फॉर्मवर नाव वगैरे लिहिल्यावर तिने विचारलं, “काय करता?”
समोरची प्रश्नार्थक…
“अहो काय करता…?”
“अं… काही नाही…”
“अच्छा, ‘H-O-U-S-E W-I-F-E’ “ तिने फॉर्मवर लिहिलं.
“नाही…नाही…wife नका लिहू, HOUSE WIDOW… नाही ते पण नको… HOUSE SINGLE, … हां HOUSE SINGLE लिहा.”
खळखळून हसत ती म्हणाली, “अहो, असा शब्दच नाही मुळी”
“हो का…? …मग…”
“अहो सांगा लवकर…”
“अं… मॅडम, तुम्ही तुमचा पण फॉर्म भरला असेल ना हो?”
“हो…!”
“तुम्ही काय लिहिलं मग…?”
“नोकरी…!”
“मग तुमच्यात ‘हाऊस वाइफ’ तुमचे मिस्टर आहेत काय?”
“अहो काहीतरीच काय? ते कसे हाऊस वाइफ असतील?”
“अहो, म्हंजे मला म्हणायचंय घरकाम ते करतात का मग?”
“नाही हो…! मीच करते घरकाम”
“मग मिश्टर पण नोकरी करतात काय?”
“नाही… ते…ते…अं…(ती आठवायला लागली), ओ…फॉर्म तुमचा भरतेय ना मी? मग माझ्या चौकश्या काय करताय तुम्ही…?” ती खेकसली.
“अहो चिडताय कशाला…? बरं जाऊद्या. म्हणजे घर सांभाळून तुम्ही नोकरीपण करता. तरी फॉर्म वर फक्त ‘नोकरी‘ असंच लिहिलं, म्हणा की…! जेव्हा की घरकामात सुटी नसते, रजा नसतात, दांड्या चालत नाहीत, वर काम चोवीस तास आणि पगार…? ….काssssहीच नाही…!”
“हे बघा, तुमच्या फॉर्मवर मी हाऊस वाइफ लिहिलं आहे…”
“मॅडम ऐका ना, House CEO, House Manager, House Chief …असं काही लिहिता येतंय का बघा ना…”
“अहो, किती वेळा सांगायचं, नाही असं काही लिहिता येत… जाऊदे… खड्ड्यात गेला तुमचा फॉर्म, जाते मी.”
“मॅडम, चिडू नका ना ! मला माहितेय, नाही लिहिता येत असं काही. पण का नाही लिहिता येत माहितीय?”
“???”
“मॅडम, ‘गुलाम‘ असं म्हटलं की मालकाशिवाय त्याचं अस्तित्वच नसतं, ‘शिपाई‘ म्हटला की साहेब असतोच , तसं, ‘wife‘ म्हटलं की ‘husband’ शिवाय तिचं अस्तित्व गृहीतच धरलं जात नाही, ‘ गुलाम‘, ‘शिपाई‘, ‘वाइफ‘ हे शब्दसुद्धा स्वतंत्र नाहीत.”
थोडावेळ विचार करून ती ठामपणे म्हणाली, “मॅडम, मी सांगते, तुम्ही लिहा… HOUSE CHIEF. मॅडम आता शब्द जन्माला घालूयात आपण…!”
- नागेश पदमन.©
8668306592