Marathi Quote in Thought by Na Sa Yeotikar

Thought quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

शाळेविना करमत नाही

प्रिय शाळा,
जून महिना उलटून गेला आणि जुलै महिन्याचे काही दिवस ही सरले तरी पण शाळेची घण घण घंटा वाजली नाही,मुले शाळेत आली नाही त्यामुळे मुलांच्या किलबिलाट कानावर येत नाही. शाळा आणि शाळेचा परिसरात स्मशान शांतता पसरली होती. नव्याने नऊ दिवस या म्हणीप्रमाणे शाळेला सुट्टी मिळाली हे ऐकून सुरुवातीला खूप आनंद झाला. पण तुला खरं सांगतो, तुझ्याशिवाय मला काही करमत नाही. चार भिंतीमध्ये गेल्या चार महिन्यापासून कैद आहे, खूप कंटाळा आलाय, त्या घरातील वातावरणाचा. टीव्ही तरी किती बघावं, मोबाईलवर तरी किती खेळावं, घरातल्या लोकांशी गप्पा तरी किती माराव्यात ? सगळं कसं रुक्ष वाटते. तुझी आज खूप आठवण येत आहे. शाळा आहे म्हटलं की, सकाळी लवकर उठणे, सकाळचे कार्यक्रम दात घासणे, शौचास जाऊन येणे, स्नान करणे, जेवण करणे,पाठीवर दप्तर टाकणे आणि शाळेला जाणे हे जे दररोजचे काम होते त्यात पूर्ण बिघाड झालंय. शाळाच नसल्याने केंव्हाही उठा आणि केंव्हा ही आपले कार्यक्रम करा सर्व काही मनावर त्यामुळे कोणत्याच गोष्टीला ताळमेळ नाही. माणसाच्या जीवनात जे नियमितपणा असावा ते सारे संपले आहे असे वाटते. शाळेच्या वातावरणात आल्यावर जी प्रसन्नता वाटते ते मिळतच नाही. परिपाठामुळे मन ताजेतवाने आणि प्रफुल्लित होते. विविध प्रकारच्या प्रार्थना, गीते, बोधकथा, प्रश्नमंजुषा, इतर माहिती जे मिळते ते कोठून ही मिळत नाही. मित्रांच्या गाठीभेटी तर नाहीतच. नाही तर शाळेचा पहिला दिवस म्हणजे काय उत्कंठा असायची ! नव्या वर्गात प्रवेश, नवीन पुस्तके मिळायची, जुन्या मित्रांसह काही नवीन मित्र भेटायचे, नवीन वर्गशिक्षक, सारे काही नवीन मिळायचं. तुला अजून एक माझ्या मनातलं खरं खरं सांगतो, मला जेवण सुद्धा जात नाही. दुपारच्या वेळी व्हरांड्यात मित्रांसंगे बसून ज्या आनंदात मी जेवत होतो, त्या आनंदात आज जेवणच होत नाही. रांगेत जेवायला बसणे, जेवण्यापूर्वी श्लोक म्हणणे, ताटात काही सोडायचे नाही संपूर्ण खायचे ही सरांची सूचना ऐकून ताटातले सर्व संपविण्याची सवय लागली होती. ती सवय मोडल्यासारखी वाटते. शाळेच्या मैदानाच्या बाजूला असलेल्या दुकानातून चॉकलेट व गोळ्या खाण्याची मजा काही औरच असायची. वर्गात सर शिकविताना आम्ही एकरूप होऊन जायचो. वाचणे आणि लिहिणे आनंदात चालायचं. ऑनलाईनमध्ये ती मजा येतच नाही. पण या कोरोना विषाणूने माझ्या सर्व आनंदावर जणू विरजण टाकले आहे. कोणी कोणाच्या जवळ जायचं नाही, एकमेकांना स्पर्श करायचं नाही, तोंडाला मास्क लावून बोलायचं ह्या साऱ्या गोष्टी शाळेत पालन करणे अशक्य आहे. म्हणूनच पालक मुलांना शाळेत पाठवायला तयार नाहीत अन सरकार जोखीम उठवायला तयार नाहीत. यामुळे गजबजून जाणाऱ्या शाळा आज अगदी शांत दिसत आहेत. लवकरात लवकर शाळा सुरू व्हावे अशी एकच ईच्छा आहे.

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

Marathi Thought by Na Sa Yeotikar : 111499921
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now