बाप फणस काटेरी आत मधळ मधाळ
माय जमीन जमीन बाप आभाळ आभाळ!!
माय सदा सारवन तिचा पदर राखण
दृष्ट लागते बाळाला होई कासावीस मन!!
बाप डोळ्यात रागीट धकधक काळजात
राग डोळ्यात वर वर मऊ जीव आत आत!!
माय गोधडीची उब मायलोण्यातल तूप
बाप दिव्याचा उजेड माय आरतीची धूप!!
माय सावली सावली बाप मिरगाचं पाणी
बाप भजन कीर्तन माय अंगाइची गाणी! !
बाप आधार संस्कार बाप जगण्याची झिज
माय पाऊस पाऊस बाप कडकडणारी विज!!
बाप देव्हाऱ्याचा देव माय देवाच्या साथीने
झाला घरात उजेड बाप नावाच्या ज्योतीने!!
बाप मनातले अश्रू माय सांडलेले मोती
बाप कापूस कापूस माय कापसाची वाती!!
माय बापा विना नाही या जगामध्ये काही
देवघरात घरात, नको हिंडू दिशा दाही!!
बाप विठ्ठल सावळा माय रखुमाई वाणी
किती वरणावी वरणावी माय बापाची कहाणी!!
मनाला भावलेली एक कविता! !