प्रति,
महोदय मेहेरबान…
तुम्ही म्हणे आता,
उभारणार आहात नवीन पुतळा – महाराजांचा.
तो बनावा प्रत्यक्षाप्रमाणेच,
निश्र्चयाचा महामेरू l
बहुत जनांसी आधारु l
अखंड स्थितीचा निर्धारु l
श्रीमंत योगी ll
यासाठी देऊ इच्छितो आम्हीही
आमचं काही योगदान.
आपण फक्त द्यावी परवानगी आम्हास…
देहदान करण्याची.
सोनच होईल अवघ्या देहाचं आमच्या
जर आलंच,
प्रौढ प्रताप पुरंदर महाराजांच्या
पुतळ्याच्या कामी
काही ब्राँझ, पोलाद देहाचं आमच्या…!
आणि करू शकत नसाल
असं काही तर,
अतिशय नम्रपणे सांगावस वाटतं की,
नकाच भानगडीत पडू मग
या पुतळ्या–बितळ्यांच्या.
नाही तरी,
जयंतीला हार घालण्या पुरतंच उरलंय
पुतळ्याचं महत्व आता.
हां, तुमच्या नावाची कोनशीलाच जर
मिरवायची असेल तुम्हाला तर मग बांधा
कमिशनच्या वाढीव चरबीने
गलेलठ्ठ झालेल्या बजेटचे
पूल, रस्ते, इमारती – धापा टाकणारे...!
आणि पुतळेच बनवायचे असतील तुम्हाला,
तर मग बनवा, तुमच्या विरोधकांचे…
… कापडी…!
ते ही बनवतील तुमचे, तसेच.
निषेध-गोंगाटात जोडे मारण्यासाठी,
काळं फासण्यासाठी,
खूपच टोकदार असेल निषेध तर
रॉकेल टाकून जाळण्यासाठी.
त्यात माहीर आहातच तुम्ही… !
आमची विनंती आपण मान्य कराल
अशी आशा करतो.
धन्यवाद !
लिहून देणार
- शहरातील सर्व पुतळे.
- नागेश