Marathi Quote in Book-Review by manasvi Manu

Book-Review quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

वाचन हा माझा आवडता छंद आहे. प्रत्येक पुस्तक वेगळं काहीतरी शिकवून जातं. काही पुस्तके केवळ मनोरंजन करतात, काही विचार करायला लावतात, तर काही मनाला इतकं स्पर्शून जातात की आयुष्यभर आपल्यासोबत राहतात. माझ्यासाठी असंच एक खास पुस्तक आहे ते म्हणजे ‘स्वामी’, सुप्रसिद्ध लेखक रणजित देसाई यांची ऐतिहासिक कादंबरी . हे पुस्तक केवळ एका ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाची कहाणी नाही, तर एका युगाचा अनुभव आहे. या पुस्तकाने मला फक्त इतिहास नाही तर माणूस म्हणून जगताना  कसं जगावं हे शिकवलं .

‘स्वामी’ ही कादंबरी पेशवे माधवरावांच्या जीवनावर आधारित आहे.  एका तरुण, संवेदनशील आणि बुद्धिमान राजकारण्याचा संघर्ष, त्याचं कर्तृत्व, आणि त्यामागची दु:खद गोष्ट या पुस्तकात फार प्रभावीपणे उलगडली जाते. रणजित देसाईंनी वापरलेली भाषा ही प्रगल्भ, प्रवाही आणि काळजाला भिडणारी आहे. त्यांच्या लेखणीतून माधवराव जसे उभे राहतात, तसेच त्या काळातील राजकारण, संकटं, वैयक्तिक दुःख आणि जबाबदाऱ्या ह्या सगळ्याच गोष्टी जिवंत वाटतात.वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी सत्ता सांभाळणाऱ्या माधवरावांनी आपल्या हुशारीने, दूरदृष्टीने आणि राष्ट्रप्रेमाने एक विस्कळीत होत चाललेली पेशवाई पुन्हा स्थिर केली. त्यांचं जीवन म्हणजे निष्ठा, संयम आणि सेवाभाव याचं प्रतीक आहे.

या कादंबरीत केवळ राजकीय घडामोडी नाहीत, तर एक संवेदनशील मनाचा, जबाबदाऱ्या स्वीकारणारा, आपल्या प्राणांपेक्षा राष्ट्राला मोठं मानणारा नेता आपल्यासमोर उभा राहतो. लेखकाची भाषा अत्यंत ओघवती आहे. कथानकातली दृश्यं आणि भावना इतक्या परिणामकारकरित्या रेखाटल्या आहेत की वाचक त्या काळात जाऊन पोहोचतो.

माझ्या मनाला सर्वाधिक भिडलेली गोष्ट म्हणजे माधवरावांचं स्वतःच्या दुखांवर आणि आजारावर मात करत पेशवाईसाठी अखेरपर्यंत लढणं. त्यांचं पत्नी रामाबाईवरील प्रेम, त्यांचं परस्परसंबंधातील आदर, आणि एका जबाबदार नेत्याची संवेदनशील बाजू, हे सगळं खूप सूक्ष्मपणे आणि हृदयस्पर्शीपणे उलगडण्यात आलं आहे. एक बाजूला रणभूमीवरील रणनिती आणि दुसऱ्या बाजूला हळव्या भावना – ह्या दोन्ही गोष्टी पुस्तकात सुंदररित्या समांतर चालतात.
स्वामी’ वाचताना वाचक फक्त इतिहास जाणत नाही, तर त्या व्यक्तीच्या भावविश्वाशीही जोडला जातो. म्हणूनच हे पुस्तक केवळ ऐतिहासिक कादंबरी म्हणून नाही, तर एक प्रेरणादायक जीवनगाथा म्हणून माझ्या मनात कोरले गेले आहे.

या पुस्तकाने मला एक महत्त्वाचा धडा दिला — खऱ्या अर्थाने ‘स्वामी’ होणं म्हणजे सत्ता गाजवणं नव्हे, तर सेवाभावाने काम करणं. स्वामी म्हणजे नेता, पण नेता होणं म्हणजे अभिमानाने जगणं नाही, तर नम्रतेने झिजणं असतं. हे शिकवणं हीच या कादंबरीची खरी ताकद आहे.

माझं या पुस्तकाकडे ओढलं जाण्याचं मुख्य कारण म्हणजे माधवरावांची जिद्द, नम्रता, आणि देशप्रेम. त्यांनी स्वतःच्या आजारपणावर मात करत देशासाठी अखेरपर्यंत झगडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पत्नी रामाबाईबरोबरचं नातं, त्यांचं परस्पर प्रेम आणि समजूतदारपणा हे ही खूप हृदयस्पर्शी आहे. आजही जेव्हा हताश वाटतं, किंवा स्वतःवर विश्वास कमी होतो, तेव्हा माधवरावांची आठवण होते – ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही देशासाठी काम केलं. म्हणूनच ‘स्वामी’ हे माझं केवळ आवडतं पुस्तक नाही, तर ते माझं प्रेरणास्त्रोत आहे

आजच्या धकाधकीच्या युगात, जिथे स्वार्थ आणि स्पर्धा वाढत चालली आहे, तिथे ‘स्वामी’सारखं पुस्तक आपल्याला मूल्यांचं, नेतृत्वाचं आणि माणुसकीचं खरं स्वरूप शिकवतं. म्हणूनच ‘स्वामी’ हे केवळ माझं आवडतं पुस्तक नाही, तर ते माझ्या विचारविश्वाचा एक महत्त्वाचा भाग बनलं आहे.

म्हणून च हे पुस्तक प्रत्येक तरुणाने, प्रत्येक वाचकाने वाचावं असं मला वाटतं. कारण हे केवळ एक ऐतिहासिक कादंबरी नाही, तर ते एक प्रेरणादायी ग्रंथ आहे — जो मनाला घडवतो, विचारांना आकार देतो आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो.

समाप्त..

(⁠ ⁠╹⁠▽⁠╹⁠ ⁠)(⁠ ⁠╹⁠▽⁠╹⁠ ⁠)(⁠ ⁠╹⁠▽⁠╹⁠ ⁠)(⁠ ⁠╹⁠▽⁠╹⁠ ⁠)(⁠ ⁠╹⁠▽⁠╹⁠ ⁠)
(⁠ ⁠╹⁠▽⁠╹⁠ ⁠)(⁠ ⁠╹⁠▽⁠╹⁠ ⁠)(⁠ ⁠╹⁠▽⁠╹⁠ ⁠)(⁠ ⁠╹⁠▽⁠╹⁠ ⁠)(⁠ ⁠╹⁠▽⁠╹⁠ ⁠)

Marathi Book-Review by manasvi Manu : 112024177
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now