Marathi Quote in Thought by Na Sa Yeotikar

Thought quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

शाळकरी मुलाचे कोरोनाला #पत्र

(अ) प्रिय कोरोना
विनंती विशेष पत्र लिहिण्यास कारण की, घरात बसून बसून नुसता कंटाळा आला. म्हणून शेवटी तुझ्याशी काही तरी संवाद करावे म्हणून पत्र लिहिण्याचा प्रपंच. तुला प्रिय तर म्हणता येणार नाही, कारण आवडणाऱ्याला प्रिय म्हटले जाते. तू तर सर्वांचा नावडता तसा माझा देखील. मार्च महिन्यात अचानकपणे आम्हांला सुट्ट्या मिळत असल्याचे सूचना ऐकून जाम खुश झालो होतो. परीक्षा ऐन तोंडावर आली होती, शाळेतला अभ्यासक्रम जवळपास संपला होता आणि द्वितीय सत्राची परीक्षा होणे बाकी होते. येत्या काही दिवसांत म्हणजे दहावीची परीक्षा संपली की आमच्या परीक्षेला सुरुवात होणार होती. पण शाळा बंद झाल्या काही दिवसांनी आमच्या परीक्षा देखील होणार नाही असे बातम्यामधून ऐकण्यात आलं. त्यावेळी तर एवढा आनंद झाला की, तुझ्या नावाने आता पेढे वाटणेच बाकी होते. चीनमधल्या वुहान शहरात तुझा धुमाकूळ चालू होता त्यावेळी आम्ही तुझ्यावर वेगवेगळे विनोद आणि जोक्स करण्यात दंग होतो. चीनला चांगली अद्दल घडविली असं ही कधी कधी मनात वाटून गेलं. त्यानंतर तुझा मोर्चा इजिप्त, अमेरिका असं करत हळूहळू येथे ही दाखल झालास. तुझी वागणूक खरंच खूप निष्ठुर आहे. कुणाला हातात मिळवू देत नाहीस, गळाभेट घेणे तर दूरची गोष्ट. तू कोणत्या माध्यमाद्वारे माणसात प्रवेश करशील याचा काही नेम नाही म्हणून सरकारने अगदी सुरुवातीला जनता कर्फ्यु लागू केली आणि त्यानंतर संपूर्ण देश लॉकडाऊन झालं. पहिला, दुसरा, तिसरा करत आज चौथ्या टप्यात देखील तुझा प्रादुर्भाव वाढतो आहे. गेली पन्नास दिवस आम्ही घरात बसून कंटाळलो आहोत. सुरुवातीचे काही दिवस सोन्यासारखे वाटले, नंतरचे काही दिवस चांदीसारखे, त्यानंतर पितळासारखे आणि आता लोखंडाप्रमाणे वाटत आहे, ज्याची काहीच किंमत नाही. टीव्ही तरी किती पहावी, घरातील बैठे खेळ किती खेळावे, घरातील माणसासोबत खेळायला ती मजा येत नाही जी मित्रांसोबत खेळताना येते. सुट्याचा कालावधी असल्याने पुस्तक हातात घ्यावे वाटत नाही. तरी आई वडिलांचे मन ठेवण्यासाठी थोडा वेळ वर्क फ्रॉम होम केलं. पण ते ही आता नको वाटत आहे. शाळेचे मैदान, वर्गखोली, मित्र-मैत्रणी, शिक्षक, धिंगाणा या साऱ्या गोष्टीची परत परत आठवण येत आहे. पण तुझ्या असण्याने कोणाला काही करता येत नाही. आमचे शालेय शिक्षणमंत्री आणि शिक्षण सचिव तर 15 जूनला शाळा उघडणार असे सांगत आहेत. त्यांचे बोलणे ऐकून मनाला आनंद झाला पण डोक्यात प्रश्नांचे काहूर माजले आहे. दोन मुलांमध्ये शाळेत अंतर ठेवून बसणे, अभ्यास करणे फार कठीण बाब आहे. विद्यार्थी संख्या एवढी मोठी आहे की, एका तुकडीचे चार तुकडी केलं तरच सुरक्षित अंतर ठेवणे शक्य आहे. शाळेत येणारे शिक्षक आणि विद्यार्थी यांची प्रथम वैदयकीय तपासणी होणे गरजेचे आहे. त्यांच्यात कोरोना नसेल तरच पुढील सर्व क्रिया सोपस्कार पार पडेल. तेच जर पोजिटिव्ह असतील तर शाळेतल्या सर्वाना त्यापासून धोका होणार नाही, हे कशावरून ? हा विचार करून काही पालक मुलांना शाळेत देखील पाठवणार नाहीत. शाळा सकाळ दुपार मध्ये भरवली तरी प्रशासन सांभाळणे अवघडच जाणार आहे. ऑनलाईन शिक्षण द्यावं म्हटलं तर सर्वांकडे तशी सामग्री नाही. जे समोरासमोर शिकवल्याने मिळते ते ऑनलाईन कधी ही मिळत नाही, हे ही सत्य आहे. एक वचन देतो की, मी स्वच्छतेचे नियम पाळीन, बाहेरून आल्यावर हातपाय धुवूनच घरात प्रवेश करेन, कुटुंबाला वेळ देईन, सुरक्षित अंतर ठेवीन. प्लिज कोरोना, तू लवकरात लवकर निघून जा, देव लहान मुलांची प्रार्थना ऐकतो असे म्हणतात म्हणून मी प्रार्थना करतो देवा या कोरोनाला आमच्या विश्वातून दूर कर आणि पूर्वीचे दिवस परत एकदा येऊ दे.

तुझाच त्रस्त
यशराज

नासा येवतीकर

Marathi Thought by Na Sa Yeotikar : 111450792
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now