झाकण लावुन शिजवून घेतली
🌿 ही नावाप्रमाणेच आंबट असल्याने गार झाल्यावर
त्यातले पाणी काढून ती चांगली पिळून घेतली
🌿 पिळून घेतलेली भाजी बाजूला ठेवली
एक लहान वाटी तांदुळ व एक वाटी शेंगदाणे (काही ठिकाणी डाळ पण घालतात) कुकर मध्ये कमी पाण्यात शिजवून घेतलें
(फार मऊ तांदुळ शिजवू नये)
🌿 गार झाल्यावर ते हाताने मोकळे करून घेतले
माझ्याकडे लाल तांदुळ होता त्यामुळे तो चांगला फडफडीत शिजला होता जसा या भाजीला आवश्यक आहे
🌿 एक मोठा कांदा चिरून घेतला
सात आठ लसूण पाकळ्या सोलुन घेतल्या
पातेल्यात थोडे जास्त तेल घालुन मोहरी हींग लसूण घालुन फोडणी केली
त्यात कांदा परतून घेतला
🌿 एका वाफेनंतर
शिजवलेले तांदुळ व शेंगदाणे घालून परत झाकण ठेवले एक वाफ आणली
नंतर पिळून ठेवलेली अंबाडी हातानी मोकळी करून घातली
हळद, तिखट, मीठ घालुन सर्व मिसळून घेतले
व ती त्या पातेल्यात घालून चांगली मिसळून परत झाकण ठेवून वाफ आणली
🌿 तयार भाजी खाली काढल्यावर परत एकदा तेलात मोहरी हिंग घालून लसणाच्या पाकळ्या लाल करून ती चरचरीत फोडणी भाजीवर ओतली.
🌿 खुप खमंग चरचरीत ही भाजी भाकरी सोबत छान लागते 😋