#कठीण
शिर्षक: नसतेस घरी तू जेव्हा
नसतेस तू घरी जेंव्हा!!
आज मी घरी आलो, दार उघडलं आणि तुझी कमी भासू लागली. नसतेस तू घरी जेंव्हा, त्यावेळी अनेक गोष्टींचा मला सामना करावा लागतो. सगळं घर कसं ओकंबोकं वाटतं. तुझ्याशिवाय हे घर जणू एक गुहा वाटते, या घराला आणि मला तुझी सवय झालेली असते. या घरातल्या भिंतींना तुझ्या मायेच्या हाताची कमतरता भासते. त्या भिंती शुष्क वाटतात, जणू तू असल्यावर त्या जिंवत होतात आणि तुझ्याशी बोलू लागतात.
आपली बाल्कणी आणि तिथे लावलेल्या झाडांच्या कुंड्या, किती हिरमुसल्या झाल्या आहेत. मी रोज पाणी घालतो, पण तरी त्यांना मायेचा ओलावा मिळत नसल्याने ते कोमेजल्या सारखे झाले आहेत. मला आठवतं, तू जेव्हा घरी असायची तेव्हा तुझं सगळं आटपून तू त्या झाडां बरोबर गप्पा मारत बसायची आणि मग मी हळूच तुझ्या पाठीशी येऊन तुझी छेड काढत असे.
तू नाहीयेस, आणि घरातला प्रत्येक कोपरा जणू तुझ्या आठवणीत रडत आहे. तू जसं हे घर सोडून गेली आहेस, ते अगदी तसेच आहे. मी कोणत्याही वस्तूला हात लावला नाहीये. कारण हे घर तुझं आहे, त्याला हात फक्त तुझा लागला पाहिजे. ती बेडरूम आणि त्या बेडवरची चादर, अजूनही तशीच सुरकुतलेली आहे. तू नसतेस घरी जेंव्हा, माझं मन आतून तुटत जातो आणि मग ते अस्थिर होवून जाते.
पावसाच्या सरी, आता हातात झेलाव्यात असे नाही वाटत. कारण त्या पावसाच्या प्रत्येक थेंबात मला तुझी आठवण येते. त्या झाडांची सळसळ आणि तो मंद गार वारा नकोसा वाटतो. या सगळ्यामुळे पुन्हा मी त्या आठवणीत रममाण होतो आणि मग आकाशात जशी वीज चमकावी तशी माझ्या हृदयाची तार छेडत एक कळ सणकून जाते. घड्याळाचे काटे टिकटिक आवाज करत आहेत, पण कानाला तो आवाज आता सहन नाही होत. या कानाला फक्त तुझा आवाज ऐकण्याची सवय आहे.
तू नसतेस घरी जेंव्हा, हे घर मला ओसाड वाटते. काळजाचे ठोके सुध्दा मंद होत आहेत, असा मला भास होत असतो. तुझ्याशिवाय श्वास घेणे सुध्दा मला कठीण वाटते. एक एक क्षण मला हा कालांतराचा वाटतो. तुझ्या परतीची वाट मी आतुरतेने पाहत असतो. घरी येवूच नये असे मला वाटते. पण, तुझ्या सगळ्या आठवणी इथे या घरात आहेत. म्हणून मग पाय आपोआप घराकडे वळतात. वाटते मी हे सगळे सोडून तुझ्याकडे धाव घ्यावी, पण मग मला त्यासाठी काही करावे लागेल.
तो दिवस आठवला की अजूनही थरकाप उडतो, सगळ्या अंगाला घाम फुटतो. त्यावेळी ते व्हायला नको होते. मी अजूनही, या सगळ्याला कारणीभूत मलाच मानतो. कारण मी जर तुला एकटीला सोडून गेलो नसतो तर आज तू माझ्या सोबत, इथे असली असती. आज तुझ्या आठवणी, माझ्या डोळ्यांच्या अश्रू मधून धुसर होताना दिसतात. पण हे बघ मी हे डोळे पुसले आहेत. आता मला त्या स्पष्ट दिसत आहेत. तू नसताना, माझ्या सोबतीला आता फक्त तेवढेच उरले आहे.
प्रणाली कदम
कल्याण महाराष्ट्र