*" प्रसिद्धीचे वलय .......! "*
माणसांच्या जीवनात प्रसिद्धी खूप महत्वाचा भाग आहे. प्रत्येकांना वाटतं की आपण प्रसिद्ध व्हावं. त्यासाठी नाना प्रकारचे कार्य केल्या जाते. आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट ठरावे, यासाठी प्रत्येकाची धडपड चालू असते. पण काही लोकं समाजात असे ही आढळून येतात की, ते प्रसिद्धीपासून चार हात दूर राहतात. तरी देखील ते एक ना एक दिवस प्रसिद्धीस येतात. कारण त्यांच्यामध्ये ती प्रतिभा असते. याउलट काही मंडळी प्रसिद्धीसाठी अधूनमधून प्रयत्न करतात. पूर्वीच्या काळी प्रसिद्ध होण्याचं एकमेव साधन म्हणजे वृत्तपत्र. वृत्तपत्रात स्वतःचे नाव प्रकाशित होऊन चार लोकांना वाचण्यास मिळणे ही फार मोठी बाब होती. कारण त्यावेळी आजच्या सारखे सोशल मीडिया नव्हती. काही मंडळी आपलं नाव आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित व्हावे म्हणून पत्राद्वारे आपली पसंद कळवायचे आणि आकाशवाणीवर नुसत्या नावाची उदघोषणा जरी झाली तरी काय आनंद व्हायचा ? चार मित्र त्यांना भेटल्यावर सांगायचे की आकाशवाणीवर आपले नाव ऐकलं होतं. प्रसिद्धीची सवय फार वाईट असते. एकदा जर त्याची सवय लागली तर माणूस त्यासाठी नाना प्रकारचे प्रयत्न करत असतो. आपलं नाव प्रसिद्धी माध्यमात कसं येईल ? याच विचारांच्या तंद्रीत राहतात. प्रसिद्धीचे वलय राजकारणी आणि चित्रपट सृष्टीतील लोकांना खूप भुरळ घालते. नेहमी प्रसिद्धीच्या वलयात राहावं म्हणून अधूनमधून अनेक घटना जाणूनबुझुन घडवून आणतात. प्रसिद्धीची सवय एक व्यसन बनते त्यावेळी मात्र एखादे दिवशी आपले नाव प्रसिद्ध झाले नाही तर मन बेचैन होते, अस्वस्थता वाढते. चांगल्या कामाची जशी प्रसिद्धी होते त्यापेक्षा जास्त खराब कामांची प्रसिद्धी फार लवकर होते. तशी प्रसिद्धी कोणालाही नको वाटते कारण त्यामुळे आपली समाजात नाचक्की होते. म्हणून माणूस चांगल्या कार्याच्या प्रसिद्धीकडे जास्तीत जास्त लक्ष देतो. आज प्रसिद्धीसाठी अनेक साधने उपलब्ध झाली असली तरी वृत्तपत्राचे स्थान किंचितही कमी झाले नाही. पेपरमध्ये आपले नाव यावं म्हणून आज ही प्रत्येकजण धडपडत असतो. राजकारणी आणि चित्रपट क्षेत्रातील मंडळीना रोजच प्रसिद्धी मिळते. मात्र सामान्य लोकांना प्रसिद्धी कशी मिळेल ? त्यासाठी मग समाजात काही चांगले कार्य करावे लागेल. तरी मीडियावाले बघतीलच याची खात्री नसते. प्रसिद्धीसाठी सुरू होतो मग नावीन्य काही करायचं खेळ. देशातल्या विविध घटना आणि घडामोडीवर आपल्या नावाचे लेख कविता लिहून पाठविणे. वृत्तपत्रात आपल्या नावाने ते प्रसिद्ध झाल्यावर आनंद होणारच. तीच जर पहिली वेळ असेल तर खूपच आनंद होणार, यात शंका नाही. - नासा