शिवराज्याभिषेक
( जिजाबाई गवाक्षाजवळ उभ्या आहेत.हिरा नावाची महिला पालखी आल्याची वर्दी देते. त्यावेळच जिजाबाईंच मनोगत )
" काय म्हणालीस हिरा..!
राजांचा राज्याभिषेकचा मूहूर्त जवळ आलाय? पालखी दरवाज्याजवळ आलीय...!हो , हो मी तयार आहे.या गवाक्षातून मघापासून मी सारी हालचाल न्याहळतेय....ही वर्दळ..हा जल्लोष
मंत्रघोष...सनई- चौघड्यांचे आवाज... घोड्यांच्या टापा आणि हत्तींचे चित्कार...डोळे...कान आणि मन तृप्त झाले हिरा.
सार्या हिंदुस्थानतल्या आयांचे मन भरून आलंय ग. त्यांचा लाडका
शिवबा आज छत्रपती होतोय. अगं तो फक्त माझा मुलगा नाहीय..सगळ्या हिंदुस्थानतील स्रीयांचा मुलगा आहे...भयभीत झालेल्या भगीनींचा भाऊ आहे.
अगं..गेल्या तिनशे वर्षांपासून ही भूमी
या देशीचा कोणी राजा होईल या आशेने वाट बघत होती...आज ही मातृभूमी धन्य होईल
पण...पण हा प्रवास साधा सोपा नव्हता.पावला पावलावर साक्षात मृत्यू सावली सारखा मागून फिरत होता. असंख्य मावळ्यांनी त्यासाठी आपले प्राण अर्पण केलेयत. स्वराज्याच्या या हवनकुडांत हसत हसत उडी मारलीय .आज ते सगळे तृप्त होतील.
हिरा..हिरा तूला आठवतंय...? एका स्रीला पळवून तिच्यावर अत्याचार करणार्या उन्मत्त अश्या रांझ्यांच्या पाटलाला शिवबाने अवघ्या सोळाव्या वर्षी हात पाय कलम करण्याची शिक्षा दिली तेव्हाच अख्या मावळखोर्यातल्या माय माऊलींनी आपल्या पंचप्राणानी शिवबाच औक्षण केलं होतं.
तेव्हा आम्हाला धन्य वाटलं होतं .शिवबांना आम्ही रामायण महाभारतातील जे धडे दिले होते ते व्यर्थ जाणार नाहीत हे आमच्या लक्षात आलं होतं.
यवनांच्या घोड्यांच्या टापा खाली सारा महाराष्ट्र भरडला जात होता...लेकी बाळींची अब्रू वेशीवर टांगली जात होती....उभी पिके धडाधडा पेटत होती...देवळे आणि देवांवर तलवारी हातोडे पडत होते तेव्हा इथले सरदार ..वतनदार षंडासारखे मान खाली घालून त्यांची चाकरी करत होते. तेव्हा... शिवबा आणि त्याचे सवंगडी
स्वराज्याची शपत घेऊन ... प्राण तळहातावर घेऊन उभे ठाकले.
हिरा...अग , जेव्हा अफजलखान ' शिवबाला मुर्दा या जिंदा घोड्यावर घालून विजापूरला आणतो 'असा विडा उचलून महाराष्ट्रात आला तेव्हा सार्या महाराष्ट्रात हलकळ्ळोल उडाला होता. सारा महाराष्ट्र देव पाण्यात ठेवून बसला होता पण... पण माझा शिवबा डगमगला नाही.हाताने पोलादी पहार वाकवण्यार्या त्या सहा फूट उंच... अमानवीय अफजलखानाने बगलेत मान धरून हल्ला केला तेव्हा आई भवानीच नाव घेत शिवबाने वाघनखाने त्याचा कोथळा बाहेर काढला.तेव्हा अवघ्या महाराष्ट्रभर दिवाळी साजरी झाली होती. आणि तो..तो...क्रूर
सिध्दी जौहार पन्हाळगडला वेढा घालून बसला होता तेव्हा शिवा काशिद आणि बाजी प्रभूंनी आपले प्राण गमावून शिवबाला विशाळगडावर सुखरूप पोहचायला मदत केली होती.
हिरा...अगं तो औरंग्याच्या मामा...शाहिस्तेखान आपल्या लाल महालात तळ ठोकून ...मावळखोर्यात अत्याचार करत होता.तेव्हा शिवबा आणि मावळ्यांनी धाडस करून लाल महालात घुसून त्याची बोटे छाटली होती. जीव घेऊन तो महाराष्ट्रातून पळाला होता.अग असं धाडस जगात आजतागायत कोणी केलं नसेल.
काय म्हणतेस? मला श्वास लागतोय ..थोडं हळू बोला.
अगं हा क्षण पुन्हा येणार नाही. अवघा महाराष्ट्र माझ्या तोंडून बोलतोय. शिवबा आग्र्याला औरंगजेबाला भेटायला गेला तेव्हा काळजावर दगड ठेवून मी दिवस काढले.स्वत:च्या बापाला कैदेत ठेवून झिजवून मारणार्या ... भावांना कपटाने मारणाऱा ,औरंगझेब शिवबांला जीवंत ठेवणार होता का? पण शिवबाने त्याच्या हातावर अलगद तुरी दिली.... महाराष्ट्रात आला.सार्या हिंदुस्थानच्या जीवात जीव आला. शिवबा म्हणजे साक्षात रूद्र...! अन्याय...
अत्याचार...अधर्म...यांचा नायनाट करणारा रूद्र! आज या स्वराज्यात
धर्माचं ,नितीन, न्यायाच राज्य आहे. कुणा अबलेकडे डोळे वर करून बघण्याची आज कुणाची हिंमत होत नाही.आज देव अन् धर्म सुरक्षित आहे.हे श्रींच राज्य आहे... आणि ते चंद्रकलेप्रमाने वाढत जाईल. असंच शिवबा म्हणतो. येणार्या शेकडो पिढ्या स्वराज्यचा आदर्श डोळ्यापुढे ठेवतील.
हिरा चल...! हा सुवर्ण क्षण मला डोळ्यात साठवायचा आहे.शतकानंतर ही रम्य पहाट आज दिसलीय.अवघा हिंदुस्थान आणि सगळं जग हा सोहळा पाहण्यासाठी रायगडावर जमा झालंय.
माता म्हणून मी धन्य झाले.माता जगदंबा साक्षात या सोहळ्याला आली असेल नाही !
जगदंब...जगदंब ...
( नमस्कार करते.)