मोबाईलवर बोलणे ही सुद्धा एक कलाच
पूर्वी संपर्काची साधने कमी होती. पत्र, चिट्ठी, खलिता याचा उपयोग केला जात असे. पत्र सुद्धा दुसऱ्याकडून लिहून किंवा वाचून घेतले जात असे. कालांतराने दूरध्वनी, तार याची सुविधा प्राप्त झाली. अगदी मोजक्या घरात दूरध्वनी होते. परिसरातील बहुतेक जणांचे फोन तेथेच येत असत. ज्याचा फोन असेल त्याला निरोप देणे किंवा बोलावून आणणे ही कामे दूरध्वनी मालकाला करावी लागत. अर्थात सामाजिक बांधिलकी किंवा शेजारधर्म म्हणून ती केली जात असत. चांगले वाईट निरोप सांगण्याची वेळ फोन मालकावर येत असे. त्यातही एक प्रकारचा आनंद असे. फक्त आपल्याच घरात फोन आहे याचा अभिमान असणारी मंडळी देखील होती.
काळ बदलला. काळाच्या ओघात संपर्क माध्यमे देखील बदलली. लँड लाईन फोनची जागा मोबाईल फोनने घेतली. घरोघरी मोबाईल आले. आपण किती पुढारलेले आहोत हे दाखवण्याचे साधन म्हणून मोबाईलकडे पाहिले जाऊ लागले. थेट संदेश यंत्रणा तयार झाली. मध्यस्थ बाजूला झाले. गुपिते सार्वजनिक होण्याचे प्रमाण कमी झाले. अहोरात्र मोबाईल जवळ असल्याने कधीही केंव्हाही कसेही वाटेल ते कानात इयर फोन घालून बोलले जाऊ लागले. काय बोलतात हे जाणून घेण्यासाठी फेसरीडिंगचा अभ्यास होऊ लागला. कालांतराने फेसच दिसायचे बंद झाले. चेहरे झाकले जाऊ लागले. त्यामुळे कोण कोणाशी काय बोलते याचा मागमूस देखील लागेना.
मोबाईल पिढी जरी निर्माण झाली असली तरी त्यावर बोलावे कसे व किती याचे आकलन मात्र बऱ्याच जणांना झाले नाही. बघा ना मोबाईल वापरणाऱ्यांच्या अनेक गमती जमती असतात. आपला हँडसेट किती वजनदार व भारी आहे हे दाखवण्याची संधी कोणीही सोडत नाही. काहीजण मोबाईल सारखा हातात घेऊनच असतात. किमती मोबाईल वापरावरून स्पर्धा सुरू असते. मोबाईलवर बोलण्ययाच्या तर व्यक्ती तितक्या सवयी आहेत. काहीजण लाऊड स्पीकरवरून बोलल्यासारखे मोबाईलवर बोलतात. एक किलोमीटर परिसरात त्यांचे संभाषण ऐकू जाते. काहींचा आवाज इतका हळू असतो की फक्त त्यांचे तोंड हललेलेच पहावयास मिळते.
मोबाईलवर किती बोलायचे याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे व त्याचा प्रत्येकजण पुरेपूर फायदा घेत असतो. झाला का चहा, झाला का नाश्ता, जेवला का, आज काय होत, पाऊस आहे का, ऊन पडलंय का, कसे आहात, हेच रोजचे बोलणे असते. पिता पुत्रातील मोबाईल संभाषण लवकर संपते मात्र आई मुलगी एकदा बोलायला लागल्या की आपण मोबाईलवर बोलतोय याचे त्यांना भानच रहात नाही. अग आज आमच्या शेजारी काय गम्मत झाली असे सांगून ती बातमी देशात काय परदेशात देखील जाऊन धडकते. आणखी काय विशेष या तीन शब्दांनी तर मोबाईल पुराण संपतच नाही. इतके बोलून देखील आज काय फारसं बोलायला झालंच नाही ही तक्रार देखील असते
पुरुष मोबाईलवर मर्यादित बोलतात मात्र स्त्रिया अमर्यादित बोलतात. हे मी म्हणत नाही कोणीतरी संशोधन केलंय म्हणे. काहीजण पहिल्या रिंगला मोबाईल उचलतात तर काहीजण रिंगटोन पूर्ण ऐकतात. एकेकाच्या रिंगटोन तर खूप मजेशीर असतात. त्याबद्दल न बोललेलेच बरे. असो मोबाईल सुद्धा एक करमणुकीचाच प्रकार आहे. नाहीतर जीवनात करमणूक हवीच ना! त्याशिवाय आनंदी जीवन कसे जगता येईल.
प्रदीप जोशीं, मुक्त पत्रकार, मोबाईल क्रमांक 9881157709