#ऐतिहासिक दिवाळी# एका वर्षी आम्ही दिवाळीला पन्हाळ्यावर गेलो होतो.मसाईचं पठार अख्ख चाललो,लेणी पाहिली.लक्ष्मीपूजनाच्या रात्री अख्खा किल्ला केवळ कंदिल आणि पणत्यांनी सजला होता.प्रत्येक घरापुढे सुंदर रांगोळी.कृत्रिम झगमगाटापेक्षा या पणत्यांची आरास सुखावून गेली.पाडव्याच्या रात्री अचानक दहा वाजता आवाज आला.हाॅटेलच्या खोलीच्या खिडकीतून खाली लगबग दिसली.किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी कोल्हापुरातला एक गट रात्रभर कार्यक्रम करणार होता.तडक खाली गेलो.शिवचरित्र गाणारे पोवाडे,मर्दानी खेळ अशी सुंदर गुंफण पहात पहात रंगून गेलो.खालच्या गावांमधली दिवाळी नजरेत भरत होती.किल्ल्यावरची पणत्यांची आरासही आता पेंगू लागली होती.गुलाबी थंडीही आता पहाटझुळकांमधे गुरफटून गेली.रात्री दहा ते पहाटे पाच!!! मध्यरात्री कधीतरी संयोजकांतर्फे गरम चहा दिला होता.आता सकाळचा चहा प्यायची वेळ झाली होती...भाऊबीजेचा दिवस सुरु झाला होता..