"आठवण..."
डोळे भरून पाहिलं फुलला, पण त्यात तो गंध नव्हता,
बाटली अत्तराची तीच; पण तुझ्या स्पर्शाचा सुगंध नव्हता.
डोळे मिटतच माझे चेहरा तुझाच दिसतो,
पहाते आरश्यात जेव्हा आरश्यातही तूच असतोस,
तरीही या आरश्याला आकार पण अर्थ नव्हता,
कारण ज्यात दोघे एकत्र दिसलो तो हा आरसा नव्हता.
प्रेमात म्हणे पावसात भिजवसं वाटतं,
कधी इथे कधी तिथे उडावसं वाटतं,
मला मात्र पाऊस कधी आवडतच नव्हता,
तू आणि मी आणि सरी वर सर; याहून प्रेमाचा पाऊस कधी अनुभवलाच नव्हता.
कविता अपूर्ण वाटते..पूर्ण करायला येशील ना?
मला आठवण येते तुझी; तुला पण तर येते ना?
कवटाळून घेतलं उशिला पण डोळा लागत नव्हता,
कारण कवटाळलेल्या उशिला तुझ्या मिठीचा उसासा नव्हता.
कवयित्री: संस्कृती गुणवंतराव काळे