एक दुपार भावपूर्ण
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा परिसर तसा शांतच होता. देवीसुद्धा बहुधा वामकुक्षी करीत असावी.भक्तांची काळजी वाहून श्रांतावलेली..
उत्कृष्ट शिल्पकामाने सजलेले तिचे मंदिर. तिथलं शिल्प आणि शिल्प ऊन सावल्यांचा छायाप्रकाशाचा खेळ झेलत जिवंत होत होतं.
भाविकांचे असंख्य प्रकार अनूभवताना मजा येत होती. त्या चार तासात मी चार हजार माणसं तरी "पाहिली" असतील.
त्यात लक्षवेधी होती देवीच्या पाया पडायला आलेली नवी जोडपी.त्यातही दोन प्रकार.काहीजण लग्नानंतर हातभर हिरवा चुडा घालून , डोक्यात गजरा,सुंदर साडी अशा नटलेल्या आणि आपल्या पतिराजांच्या हातात हात घालून प्रदक्षिणा घालणार्या युवती! तर दुसर्या गटात कार्यालयातून थेट मंदिरात आलेली जोडपी!यातही ग्रामीण परंपरा,शहरी आणि ग्रामीण अशी संमिश्र संस्कृती तर काही अगदी आधुनिक पोशाखातल्या वधू!
या प्रत्येक जोडप्याबरोबर तितक्याच नटलेल्या करवल्या आणि एखादी जाणती महिला. करवल्यांच्या हाती करा आणि दिवा आणि महिलेच्या हातात ओटीची पिशवी. सात जन्माची गाठ बांधूनच मंडळी येत होती. मला हे प्रकर्षाने दिसून आलं की नवरा मुलगा चालायला लागला की ती बांधलेली गाठांची वस्र सांभाळत नवरीला त्याप्रमाणे चालावं लागे!!! यह सिलसिला इस मोडसेही शुरु होता है .... मग हमखास तिचं जोडवं,डोक्यावरची बिंदी,नाकातली नथ असं काहीतरी हलायचं किंवा पडायचं! मग मात्र नवरोजींना थांबवच लागे.. अशी गंमत सुरु होती.
भाविकांचेही असंख्य प्रकार.चंपाषष्ठीच्या नवरात्रामुळे जोतिबाला जाऊन त्याच्या आशीर्वादाचा जांभळट गुलाबी गुलाल माथी मिरवत लोक येत होते. काही तुळतुळीत माथ्याचे... हे बालाजीला जाऊन आलेले.
आई नुसती चालणारी,बाबाच्या हाती बाळाची पिशवी आणि आजीच्या दोन हातांवर झोपलेलं नातवंड.
वैविध्यपूर्ण पोशाख आणि त्यात भाविकता घेऊन आलेली माणसं.
काहीजण सेल्फीत मग्न, काहीजण देवळाचे फोटो काढण्यात.कुणा हाती संपूर्ण ओटी तर कुणा हाती नुसतच कमळाचं फूल!!
आपापल्या धारणेनुसार आणि भक्तिनुसार जो तो देवीची आराधना करीत होता.काहींच्या गळ्यात कवडीची माळ, कुणा घुंगट ओढलेल्या राजस्थानी महिलेच्या हाती धातूची देवीमूर्ती!!
कुणी प्रसादाचे लाडू विकत घेणार तर कुणी अभिषेकाची पावती करणार. लहान मुलं परिसरात मोकाट धावत सुटणार, तर कुणी ओसरीवरून खाली उडी मारणार!
एक गोष्ट न चुकता प्रत्येक महिला करत होती. आवारातल्या ठुशीच्या दुकानात डोकावणे आणि अटळ अशी खरेदी. तोपर्यंत फक्त खिशात हात घालण्याची अनैच्छिक आणि सक्तीची,तरीही प्रेमाची जबाबदारी पूर्ण करणारा वर्ग मोबाईलमधे गर्क. हाक आली की नोट काढून देणार फक्त!!! हा हा हा!!! कोणत्याही समाजगटात वयोगटातल्या जोडप्यात दिसणारं हे कमालीचं साम्य!!
गुरुजींशी अभिषेक ठरवणारे भक्त, नियमीत दर्शनाला येणार्या स्थानिक आजी आजोबांच्या गप्पा, सस्थानकडून लाऊडस्पीकरवरच्या सूचना हे सगळं त्या आवाजाची उंची वाढवत होतं.
मी आत जाते,त्या गर्दीतही देवी मला पोटभर भेटते, दर्शन देते आणि मी तृप्त मनाने पुन्हा त्या गर्दीचा भाग होते.
मलाही असंच कुणी कुणी पाहिलं असणारच की आणि माझं चित्रही त्यांच्या डोळ्यात उमटलं असेलच की... पण मी ते शब्दबद्ध केलं कारण माझं त्यांच्यापेक्षा असलेलं वेगळेपण मला गाभार्याच्या थंडगार वातावरणात जाणवून गेलं.