'पार्टनर'
एखाद्या व्यक्तीला ती जशी आहे तशी, तिच्या चांगल्या वाईट सवयीं सोबत , गुणदोषांसकट , आवडी निवडी सहित स्विकारण म्हणजे नात जोडण / निर्माण करण असत. हे नात फुलासारखं उमलत बहरत जात.. उमलताना त्याचा गंध आपल जगण समृद्ध आणि सुगंधित करून जात. अशा नात्याच्या सहवासात आयुष्याचा वेगळाच पोत गवसतो. दोन मनात कधीही न तुटणारी नाळ बांधली जाते. मग फरक पडत नाही कि हे दोन मन अनोळखी होते कि आधीपासून प्रेमात होते. नवीन नात जन्म घेत. हळहळू बहरत जात.. एक घट्ट विन तयार होते. आणि जगण्याला अर्थ गवसतो. कुठे पोहोचायचं आहे त्या ठिकाणापेक्षा तिथवर जाण्यासाठी करावा लागणारा प्रवास हवा हवासा वाटू लागतो. सोबतच्या व्यक्तीची साथ सुंदर वाटू लागते. प्रत्येक प्रवसात अडथळे असतातच पण जर निवडलेली व्यक्ती ‘मस्त’ असेल आणि आपली समोरच्याला समजून घेण्याची तयारी असेल, प्रेम घेण्यापेक्षा देण्याची तयारी असेल तर सगळच मोहक होवून जात.
...पण याउलट आयुष्याचा साथीदार निवडताना, त्याच्या आवडी निवडी , त्याची स्वप्न मागे सोडायला लावून , आपल्याला हवे ते बदल करून , आपल्या मनाच्या ठराविक साच्याची पूर्ती करण म्हणजे नात जोडण नव्हे. त्याला तडजोड म्हणतात. आणि तडजोडीवर जोडली जाणारी नाती आतल्या आत दडपत जातात. ती कधी उमलत नाहीत. आणि त्याच्या उमलण्यात आपल्याला फुलंपाखरा सारखा बागडण्याचा आनंद कधीच मिळत नाही. अशी नाती फक्त कर्तव्य म्हणून निभावली जाण्याची जास्त शक्यता असते. भलेही हे नात शेवटपर्यंत टिकवल जात असेल पण ‘फक्त सोबत राहण्याला.. नात नाही ना म्हणता येत.’... कधी कधी आपल्या निवडलेल्या व्यक्तीची एखादी सवय , इच्छा , स्वप्न जगाच्या नजरेत चुकीच असेल , वाईट असेल, विचित्र असेल पण आपल्या नजरेत त्याच अभिमानाने कौतुक असायला हव. साथीदार निवडताना आपल्या इतकाच समोरच्याच्याही मनाचा विचार करायला हवा..
शरीराच काय..गळुन पडतील एक दिवस त्वचेची सगळी आवरणं ! संपून जातील सौंदर्याचे स्त्रोत ! आटून जातील सगळे स्त्राव ! तेव्हा.. तेव्हा काय उरेल ? फक्त दोघांचे स्वभाव , सवयी , विचार आणि मन. म्हणूनच एखाद्याच्या डोळ्यात घर करण्यापेक्षा एखाद्याच्या मनाच्या गाभाऱ्यात पाझराव...खोलवर..जिथुन मनाचा खरा तळ स्पष्ट दिसेल. ज्यात प्रेमाची खरी कमळ फुलवता येतील. कधीच न सुकणारी.. कधीच न उन्मळून पडणारी. नितांत सुंदर. विश्वसनीय..! ज्यांना कसल्याच आवरणाची गरज भासणार नाही. तिथ जे काही असेल ते pure असेल. शेवटपर्यंत....
- साधना वालचंद कस्पटे ©