नियमाचे पालन करू या, कोरोना रोगाला हरवू या.
या वर्षाच्या प्रारंभी भारत देशात प्रवेशित झालेला कोव्हीड - 19 हा विषाणू पाहता पाहता संपूर्ण देश काबीज केला आहे. मोठमोठ्या शहरापासून छोट्या छोट्या गावात कोरोना विषाणू पसरला आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या देशात रोज सरासरी 60 हजार नवे रुग्ण सापडत आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 33 लाख झालेली आहे. याचसोबत मृतांची संख्या 58 हजार पर्यंत झाली आहे. सुरुवातीपासून जनता कर्फ्यु, संचारबंदी आणि लॉकडाऊन जाहीर करून देखील भारतात कोरोनाचा प्रसार का होत आहे, याबाबत ICMR ने दिलेल्या कारणावर प्रत्येक नागरिकांनी चिंतन करणे आवश्यक आहे, असे वाटते.
" भारतात कोरोना व्हायरसचा प्रसार होण्यास काळजी न घेणारे आणि मास्क न घालणारे लोकच जबाबदार आहेत असा इशारा ICMRचे प्रमुख बलराम भार्गव यांनी दिला आहे. विदेशात कोरोना रोगाचा प्रसार कसा झाला होता ? याच्या अनेक व्हिडीओ क्लिप आणि माहिती सोशल मीडियात यापूर्वी व्हायरल झाले आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे. आपण कोणाच्या संपर्कात आलो नाही आणि तोंडावरील मास्क काढलं नाही तर या रोगापासून दूर राहू शकतो. मात्र जनता ही गोष्ट लक्षात न घेता, बेजबाबदारपणे वागत असल्याने हा विषाणू फैलावत आहे. शासनाने लॉकडाऊन का जाहीर केले ? याबाबीविषयी आजही जनता अनभिज्ञ आहे. लॉकडाऊन काळातील टाळ्या वाजविणे यांना लक्षात आहे, दिवे लावणे हे विसरू शकले नाहीत मात्र घरी राहा, सुरक्षित राहा या वाक्याचा खरा अर्थ अजूनही काही लोकांना कळालेले नाही. देशातील सारी जनता जागी व्हावी म्हणून मोबाईलवर जनजागृतीची रिंगटोन लावण्यात आली, लोकांनी त्यातून देखील काहीच बोध घेतले नाही. कोरोना रोगापासून स्वतः दूर राहणे आणि आपल्या कुटुंबाला संरक्षित करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी फक्त तीन गोष्टी पाळलेच पाहिजे.
घरातून बाहेर पडतांना नाक व तोंड झाकून राहील असे मास्क वापरले पाहिजे. मास्क नसेल तर निदान रुमाल तरी तोंडावर बांधायला हवे. गर्दीच्या ठिकाणी प्रत्येकांनी तोंडावर मास्क वापरल्याने कोरोनाचा प्रसार थांबविता येऊ शकते. म्हणून सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी तोंडावर मास्क लावण्याची प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. त्यासाठी कोणी आपल्यावर कायदा करण्याची वेळ येऊ नये. बाहेर गेल्यावर इतर लोकांशी संपर्क करू नये मग ते किती ही जवळची व्यक्ती असेल. हस्तांदोलन करण्यापेक्षा दुरून नमस्कार हीच पद्धत वापरली गेली पाहिजे. शेवटचे म्हणजे बाहेरून घरात प्रवेश करताना आपले हातपाय पाण्याने स्वच्छ धुवून घरात प्रवेश करणे. या छोट्या वाटणाऱ्या पण आपणाला कोरोनापासून संरक्षित करणाऱ्या सवयी निदान वर्षभर तरी विसरून चालणार नाही.
माझ्याकडे ताकत खूप आहे, शरीरात प्रतिकारशक्ती भरपूर आहे, मला कोरोना होणारच नाही अशा कोणत्याही भ्रामक गैरसमजुतीमध्ये राहणाऱ्यांनी वेळीच सावध व्हावे. भारतात मृत्युदर कमी असला आणि रिकव्हरी रेट चांगला असेल तरी कोरोना रोगाला समूळ नष्ट करण्यासाठी प्रत्येकाने जागरूकतेने वागले पाहिजे. अत्यंत आवश्यक आणि महत्वाचे काम पूर्ण करण्यासाठी घराबाहेर पडावे अन्यथा घरातच राहण्याची सवय लावून घ्यावे लागेल. लोकांची गर्दी टाळावे म्हणून सरकारने अजून ही रेल्वे सुरू केली नाही, मंदिराचे दार उघडले नाही, शाळा-विद्यालय चालू केले नाही. जोपर्यंत आपण सर्वजण समजदार नागरिक होऊन वागणार नाही तोपर्यंत हे असेच चालू राहील, कदाचित 2020 हे वर्ष संपूनही जाईल. तेंव्हा आपली थोडीशी चूक आपल्या परिवारातील सदस्यांना संकटात नेऊ शकते, हे लक्षात असू द्यावे. काळजी करण्यापेक्षा काळजी घेतलेली केंव्हाही बरे. म्हणून सरकारकडून तयार करण्यात आलेल्या प्रत्येक नियमाचे आपण पालन करू या आणि कोरोना महामारीला हरवू या. जय हिंद
- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा, धर्माबाद, 9423625769