#आतूर
या कवितेतील काही ग्रामीण शब्द
( कोस : अंतर मोजण्याचे माफ , दमडी : पैसे ,
उगंना : उगवत नाही , घ्याया : घ्यायला. )
लहानपणी जेव्हा माझ्या आजोबांना विचारायचे
" आजोबा शेतकरी आत्महत्या का करतो ? "
तेव्हा फारसं कळायचं नाही
ते मला सांगायचे:
मोहमाया म्हणे जग
सत्य दहा कोस दूर
आश्वासन काय खरं
इथं श्वासही फितूर
गाय गरिबाचं धनं
सारं सत्तेच्या हातात
आधी भरतात खिसे
मग त्यांच्या ओंजळीत
कर्जामधे बुडालेला
पीक उगंना शेतात
कसा पोसणार घर
नाही दमडी हातात
शेतक-यांच्या जीवाचं
पैका सरकार देतो
म्हणूनच भाबडा तो
फास गळ्यास लावतो
धुर्त माणसाची जात
स्वार्थ साधतो चतूर
जीव माणसाचा घ्याया
बघा माणूस आतूर