सुरेल सकाळ
पहाट आणि सकाळच्या सीमा रेशेवरची वेळ . शांतता नुकतीच कूस बदलून आळोखे पिळोखे देत जागी होऊ लागलेली. लवकर लगबगीने बाहेर पडलेली पावले आवाज न करता झप झप निघालेली. मंदिरातून येणारे भजनाचे सूर हळू हळू जवळ येत चाललेले... विठ्ठल माझा माझा माझा मी विठ्ठलाचा.... त्या सुरांनी मंदिरात जवळ जवळ खेचून नेलं. खिळवून ठेवलं. कापायचं राहिलेलं अंतर, हातात असलेला वेळ , वेगाचं उद्दिष्ट सगळं सगळं विसरुन एका जागी पुतळा करणारे ते स्वर.... डोळ्यांचा कॅमेरा आणि कानांचं रेकॉर्डिंग डिव्हाइस करुन तो अनुभव मनात टिपून घेतला. बुवा स्वच्छ स्वरात गात होते. टाळकरी साथी, मृदंग, एकतारी सगळ्य़ांचा सुरेख मेळ जमला होता. भजनावर इतर संगीताचं आक्रमण नव्हतं. परंपरेने चालत आलेली चाल, बुवांचा अतिशय गोड आवाज आणि त्यांना सहकार्य़ांनी केलेली पूरक चाल असं सगळ6 फार छान जमून आलं होतं.
तुळशी माळ घातलेली विठ्ठल रखुमाईची मूर्ती, गाभार्य़ात भरुन राहिलेला मंडपात दरवळणारा फुला तुळशीचा , उदबत्ती धूपाचा सुगंध आणि हे गोड सुस्वर..... पावलं पुढे चालू लागली. पण मन मात्र त्या सुरांमधे, त्या परिमळात गुंतून राहिलं....
विठ्ठल माझा माझा.... मी विठ्ठलाचा
डॉ.सदानंद चावरे
27-10-2018