#मोरल स्टोरीज स्पर्धा
"देव" दर्शन
संध्याकाळची प्रसन्न वेळ. हिमालयाच्या शिखरांवरून सावल्या उतरु लागल्या होत्या.
दिवसभर निसर्गरम्य माना गाव, व्यासगुंफा,भीमपूल असं पायी फिरून निसर्गाचा आनंद लुटलेले परितोष आणि सई आता मंदिराकडे निघाले.नास्तिक नाहीत पण आस्तिकही नाहीत असे दोघे.
पायातले चपला,बूट कुठेही कसेही फेकत लोक आत जात होते.आपले ट्रेकशूज काढून ते व्यवस्थित स्टँडवर ठेवण्यासाठी परितोष आणि सई पुढे गेले.
त्यांना दिसलं की एक काका भक्तगणांनी इकडे तिकडे फेकून दिलेल्या चपला नीट उचलून स्टँडवर ठेवण्याचं काम मनःपूर्वक करीत आहेत...
घंटा वाजायला लागल्या तशी दोघेही आत गेले.. आरती नावाचा तो गलका ऐकून वैतागले दोघे.
याला मंदिर म्हणावं का? इथे पवित्रता नांदते का? देव खरंचच इथे नसावाच....
अजूनही भक्त येत होते.. इतस्ततः फेकलेल्या चपला ,बूट काका तितक्याच तन्मयतेने स्टँडवर नीट लावून ठेवत होते.
परितोष आणि सईकडे पाहून ते हसले.हे दोघेही मगाशीही आपल्याकडे पाहत होते हे काकांच्या लक्षात आलं होतं.. काका स्वतःहून त्यांच्या समोर उभे राहिले.
"अरे बच्चों,जिंदगी बहुतही प्यारी है! सुंदर है! उसे और सुंदर बनाना है तो इस जगह जैसा रमणीय स्थल नहीं! मैं पिछले पाच सालसे यहाँ आश्रममें रहता हूँ! मेरा गाँव तो गोविंदघाट है! बस अभी ईश्वर की सेवा करनेका मन हुआ तो चल पडा! बर्फ गिरती है तो चार महिने घर वापस जाता हूँ!क्योंकी मंदिरही बंद रहता है!
तरीही सईच्या नजरेतला प्रश्न अनुत्तरितच होता..
काका म्हणाले " मैं मंदिरमें कभी नहीं जाता अंदर दर्शन के लिए!! यह काम ही मेरा भगवान है! जूते उठाता हूँ और अच्छी तरहसे रख देता हूँ! मेरे बद्रीविशालजी "यहीं" है बेटा!!!
सईला आजोबाच आठवले.... पूरूषसूक्त म्हणणारे... सर्व व्यापूनही दहा बोटे उरलेले भगवान विष्णु "इथे" खर्या अर्थाने भेटले.