काव्योत्सव२
मुक्ति
कुणास ठाउक कुठल्या वेळी कुठे उभा हो सामोरी
आणिक तोडिल नकळत अलगद ही आयुष्याची दोरी
भरकटलेल्या प्राणा पुन्हा नवीन वाहन मिळेल का ?
अथवा नेइल काय विधाता स्वतःसंगती स्वर्लोका ?
चिंता याची करावयाची हे द्योतक वैफल्याचे
परमेशाच्या नियोजनावर निष्ठेच्या वैकल्याचे
आलो येथे तेव्हा नव्हती चिंता कधि येइन याची
फुका करावी का मग पृच्छा अथवा वाञ्छा विलयाची ?
भगवंता, कर मुक्त मला तू जेव्हा येइल नियत घटी
तुझ्या नियोगांच्या पूर्तीस्तव दे तोवर मजला शक्ती
-मुकुंद कर्णिक