❣️घराचं कुलूप.
तिची माहेरी आल्यापासून आई जवळ सतत भुणभुण चालू होती सासूविषयी.नोकरी करत असल्याने नातीसाठी सासुसासर्यांना गाव सोडून इथं पुण्यात राहावं लागतं.घरात वडीलधारे असल्यास खूप मर्यादा येतात कपडे घालण्यावर, हॉटेलिंगवर,हिंडण्या फिरण्यावर म्हणून इतर कुठल्याही आताच्या मॉडर्न मुलीसारखीच ती जरा नाखूष होते.
'आई अश्याच करतात,तश्याच नाही करत.सासऱ्यांचं ह्याव त्याव.... '
शेजारी बसलेली मावशीआजी सगळं ऐकत होती आणि तिचं बोलून झाल्यावर म्हणाली-
"बाली जेव्हा तुझी सासू गावी जाते आणि जेव्हा जेव्हा तुला बाहेर काही कामानिमित्ताने जायचं असल्यास काय करते.?"
"काय ग आजी,अर्थात घराला कुलूप लावून जाते."आजीकडे हसून बघत ती बोलली.
" हेच सांगायचंय बेटा तुला घरातले म्हातारे घराचं कुलूप असतात.हे कुलूप घरी असल्यास कशी पटकन कुठल्याही कामाला सहज बाहेर पडू शकते,लाईट,फॅन ,गॅस,इस्त्री,गिझर काही चालू तर राहिलं नाही ना..दार व्यवस्थित लागलंय ना याचं काही टेन्शन येत नाही हो ना?कारण माहिती असतं आपलं घर सांभाळणार आपलं कुणीतरी घरात आहे.हे कुलूप कितीही दणकट,कुरकुणारं वाटलं तरीही त्याचा आड तुझं घर आणि मुलगी तुझ्यामागे अगदी सुखरूप आहे"
तिच्या डोक्यावरून हात फिरवत आजी बोलली.
तिचे डोळे खाडकन उघडले
"अरेच्चा हो की ते घरात असले की मला माझ्या घराचं मुलीचं ,भाजीपाला,बाजारहाट ह्याचं काहीच टेन्शन नसतं."
खरंय थोडं खाजगीपण गमावतो.थोडी चिडचिड होते पण थोडं ऍडजस्ट केलं तर घर,नोकरी सगळं साध्य होतं.
शेवटी काहीही झालं तरी घराचं कुलूप आपलं असतं आणि त्याची चावी पण आपलीच असते.हो ना?