प्रिय मोबाईल,
आज असं वाटतंय की तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही. पावलोपावली आज तुझी आवश्यकता भासू लागली. काल बाहेर जातांना चुकून मी तुला सोबत घेतला नव्हता. तो दिवस मला एवढं जड गेलं की काय सांगू. एका एका मिनिटाला माझ्या तळहातात तुला घेण्याची माझी सवय होती, वारंवार माझा हात खिशाकडेच चालला होता. समोरचा कोणी तुला आपल्या हातावर पाहतांना मी मात्र दुरूनच पाहू लागलो तेंव्हा त्याला माझ्याविषयी जरा वेगळाच भाव वाटला असे त्याच्या देहबोलीवरून वाटत होते. माझे मित्र किती व्हाट्सअप्प करत असतील, किती वेळा मला टॅग करून पोस्ट केले असतील. पण हाय रे देवा, आज माझ्याजवळ मोबाईल नाही. माझा बँक देखील याच्यामध्येच, माझे सर्व काही यातच दडवून ठेवलंय. कुणाला फोन करून बोलतो म्हटलं तर एक नंबर तोंडपाठ नाही. निदान घरच्यांचे तरी नंबर पाठ असायला हवे ते ही नाही. तू येण्यापूर्वी फोन नंबर फोनच्या डायरीत लिहून ठेवत असू आणि ती मोठी डायरी फोनजवळ व छोटी डायरी खिशात राहायची. पण आज त्याची काही गरजच उरली नाही. वेळेच्या बाबतीत देखील असंच झालंय. समोरच्या व्यक्तीला किती वाजले असा प्रश्न विचारलं तर तो माझ्याकडे संशयाच्या नजरेने पाहू लागला. पूर्वी टायटनची घड्याळ मनगटावर लावल्याशिवाय लग्नच होत नसत. तीच घड्याळ मग मित्रांमध्ये मिरवायची. घडी घडी मत देखो घडी के तरफ असे म्हटले तरी त्या घड्याळाकडे पाहायचो. पण आज घड्याळ देखील बाजूला पडलंय. तू आलास तसे सारेच हळूहळू बाजूला जाऊन पडत आहेत. घड्याळासाठी रुसणारे जावई आज बघायला मिळत नाहीत. कदाचित तुझ्यासाठी भविष्यात रुसणारे जावई भेटतील अशी आशा करायला हरकत नाही. आज कोणाला बोलता ही येत नव्हते आणि काही करमत नव्हते. एरव्ही तू सोबत असतांना वेळ कसा निघून जात होता तेच कळत नव्हते आज तुझी सोबत नाही तर काही तरी हरवल्यासारखे वाटत आहे. दिवसभर कसे तरी वेळ काढलो. आज तुझे महत्व मला कळाले. माणसाने कोणत्याही गोष्टीची सवय लावून घेऊ नये. सवय नंतर व्यसनात रूपांतर होते. तंबाखू खाणाऱ्याला तंबाखू खाण्यास मिळाले नाही की अस्वस्थता वाढते, दारू पिणाऱ्या व्यक्तीला ठराविक वेळी दारू मिळाली नाही की तो वेड्यासारखा वागतो. तशीच काही अवस्था फिल करत होतो. पण एक गोष्ट चांगली घडत होती. मला कुणाशी बोलायला वेळ खूप मिळत होता. तू सोबत असतांना कोणी मला।बोलत असले तरी माझी मान खालीच असायची आणि तोंडाने नुसता हुं हूं असंच म्हणायचो. पण आज तसा योग आला नाही. दुपारच्या मध्यंतरमध्ये पोटभर जेवल्याचा भास होता. जेवणाचा डबा रोजच्या सारखाच होता, पण आज लक्ष जेवण्याकडे होता जो तू सोबत असतांना राहायचा नाही. लक्षपूर्वक काम करता आले असे अनेक चांगल्या बाबी देखील घडल्या. विशेष म्हणजे आज माझे डोके अजिबात दुखले नाही जेंव्हा मी सायंकाळी घरी परतलो. कधी एकदा तुला पाहतो आणि भेटतो असे माझ्या मनाचे झाले. दिवसभर तू घरी राहिला तरी काही रिकामा नव्हतास. माझ्या मुलांनी गेम खेळून तुला थकविले तर बायकोने यूट्यूब वर रेसिपी पाहून डाटा संपविले. तुझे माझ्या हातात येणे असून नसल्यासारखे झाले. एकदाचा दिवसभराचा आढावा घेतला पण कोणाला रिप्लाय देता आले नाही याचे दुःख मनात सलत होते. माणसाच्या आजपर्यंत तीन मूलभूत गरजा होत्या अन्न, वस्त्र आणि निवारा त्यात आता तुझी भर पडली. आपला हा संबंध पुढे कधी ही तुटणार नाही याची मला खात्री आहे.
आपलाच, मोबाईल वेडा
- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद जि. नांदेड, 9423625769