‼उत्तम बोधकथा ‼
-------------------------
"मु क्ती"
रेल्वे स्टेशनजवळील सायकल लावण्यासाठी जागा होती.30 रुपये महिन्याला भाडे द्यावे लागायचे.
सायकलींवर लक्ष ठेवण्यासाठी एक म्हातारी बाई बसलेली असायची.चार बांबू आणि ताडपत्री लावून तयार केलेलं छत होत.त्यातच ती आजी राहायची.
साधारण सत्तर वय असावे.
थंडी पासून बचावासाठी एक काळी चादर पण होती. थंडीच्या दिवसात कायम अंगावर घेतलेली ती दिसायची. समोर एक जर्मनचे ताट आणि एक स्टीलची चेपलेली वाटी. एवढंच.
एक दिवस संध्याकाळी तिने मला सायकलीला अडकवलेल्या माझ्या बॅग कडे पाहून विचारलं,"बाळ डब्या मध्ये काही शिल्लक आहे का?"मी क्षणभर गोंधळलो.मग बोललो,"नाही ओ आजी".का कुणास ठाऊक खूप वाईट वाटलं,नाही बोलताना.मग पुन्हा तोच हसरा चेहरा करून बोलल्या"काही हरकत नाही पण कधी काही शिल्लक राहीलं तर टाकून देण्यापेक्षा आणत जा आणि मला देत जा"
हे सांगताना त्यांचा चेहरा जरी हसरा असला तरी त्यांचे डोळे ओशाळलेले वाटत होते.
घरी आल्यानंतर रात्री आईजवळ आजी बद्दल सांगितलं.तिला पण खूपवाईट वाटलं.दुस-या दिवशी सकाळी तिने न सांगता डब्यात 2चपाती जास्त भरल्या आणि बोलली त्या आजीला दे.मला खूप बरं वाटलं.मी निघणार तेवढ्यात बाबांचा आवाज आला,"आता गेल्या गेल्या दे म्हणजे आताच ताजं खाऊन घेतील"
मी हो बोलून निघालो.त्या आजी झोपल्या होत्या.त्यांना उठवून चपाती आणि भाजी त्यांच्या ताटात काढून दिलं. त्या आजींच्या चेह-यावर वेगळाच आनंदं होता. त्यांच्या चेह-यावरील आनंदं पाहून मनाला खूप समाधान मिळालं.
दुपारी ऑफिस मध्ये जेवताना अचानक आजीची आठवण आली
एक चपाती काढून ठेवली आणि मित्रांच्या डब्यात जे जेवण शिल्लक होतं ते माझ्या डब्यात भरून घेतलं.
संध्याकाळी मी तो डबा आजींना दिला. त्या गोड हसल्या.त्यांनी डबा रिकामा करून दिला. त्यातील अर्धी चपाती काढली त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि थोडं दूर जावून पसरून ठेवले आणि त्यांच्या जवळच्या वाटीत पाणी भरून त्या तुकड्याजवळ ठेवलं.
त्या पुन्हा जवळ येऊन बसल्या.
मी विचारलं"आजी काय करताय हे?"
त्या हसल्या आणि बोलल्या...बघ तिकडे.मी तिकडे पाहिलं तर काही चिमण्या आल्या आणि ते तुकडे खाऊ लागल्या आणि जवळच्या वाटीतील पाणी पिऊ लागल्या. मधेच एका चिमणीने एक तुकडा उचलला आणि उडून गेली.
त्यादिवशी जीवनाचा एक वेगळाच रंग दिसला.
कदाचित हेच जीवन होतं.दुस-यासाठी थोडसं सुख घेवून जाणे.
माझं शिक्षण पूर्ण करून पुण्यात आलो जॉब साठी. चांगला जॉब मिळाला तेव्हा आवर्जून त्या आजींना पेढे देण्यासाठी गेलो.त्यांनी पेढा घेतला.अर्धा मला भरवला आणि डोळ्यात पाणी आणून बोलल्या"आठवणीने मला पेढा दिलास यातच समाधान आहे.
पण तू...मला प्रेमाने पेढा दिलास खूप समाधान वाटलं.खूप मोठा हो...साहेब होशील मोठा तू"
मी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि निघालो.
तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की,या जगात आशिर्वाद आणि आनंदं मिळवण खूप सोपं आहे.म्हणजे एखाद्याला आपण आनंद दिला की,त्या बदल्यात आपल्याला समाधान,आनंद आणि आशिर्वाद मिळून जातात.
मध्ये वर्ष निघून गेलं.जॉब आता पर्मनंट झाला होता. म्हणून पेढा देण्यासाठी मी गेलो पण त्या तिथे नव्हत्या. त्यांचं साहित्य पण नव्हतं तिथे.फक्त दूर नेहमीच्या जागेवर ती वाटी होती.तेथे एक पेढा ठेऊन निघालो.
मी जवळच्या टपरीवाल्यास विचारलं,"इथल्या आजी कुठे आहेत?"त्याने आजी गेल्याचे सांगीतले.
मी त्या वाटीकडे पाहिलं.कोरडी पडली होती.मी माझ्या जवळची पाण्याची बाटली काढली आणि ती वाटी पाण्याने भरली आणि त्यांच्या साठी आणलेला पेढा ठेवला तिथेच आणि निघालो तिथून.
चालता चालता सहज मागे वळून पहिलं तर एक कावळा त्या पेढ्यावर चोच मारून खात होता.
अस बोलतात की पिंडाला कावळा शिवला तर समजायचं की त्या व्यक्तिला मुक्ति मिळाली. त्या कावळ्याला पाहून वाटलं कदाचित मुक्ति मिळाली त्या आजीला !!!