🍁 गझल....🍁
अलगद असा बरसतो हा धुंद पावसाळा
देतो कळ्या फुलांना मग गंध पावसाळा
बरसून थेंब पडता गाली हळूच शीतल
छळतो तनामनाला बेधुंद पावसाळा
प्रीती करून हिरव्या धरणीसवे सुगंधी
गंधाळतो धरेला मृदगंध पावसाळा
लेवून शुभ्र धारा अंगात मोतियांच्या
बागेत डोलतो हा निशिगंध पावसाळा
रेखाटताच प्रतिमा गगनात सप्तरंगी
ओठावरी फुलवतो आनंद पावसाळा
अलवार वाजवूनी पावा मधूर कान्हा
देतो उभ्या जगाला मधुगंध पावसाळा
🍁 ~ शितल महादाने पडोळे 🍁