संध्या छाया दाटून आल्या
मोरपीस ते भिजले नयनी
चाहूल हरीची कानी पडता
नाच नाचले थकली अवनी!
न मी प्रेमिका नच मी प्रीती
ना मी श्यामा ना मी भक्ती
मी तर केवळ अंश तुझा अन
मी तर केवळ तुझीच शक्ती!
तुझ्या अवतारी मी तर छाया
तुझ्याच वरती माझी माया
तुझ्या साजिऱ्या अलौकिक कार्या
गाऊनी माझी न थके वाणी
नाच नाचले थकली अवनी!
आठही सिद्धी दासी होती
आपण दोघे दोल्यावरती
नजर आपुली नजरेला भिडता
तारांगण भोवंडले गगनी
नाच नाचूनी थकली अवनी!