दैनंदिनी
कुणी म्हणती रोजनिशी हिला तर कुणी दैनंदिनी
झरझर उतरती रोज हिच्यावर विचार जे जे मनी
कुणी सांगति गुपित हिला तर कुणी कुटयोजना
निमूट ऐके ती भाबडी करी कुणा ना मना
हितगुज मनीचे ऐकून घेई मैत्रीण ती चांगली
इथली काडी तिथे न लावी करी न कधी चुगली
पिढ्यानपिढ्या अमूल्य माहितीचा जपे ती वारसा
अचूक संदर्भ लावण्यासाठी त्रास न होई फारसा
निशीदिनी लिहिण्याची प्रतिदिनी सवय ही आहे अतिउपयुक्त
खबरदारी मात्र घ्यावी लागे ठेवून ती अतिगुप्त
*****************