Marathi Quote in Funny by Aaryaa Joshi

Funny quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

लग्न कोकणातलं गावाकडचं...
माझ्या मावशीचं गाव म्हणजे राजापूर तालुक्यातलं देवाचं गोठणं..
मे महिन्यात मावशीकडे गेलं की आंबे आणि लग्न हे समीकरण जुळायचंच.
गावातल्या पद्धतीप्रमाणे घरात लग्न म्हणजे सर्व वाडीलाच नव्हे तर गावाला ऐकू जाईल किंबहुना सर्व अल्याड पल्याडच्या गावकुसाला कळेल इतक्या जोरात गाणी लावणं...
सड्यावरून ताटल्या चमचे वाजवीत वरात जायची तेव्हा न पाहिलेल्या नवरा नवरीबद्दल आम्हालाच उत्सुकता वाटायची.
आधी व्हायचा साखरपुडा... माझ्या ताईचा साखरपुडा हे गाणं हमखास वाजायचं आणि गावागावात मुलं अक्षरशः थाळ्यांवर चमचे वाजवत साखर वाटत फिरायची..
दुसर्‍या दिवशी हळद... मग सगळी वाडी तिकडे लोटणार लग्नघरी... पिवळी पिवळी हळद लागली या गाण्याची आवर्तनं चालायची मोठ्या आवाजात.
स्थानिक आणि कौटुंबिक प्रथेची लोकगीतंही महिला म्हणत तेही ऐकू येई.
लग्नाच्या दिवशी तर धूमच.... रामरक्षा म्हणून लागलेलं लग्न मी इथे ऐकलं आणि पाहिलं...
कुणाच्यातरी लग्नाला जायचा योगही आला दोनदा...
नवरा नवरी दिसायचेही नाहीत त्या गर्दीत... आमटी भात आणि गोड बुंदी... पत्रावळींवर पंगती...
सांगतेला नवरा नवरी निघत. सजलेल्या वेशात गळ्यात हार,डोक्याला बाशिंग,उपरणं आणि शेल्याची गाठ अशी स्वारी निघे.
त्यांच्या चार बाजूंना चार माणसे डोक्यावर चादर धरून निघत.त्याखालून नवरा नवरी चालायचे.
सडा चढण्यापूर्वी मावशीच्या दारी पाया पडायला जोडी येई कारण काका गावचे खोत!! शहरात राहत आणि खोती संपली तरी मान कायम मिळायचा.
त्या नवरीची ओटी भरुन मावशी तीला भेटवस्तू देई. तो सगळा सोपस्कार आणि अन्य वर्‍हाडी दारात थांबलेले.करा आणि दिवा घेतलेल्या बहिणी फक्त मागोमाग येत...
दुसर्‍या दिवशी सत्यनारायणाची पूजा आणि गावजेवण वराच्या गावी..
चार दिवसांचा गोंधळ थांबे.दमून भागून वर्‍हाडी पांगत. संध्याकाळी एसटी गावात मुक्कामी पोचली की वर्‍हाडी परतण्यासाठी सामान बांधत. सकाळीच मांडवाची आवराआवर सुरु. सातच्या एसटीला आपल्या नव्या कोर्‍या नणंदा,जावा,भाचरं यांना निरोप द्यायला नवी नवरी कोर्‍या साडीत नटून थांब्यावर सहकुटुंब उभी दिसे...
पण मग मधूनच कुठूनतरी आवाज ऐकू येई... "नेसले ग बाई चंद्रकळा ठिपक्याची...."
चला म्हणजे उद्या पहाटेपासून या वाडीत चौघडा वाजणार तर याची ती चाहूलच असे.
नवी उत्सुकता आमच्याही डोळ्यात मावत नसे....
नारळी पोफळी आणि निवांत खाडीचं पसरलेलं पाणी आणि झाडावर हेलकावे खाणारे आम्रराजही हा सोहळा पाहत राहत....

Marathi Funny by Aaryaa Joshi : 111070146
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now