पुस्तकाचं नाव : स्वामी
लेखक : श्री. रणजीत देसाई
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस
पुस्तक परिचय : डॉ. स्वाती अनिल मोरे
"स्वामी" ही थोरल्या माधवराव पेशव्यांची जीवनगाथा. लेखक रणजित देसाई यांची पहिलीच ऐतिहासिक कादंबरी. यानंतर त्यांनी "राधेय", "श्रीमान योगी" यांसारख्या उत्तमोत्तम कादंबऱ्या लिहिल्या, पण समाजात त्यांची ओळख निर्माण झाली ते "स्वामी"कार म्हणूनच!
थोरले माधवराव पेशवे यांचे राजकीय जीवन,कर्तृत्व आणि त्यांचे वैयक्तिक जीवन याचे अतिशय उदात्त व प्रभावी चित्रण स्वामीत केलेले आहे.
राखेतनं उठून आकाशाकडे झेप घेणाऱ्या फिनिक्स पक्षाबद्दल आपण ऐकलंच असेल.
मराठा साम्राज्याच्या इतिहासातील अश्याच एका फिनिक्स पक्ष्याची - थोरल्या माधवराव पेशव्यांची ही कहाणी...
दौलतीच्या जिव्हारी चटका लावणाऱ्या पानिपतच्या पराभवानंतर झालेलं अमाप नुकसान, अवघ्या १०-११ वर्षांत भरून काढत देशात पुनश्च मराठा वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या या तडफदार पेशव्याचं राजकीय आयुष्य जितकं दैदिप्यमान, थरारक घटनांनी भरलेलं, तितकंच हृदय पिळवटून टाकणाऱ्या, करुण,नाट्यपूर्ण घटनांनी भरलेलं गेलं..
सद्गुणी , तेजस्वी, कर्तव्यदक्ष,लहान वयातही अगदी मुरलेले राजकारणी माधवराव...
स्वार्थी,भोळसट,राजद्रोही राघोबा...
सोशिक, त्यागी, पतिव्रता रमाबाई या तिन्ही व्यक्तीरेखा वाचकांच्या मनांवर विलक्षण परिणाम करतात.
रमाबाई व माधवराव यांच्यामधील भावपूर्ण प्रसंग वाचताना डोळ्यांच्या कडा पाणावतात .
त्या दोघांमधील शृंगारीक प्रसंगही लेखकाने त्यांच्या खास शैलीतून जिवंत केले आहेत..
त्या दोघांमधील काही संवाद तर परत परत वाचण्यासारखे आहेत...
‘‘रमा, ज्या मार्गानं तू जातेस, तो डोळे भरून बघ. वाटेनं तुला सागराचं दर्शन होईल. किनाऱ्याकडे सारखा झेपावणारा तो सागर बघ. प्रत्येक ठिकाणचा सागर तुला वेगळा भासेल. प्रत्येक ठिकाणचा किनारा बारकाईनं पाहिलास, तर वेगळा आवाज देईल. काही ठिकाणी सागराचा प्रमत्तपणा तुला दिसेल; काही ठिकाणी त्याच्या आवाजात व्यथा व्यक्त होईल."
" मृत्यू हा अटळ आहे."
जीवन वा मृत्यूच भय बाळगणा-याला समृद्ध जीवन जगता येत नाही. जीवन किती वर्षे जगला, ह्यापेक्षा कसं जगला ह्याला महत्त्व आहे.
तसं नसतं, तर चंदनाचं नावही राहिलं नसतं, सा-यांनी वटवृक्षाचं कौतुक केलं असतं.."
"स्वामी" मूळे रमा-माधव ही जोडी अजरामर झाली...
रमाबाई सती जात असतानाचा प्रसंग, स्त्री असो वा पुरुष कोणाचंही हृदय पिळवटून टाकेल.. एवढ्या ताकदीनं उभा केला आहे ...
त्यांचं वैयक्तिक आयुष्य आणि राजकीय आयुष्य या दोहोंची सांगड घालत विणलेला दिमाखदार शेला आणि त्या शेल्याला रमा-माधव नात्याची नाजूक किनार म्हणजे "स्वामी"..
मराठा इतिहास, पेशवाई यांबद्दल कुतूहल आणि जिव्हाळा असणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून वाचावी, अशी ही रणजित देसाई लिखित नितांत सुंदर कलाकृती..
या तरुण पेशव्याचा ( थोरले माधवराव) अकाली मृत्यू म्हणजे मराठी साम्राज्याच्या जिव्हारी बसलेला घाव, त्यापुढे पानपतचा आघात काहीच नव्हे" -- ग्रॅंट डफ
"इतिहासाबद्दल सर्वांना प्रेम वाटते. ऐतिहासिक प्रसंगांमुळे, ऐकलेल्या कथांमुळे कांही व्यक्तींचा ठसा मनावर उमटतो; पण जेव्हा आपण एखादी विशिष्ट ऐतिहासिक व्यक्ती डोळ्यांसमोर ठेवून इतिहासाचे अवलोकन सूक्ष्मपणे करू लागतो, त्यावर चिंतन करू लागतो, तेव्हा कल्पना व सत्य यांतील अंतर जाणवू लागते. माधवरावांच्या कालखंडाचा अभ्यास करीत असता मला हे जाणवले. हा अभ्यास करण्यासाठी अनेक पुस्तकांची, बखरींची गरज लागते."
...... रणजित देसाई