बी.एड्.फिजीकल कॉलेज, कांदिवली भाग १२
पण आदल्या दिवशी एकत्र बसून गीताच्या कोणत्या ओळीला कोणती कृती करायची तेवढं ठरवलं होतं. सादरीकरणाचा फक्त लीडर मी होतो. पण कृती माझ्या एकट्याच्या चिंतनातून सुचलेल्या नव्हत्या. सामूहीक चिंतन हे आमच्या यशा मागचं खरं रहस्य होतं. तीन वेगवेगळ्या प्रकारे धावणं टी.बी पाटील ने करून दाखवलं होतं. चवड्यावर उभं राहून हात उंचावून झाडं कशी डोलतात हे ग्रूप लिडर डुंबरेने दाखवलं होतं.सशाच्या टाण् टाण् उड्या चावरेकरने दाखवल्या होत्या. सर्कशीत सशाने मारलेली कार्ट व्हील नी कोलांटी उडी ही अनभुलेची सुचना होती. गीत फक्त मी निवडलं होतं आणि सादरीकरणात माझं शहाणपण न गाजवता सर्वानी केलेल्या सुचनांचं कसोसीने पालन केलं. तुला खरं नाही वाटणार पण आमचं डिस्कशन झालं तेंव्हा स्पर्धेत नंबर आमचाच येणार याची सर्वांनाच खात्री होती.”
“बाकीच्यांची सादरीकरणं पहाताना आम्ही एकमेकाना नंबर आमचाच असं थंब दाखवून खुणावीत होतो. श्रेय गटाच्या सामूहिक चर्चेला द्यावं लागेल. रागावू नकोस ताई पण, सरावाला कष्ट कानडे-मेढेकरच्या गटानेही घेतले होते की. त्यांच्या गटाने तर सर्वांचं जबरदस्त मनोरंजन केलंच की. त्यानाही आपल्यालाच पहिला नंबर मिळेल असं वाटलं होतं. पण इथे विषय वेगळा होता. गीत गायन करता करता सहज कृतींमधून सर्वांग सुंदर व्यायाम अभिप्रेत होता. नृत्य ही कृती अहे यात शंकाच नाही. पण प्रत्येक कृती हे नृत्य नाही होवू शकत. त्या दोन भिन्न संपल्पना आहेत. देवाने तुम्हा मुलीना भरभरून अक्कल दिलेली असूनसुद्धा कृतीयुक्त गीत याचा अर्थच तुम्हाला नाही कळला असं दुर्दैवाने म्हणावं लागेल.” चित्रे नेहेमीप्रमाणे कोपरा पासून हात जोडीत म्हणाली, “अॅऽहॅहॅहॅ.... काय पण टपली मारतोय्य. देवाने आम्हालाच भरभरून अक्कल दिली नी मुलाना काय कमी अक्कल दिली का? तुम्हा कोकण्याना तर गरजेपेक्षा थोडी जादाच दिलीय् की...”
पाठीमागे टाळ्या वाजल्या म्हणून बघितलं तर सानप मॅडम होत्या. विनोदबाला हसत म्हणाली,“मी तरी आमचे दोनी ग्रूपला बारबार मणत होती. आमचा ये अॅक्शन सॉंन्ग कम पण डान्स जादा वाटते. मैंने बार बार मिन्नते की..... एकबार छोटे भैय्या को बुलाकर उसकी राय लेनेमें क्या हर्ज है...? लेकिन इन लोगोने तो मेरी एक नहीं सुनी...” मेस जवळ मेढेकर नी कानडे दुक्कल भेटली. विनोदबाला त्याना बघितल्यावर खो खो हसत सुटली. “ कौन कुछ कहे लेकिन तुम्हारा वो तमाशावाला गीत देखकर तो हंसीके मारे मेरे पेट मे दर्द हो रह है . वैसे देखा जाए तो नंबर तुमनेही जीत है...” त्या बापड्याना यातली खोच कळलीच नाही. मी आमचं गीत नी कृती संहिता मुद्दाम पुढे दिली आहे.
कोणास ठावूक कसा पण रानात गेला ससा(कानाशी पंजे जुळवून उकिडवं राहून तुरूतुरू चालण्याची कृती)
ससोबा लपला झुडूपा आड (उडी मारून अंग आक्रसून मुरकुंडी मारून बसण्याची कृती)
उड्याही मारल्या टाण् टाण्ण टाण्ण (कानाशी पंजे जुळवून उकिडवं बसून छलांग उड्या मारणे)
झाडे म्हणाली छान छान (हात वर उभारून चवड्यावर उभे रहात मागे पुढे , डावीकडे उजवीकडे डोलण्याची कृती)
ससा म्हणाला काढा पान (कमरेत वाकून उडी मारीत हात पुढे करणे)
कोणास ठावूक कसा पण सर्कशीत गेला ससा (तिरके चालणे)
सशाने मारली उडी ( कार्ट व्हील व कोलांटी उडी मारणे)
झर झर चढला शिडी (चढायची कृती)
विदुषक म्हणला वाहव्वा (हाताचे पंजे कानाजवळ धरून डोलणे) ससा म्हणाला चहा हवा (उडी मारून कमरेत वाकून हात पुढे)
कोणास ठाउक कसा पण शाळेत गेला ससा (दप्तर घेवून दुडक्या चालीने चालणे)
सशाने म्हटले पाढे बेकंबे बे दुणे चार बे त्रिक सहा बे चोक आठ (पटकन खाली बसून मान वेगाने वरखाली करणे)
झर झर वाचले धडे (दोन्ही पंजे पसरून पुस्तक मान उजवी डावीकडे वेगात हालवणे )
गुरुजीम्हणाले शाब्बास (मागे झुकून एकामेकाच्या पाठीवर थोपटणे)
ससा म्हणाला करा पास (एक हात कमरेवर, पुढे मागे झुकणे)
पुढे ज्या ज्या मुलाना अॅक्शन सॉन्ग चे पाठ लागले त्या सर्वानीच सशाचं गीत वापरलं.सुरुवातीला अनभुले, बाबर , कुटे आणि दुर्गा खराडे या चौघाना हाच घटक लागला होता. शाळा वेगवेगळ्या होत्या. त्याना आमच्या रूम बाहेर व्हारांड्यात सराव देवून तीन दिवस चांगली तयारी करून घेतली. चौघांचेही पाठ चांगले झाले. त्यानंतरही सात आठ जणाना हाच घटक लागला. त्यावेळी अनभुले, बाबर दुर्गा यानी त्यांची तयारी करून घेतली. लेझिम , घुंगूर , काठी या साधन सहित पाठांसाठी प्रभू, चावरे ही तयारी करून घेत. आमची रूम म्हणजे जसेकाय छोटेखानी सराव केंद्रच झाले होते. एरव्ही अक्कड दाखवणारा मुच्छड थोरात ‘ ल्येसन नोट दुरुस्त क्रून घ्याय साटनं’ माझ्याकडे यायचा.
बहुसंख्य स्पर्धा जवाहर नी भोसला याच कुलानी जिंकलेल्या होत्या. कबड्डी मध्ये देवधरचं जवाहर कुल नी भोसला कुल यांचा अटी तटीचा सामना होता. देवधर नी धडस हे दोघेही स्टेट लेव्हल आणि युनिव्हर्सिटीत झोनल गाजवून आलेले. त्या दोघानी मॅच जिंकून दिली. भोसलावर तीन लोण चढल्यामुळे त्यांची हार निश्चित होती. त्या कुलातल्या खेळाडूंची सूड भावना जागृत झालेली होती. धडस नी देवधर त्याना अक्षरश: खेळवीत होते. शेवटचं दीड मिनीट उरलं होतं देवधर सर्वीस करून परतण्यापूर्वी मेढेकर बेभान होत पुढे आला नी मागचा पुढचा विचार न करता तो पहिलवानाचा पट काढतात तसा पुढे घुसला. त्याला टच करून देवधरने डावा पाय मागे करीत सेण्टर लाईन वर ठेवला. मेढेकरने त्याच्या उजव्या ढोपराला कैची टाकली. देवधरच्या त्या ढोपराची सांधा अधे मध्ये डिस लोकेट होत असे, हे सर्वानाच माहिती होतं. म्हणूनच त्याला जायबंदी करण्यासाठी मेढेकरची ती खेळी होती. देवधर खाली कोसळला पण पडता पडता त्याने मेढेकरच्या पाठीत कोपर दुडून असा रगडा घातला की तो बोंब मारीत बाजूला गेला. देवधरचे ढोपर डिसलोकेट झालेले होते. प्रा. कांगणे सरनी देवधरच्या ढोपराचा सांधा बसवून दिला.
मेढेकरला असा जबर प्रसाद मिळाला होता की, तो वेदनेने कळवळत होता. त्याला धड सरळ होणं ही मुष्किल झालं होतं. सातारा गटातले सगळे जण जमा झाले. आता असेंब्ली सुटल्यावर ते वचपा काढणार असं चित्र दिसायला लागलं. देवधर पंढरपूरचा. तो कोणत्याच गटात नसायचा. मेढेकरच्या गटाची हमरी तुमरी सुरू झाल्यावर विनोदबाला, मोहीनी, जोगेश्वरीच्या गंभीर हायस्कूल मधून लीव्हवर आलेला ओक, आबा चौधरी ही मुंबईची मुलं पुढे आली. चौधरी जरब देत म्हणाला, “चूक मेढेकरची आहे. कैची मारायला बॅन आहे. त्याने मुद्दाम देवधरवर सूड उगवण्यासाठीच हल्ला केला. हे सरळ सरळ दिसत असताना तुम्ही ग्रूपिंग करून हाणा मारीवर आलेत तर आमच्याशी गाठ आहे .” बाकीच्यानीही दुजोरा दिला. बॅच मधले सगळेचजण मुंबईच्या मुलाना टरकून असत. मागे अशीच हमरातुमरी झाल्यावर चौधरी ट्रक भरून पोरं घेवून आला होता. त्यावेळी सगळ्यानी हाता पाया पडत माफी मागितली होती. त्यामुळे त्याना नाईलाजाने या प्रकरणावर पडदा टाकावा लागला होता. देवधरने दिलेला प्रसाद मेढेकरला माहिनाभर भोवला. आश्चर्याची बाब म्हणजे अशा बाचाबाची होत तेव्हा प्राध्यापक मंडळी गप्प बसून मजा बघित रहात. त्याना माहिती होत की यांची परभारे वासलात लागणार आहे.
शनिवारी असेंब्ली झाल्यावर मी कधी गोरेगावला निळू भाऊंकडे तर कधी मालाडला मावशी कडे जात असे. तिकडे गेलो की शेजारची कोण कोण मुलं येत. विशेषत: दहावीत जाणारी तीन चार मुलं मी गेलेला दिसलो की हटकून यायची. दहावीच्या परिक्षेत इंग्लिशमध्ये ट्रान्सफॉर्मेशन सिंथेसीस वर आधारित प्रश्न, निबंध, पत्र लेखन यात त्याना शाळेत दिलेले स्वाध्याय सोडवायला माझी खुप मदत व्हायची. (क्रमश: )