प्रतीक्षा तुझ्या आगमनाची
डॉ. स्वाती अनिल मोरे
शिव पार्वतीच्या लाडक्याची
आतुरता समस्त जनाला
गौरी नंदनाच्या आगमनाची
एकदंत , लंबोदर
सुखकर्ता तूच दुःखहर्ता
आम्हा सर्वांचा पालनकर्ता
देवता तू बुद्धीची
म्हणूनच व्यासांनी
महाभारत लिहितानी
निवड केली उमापुत्राची...
भक्तांची विघ्न हारणारा
त्यांसी संकटातून तारणारा,
विघ्नहर्ता, तूच अधिपती
प्रत्येक शुभ प्रसंगी
पूजन तुझे प्रारंभी
उच -नीच ,गरीब- श्रीमंत
विसरुनी धर्म अन् जात
तुझ्या दरबारात
नतमस्तक सारे होतात
गणेश चतुर्थीच्या दिवशी
ढोल ताशांच्या गजरात
आगमन तुझे घराघरात
करण्या स्वागत तुझे
सारी सृष्टी ही नटली
बरसून मेघराजाने
जणू दिली
तुझ्या आगमनाची वर्दी
नेसलासी पितांबर
गुलाबी रंग तयाचा असे
सोन्याहूनी पिवळे उपरणे
त्यावरती शोभून दिसे
आवड तुझी लक्षात घेऊन
नैवेद्याची केली तयारी छान
उकडीचे मोदक अन् पंचपक्कवांन्न
यांनी सजले केळीचे पान
चरणी अर्पण केली
हिरव्या दूर्वांची जुडी
तुझ्या आरतीची
लागली आम्हा गोडी
लाडक्या लंबोदराला
मूषक वाहन शोभते
हरपून भान, रूप तयाचे
डोळ्यात मी साठवते
अर्पून फुलं,फळं,हार,दुर्वा
बाप्पाला मी पूजते.
स्वागत पार्वती नंदनाचे
चला थाटात करूया
"गणपती बाप्पा मोरया"
असे जोशात म्हणूया...