शेजारच्या वाळींबेकाकू व दिगू
वाळींबेकाकू: वैनी ओ वैनी
दिगू: आई नाहीए घरात.
(वाळींबेकाकूंच्या वाटीकडे पहात.)
दिगू: काय हवं होतं का तुम्हाला?
वाळींबेकाकू: हो रे वाटीभर साखर दे जरा. मी आणली की ठकीजवळ पाठवते.
दिगू: अहो, वाळींबेकाकू हा बघा पेपरात लेख आला आहे. साखर खाऊन म्हणे बेसुमार वजन वाढतं. जसं की तुमचं..नाही म्हणजे वेळीच काळजी घ्या.
वाळींबेकाकू: नको मेल्या तुझी साखर मला. कुणी भेटतो तो वजनावर बोलतो. तुमच्या कमाईचं खाते का मी?
------
थोड्या वेळाने आई येते.
आई: काय बाई कोणाचं काही खरं नाही. लोकांचे मुड बदलत असतात सारखे. ती वाळिंबीन, कपडे वाळत घालत होती. मी आपली हाक मारली सहज तर नाक इकडून तिकडे फिरवलंन. नकटी कुठची. केवढा टेंभा कशाचा मिरवते कोणास ठौक.
दिगुची आजी: तू काही बोलली होतीस का तिला? मघा येऊन गेली खरी. मी मोरीत न्हात होते. हा दिगू बोलला तिच्याशी.
दिगू: हां ते होय.वाळींबेकाकू साखर मागायल्या आल्या होत्या. मी त्यांना साखरसेवनाने होणारे दुष्परिणाम सांगितले. आधीच केवढ्या आहेत त्या!
आई: असं बोलून दाखवलंस त्यांना?
दिगू: हो मग कळणार कसं त्यांना!
आई: दिग्या..😞😞
©®गीता गरुड.