बी.एड्.फिजीकल कॉलेज, कांदिवली भाग ११
या शिंदें प्यूनची एक मजा होती. ते जेमतेम सही पुरते शिकलेले. पण सरावा सरावाने फाड फाड इंग्रजी पाजळून दाखवीत. “ सुपेकर सुप्रिटेण्ड क्वॉलिंग यू प्रभू अॅण्ड काळे सर. कोन्सुलेट लेटर यू टेक. गो व्हिटी स्टेशण निअर ब्रिंगिंग पिक्चर फिलिम फ्रेंच कान्स्युलेट.” असा प्रकार होता. पण बोले असा काही धडकावून की इंग्रजी न येणारा सर्द व्हायचा. प्रभू त्याला त्याच भाषेत, “ यस यस मिष्टर शिंदे गोईंग सुपेकर साहेब अॅण्ड टेकींग लेटर. ”
असेंब्लीचं रेकॉर्ड शिंदे सर ठेवीत. त्याना ते पत्र दाखवलं की ते त्यांच्या डायरीत लिहून ठेवीत. आम्ही व्हीटीला जावून मॅटिनीला जुना पिक्चर बघित असू नी मग कॉन्सुलेट मधून फिल्म घेत असू. माझी आर्थिक कुवत न सांगण्या सारखी होती. मुणगे हायस्कूलला मला ३६५ रुपये पगार होता. दहा महिने दरमहा १००रुपये खाणावळ आणि माझा इतर खर्च भागवून पगारातून साठवलेले सोळाशे रुपये हे माझं भांडवल. वडिल सेवानिवृत्त, त्यांचे पेन्शन जेमतेम आईचा नी त्यांचा निर्वाह तोही काटकसरीने चालवता येईल इतपत. माझी मोठी विवाहीत बहिण नी भाऊ त्याच वर्षी बी.एड. करीत होते. मला कुठुनच आर्थिक मदतीची आशा नव्हती. असलेली पुंजी पुरवून पुरवून वर्ष काढायचं होतं. पण प्रभू सधन होता. त्याच्या मोठ्या भावाची गोरेगावला प्रिंटिंग प्रेस होती. तो बिनबोलत तिकीटं काढी. एरव्ही कधिही खर्च करायची वेळ आली तर तो पुढे असायचा. बी. एड्. च्या वर्षात आम्ही मॅटिनीचे ४३ शो बघितले. मी त्या सिनेमांची यादी बनविलेली होती. अगदी अलिकडेपर्यंत ती माझ्या संग्रही जपून ठेवलेली होती.
अधून मधून कुलनिहाय स्पर्धा व्हायच्या. त्यांची नोंद ठेवून वर्ष अखेर विनर कुल निवडलं जायचं. त्या मुळे या स्पर्धांमध्ये अटी तटीची चुरस व्हायची. आमच्या रणजित कुलात पट्टीचे खेळाडू फार कमी होते. आमचं कुल क्रिकेट आणि कृतियुक्त गीत/ अक्शन सॉंङग या दोनच स्पर्धात जिंकलं. अॅक्शन सॉङग स्पर्धेत मुलांची चार नी मुलींची भारती ज्योती अशी सगळी सहाच्या सहा कुलं स्पर्धेत होती. चित्रेने आगगाडीचं गीत निवडलं होतं. नागमोडी पळणं, थिरकत थिरकत चालणं अशा कृती होत्या. नृत्य हे महिलांच्या अंगातच असतं. त्यानी सरावही कसून केलेला होता. त्यामुळे सादरी करण प्रेक्षणीय होतं यात वादच नाही. अधून मधून कुलनिहाय स्पर्धा व्हायच्या. त्यांची नोंद ठेवून वर्ष अखेर विनर कुल निवडलं जायचं. त्या मुळे या स्पर्धांमध्ये अटी तटीची चुरस व्हायची. आमच्या रणजित कुलात पट्टीचे खेळाडू फार कमी होते. आमचं कुल क्रिकेट आणि कृतियुक्त गीत/ अक्शन सॉंङग या दोनच स्पर्धात जिंकलं. अॅक्शन सॉङग स्पर्धेत मुलांची चार नी मुलींची भारती ज्योती अशी सगळी सहाच्या सहाकुलं स्पर्धेत होती. चित्रेने आगगाडीचं गीत निवडलं होतं. नागमोडी पळणं, थिरकत थिरकत चालणं अशा कृती होत्या. नृत्य हे महिलांच्या अंगातच असतं. त्यानी सरावही कसून केलेला होता. त्यामुळे सादरी करण प्रेक्षणीय होतं यात वादच नाही.
कानडेच्या गटाने ‘राधे जरा वाकून टाक सडा मुखामध्ये घाल विडा’ हे गीत घेतल होतं हे अॅक्शन सॉंग पेक्षा विनोदी वाटलं. त्यात कान्हा माझा पदर नको ओढू/आणि नटून थटून बाजारी जावू सख्या असल्या काही ओळी होत्या. गटनेता कानडे गीत नी कृती सादर करीत असताना त्या गटातला मेढेकर त्याच्या समोर राहून तमाशातल्या मावशीसारखा डोक्यावरून ओढणीचा बोखारा घेवून अचकट विचकट अंगविक्षेप करीत रहिलेला होता. हा आचरटपणा बघताना आमची हसून हसून मुरकुंडी वळली. सादर करणाराना आपल्या कृती विसंगत आणि हास्यास्पद ठरत आहेत याचं भानच नव्हतं . उलट लोक हसले म्हणताना सादर करणारे अतीच चेकाळले. प्रभू ने गटाचा सराव बघितल्यावर तो एकदाही प्रॅक्टिसला थांबला नाही. स्पर्धेच्या दिवशीही बी चीट घेवून आला . बी चीट म्हणजे क्टिव्हीटीज मध्ये भाग घ्यायचा नाही पण असेंब्लीला हजर रहावे लागे.
मुच्छडच्या गटात फडतरेने ‘लाल टांगा घेवूनी आला लाला टांगेवाला’ हे गीत सादर केलं. यात लीडर मध्याभागी नी बाकीचे गोलाकार उभे करून एकदा घड्याळाच्या देशेने एकदा विरुद्ध दिशेने पळणे एवढ्याच कृती होत्या. विनोदबालाच्या गटाने मारवाडी कृष्णगीत सादर केलं. या गटात वळवईकर ही नृत्य शिकलेली असल्यामुळे सगळ्यांचेच पदन्यास फार विलोभनीय होते. जवाहर हाऊसने नन्हा मुन्हा राही हूं गीत बसवलेलं. कोल्हापुरेने गीताचं गायन केलं नी महात्मेने कृती सादर केल्या. मात्र मार्चिंग, दहिने बाहे मूड अणि सॅल्यूट याशिवाय काहीच कृती नव्हत्या. कनडेच्या गटाने राधे जरा वाकून टाक सडा हे गीत घेतलं. मी कोणास ठावूक कसा पण रानात गेला ससा हे गीत बसवलं होतं. यात नगमोडी/ तिरके/ दुडकत धावणे, उड्या मारणे,उठणे बसणे, झुकणे,डोलणे अशा बहुविध कृती होत्या. सादरीकरण संपल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला त्यावरून नंबर ठरल्यातच जमा होता. परीक्षक होते प्रा. सानप मॅडम आणि जाधव सर. प्रा. जाधव आढावा घेताना म्हणाले, “कोल्हापूरेच्या गटाचं गीत ऐकण्यासारखं, पण मार्चिंग नी दहिने बाहे मूड शिवाय बाकी काहीच कृती नव्हती. काही ओळीना कदम ताल , कार्ट व्हील , हॅण्ड स्टॅण्ड समर सॉल्ट अशा काही जिम्नास्टिक फ्लोअर अॅक्टिव्हीटीज घेतल्या असत्या तरी चाललं असतं.
कानडेचं गीत म्हणजे कृती कमी नी अचरटपणा जास्त. कृतीयुक्त गीत कसं नसावं याचा तो नमुना होता . मुलींच्या दोन्ही गटांची कृतीयुक्त गीतं म्हणजे नृत्याचे कार्यक्रम होते. नी टांगा गीत म्हणजे निरर्थक गोलाकर पळणे. सशाच गाणं मात्र अनेक वॉर्मिंग अप अॅक्टिव्हिटीज वर आधारलेलं वाटलं. मग प्रा. सानप मॅडम यानी अभिप्राय दिला. मुखामध्ये घाल विडा, मथुरा बाजारी जावू आणि इतर काही ओळी ज्यांचा उल्लेखही अशोभनीय ठरेल म्हणून करणार नाही. हा आक्षेपार्ह भाग आणि मेढेकरचा शुद्ध आचरटपणा होता. हे गीत उद्या एखाद्या शाळेत पाठाच्या वेळी सादर केलंत तर हाकलून काढतील. कोल्हापूरेचं किमान गीत तरी श्रवणीय वाटलं. बाकी प्रा. जाधव म्हणाले त्याच्याशी मी सहमत आहे. त्याने कोल्हापुरेंच्या गटाला ज्या सुचना केल्या त्या खरंच त्यांची मर्मज्ञ दृष्टी अधोरेखित करणाऱ्या आहेत. मुलींच्या गटाचे नाच बघायला तरी छान वाटले. त्यानी खूप कष्ट घेवून सराव केलेला होता. नृत्यामध्येही व्यायाम होतो हे खरं पण इथे नृत्यगीत हा विषय नव्हता. शाळेत मुलांचा गट असेल तर ते असं नाचून दाखवतील का? आम्ही परीक्षक खरं तर दोघं दोन बाजुला बसलो होतो. पण आमचं मुल्यमापन सारखं आहे. पहिला नंबर कोणास ठावूक कसा या ससोबाच्या गीताला. हे गीत सर्वार्थाने कृतीयुक्त गीताचा उत्तम वस्तुपाठ म्हणावा लागेल. सादरीकरण झाल्यावर सगळेजण घामाघूम झालेले होते. दुसरा नंबर मुलींच्या गटाला विभागून नी तिसरा नंबर द्यायचाच आहे म्हणून नी सुंदर गीत म्हटलं म्हणून कोल्हापुरेंच्या गटाला.” आमच्या रणजीत कुलाला आज प्रथमच क्रमांक आणि तोही पहिला मानाचा मिळाला होता.
रूमवर जाताना चित्रे म्हणाली, “आम्ही आठवडाभर मरीमर प्रॅक्टिस केली होती.नाइक दीदी दोनदा नजर करून गेल्या. त्या म्हणाल्या की, सगळ्यांच्या अॅक्शन सारखा व्हायला हव्या. म्हणून आम्ही जीव तोडून कष्ट घेतले. नृत्य म्हणजे कृती आहेच ना? पण छोटे भैयाने आमचा नंबर हिरावून घेतला.” मी म्हणालो की, “मला व्यक्तिश: आवडलेलं नी बघण्यासारखं सादरीकरण भारती ज्योती दोन्ही गटांचं. त्यात सरस नीरस ठरवणं अवघड. पण मारवाडी गीत मला जास्त आवडलं भाषा कळली नाही तरी आशय समजला.तुम्ही खूप मेहनत घेतलीत हे सादरीकरण पहाताना समजलं आम्हाला. यात अॅक्शन करताना मागेपुढे झालं तरी चाललं असतं. आमच्या सादरीकणाच्या वेळी अनभुले नी काझी यांच्या अॅक्शनना सगळे जीव जाईतो हसले. कारण आम्ही एकदाही सराव केलेला नव्हता नी तशी गरजही नव्हती. (क्रमश: )