मी विचारलं जगातील महान लेखक/कवी कोण ?
हे विचारल्यावर गुगलने ही भली मोठी लिस्ट दिली
पण गुगल ही चुकतो की हो..
तो विसरला एक नाव...'देव'
जगातील सर्वात महान काव्य त्यानेच तर रचली आहेत
ही झाडं.. ही फुलं..नद्या..डोंगर..
किती मोहक कविता आहेत या..त्याही कधीच नष्ट न होणाऱ्या !
निळं आकाश..काळी जमिन..
शुद्ध हवा..कोवळ ऊन..
मिळेल का हे पुन्हा नव्याने लिहुन..?
कुठेही पोहचायचं नसतं तरीही उडणारी पाखरं
कुणालाही ञास न देता जगणारी जनावरं..
अंधार कुठे कुणाला अडवतो ?
तरी जगासाठी उजेड पेरणारा चंद्र आणि चांदण्या..
कुठे कुणाला काळजी ढगांच्या अडलेल्या वेदनेची
तरी कोसळतो पाऊस जमिनीला भिजवण्यासाठी
जमिनीला कशाला हवेत झरे ,नद्या, विहीरी अन पाणी
तरी ओठी घेतेच साठवुन थेंब थोडे झाडा-पाना-फुलांसाठी..
फुलं स्वतः सुगंध घेतात का ?
फळं स्वतः रस चाखतात का ?
झाडं स्वतः सावलीत बसतात का?
सूर्याला कधी उन्हाची गरज भासते का ?
वारा कधी श्वास घेतो का ?
चंद्र कधी अंधाराची वाट बघतो का ?
आहे का अशी कुठली कविता जिला पावसाची सर येईल ?
अशी कुठली चारोळी जी झोपायला चंद्र चांदण्यांच आभाळ देईल ?
असा कुठला शेर जो सूर्याची जागा झाकोळून जाईल..?
खरंच ईश्वरापेक्षा महान लेखक/कवी कोणी नाही
माणसं किती प्रकारची..
तिथेच चेहरा..तिथेच नाक डोळे..
तरीही प्रत्येकजण वेगळा दिसतो..
आपण फार तर २-४ भाषा लिहु शकू
पण त्याच्या भाषेची गिणती आकड्यां पलिकडची
वर नजरेची भाषा..स्पर्शाची भाषा..
शब्दांची भाषा.. चिञांची भाषा..शिल्पाची भाषा..वेगळीच
आपण लिहु फारतर १०० कथा अन ५०-६० कविता..
पण तो लिहीतो प्रत्येक माणसाची वेगळी कथा
गद्य पद्य अन आयुष्यभराच्या असंख्य कविता..
कदाचित म्हणुनच माणसाने बनवलेल्या इंटरनेट च्या यादीत नसेल का त्याचे नाव ?
- साधना वालचंद कस्पटे ©?