काव्योत्सव २.०
भावनाप्रधान
एक क्षण
जास्त नाही मागणं माझं
मला फक्त एक क्षण जगायचंय…..
एक क्षण तुझा माझा
पहिल्या पावसात भिजलेला
लाटांच्या हिंदोळ्यावर
अलगदपणे निजलेला
एक क्षण तुझा माझा
फुलपाखरांच्या पंखांचा
धरू पहाता उरलेल्या
बोटांवरच्या रंगांचा
एक क्षण तुझामाझा
रातराणीच्या फुलातला
दोघांच्याही नकळत
दरवळणाऱ्या मनातला
त्या एक क्षणासाठी
सारं आयुष्य त्यागायचंय….
जास्त नाही मागणं माझं
मला फक्त एक क्षण जगायचंय…..
तुझामाझा श्वास एक
तुझामाझा ध्यास एक
तुझीमाझी स्वप्नचं काय
तुझामाझा भास एक
तू नेहमीच होतास सोबत
हातहाती घट्ट धरुन
तरीही तुझामाझा तो क्षण
काळाच्या ओघात गेला विरुन
तुझ्यामाझ्या क्षणासाठी तरी
एकदा हे कालचक्र थांबवायचंय…..
जास्त नाही मागणं माझं
मला फक्त एक क्षण जगायचंय…..
कधी क्षितिजावर दिसलेला
कधी चांदण्यांमधून हसलेला
तुझ्यामाझ्या हक्काचा
पण जवळ नसलेला
मनातल्या मनात कितीदातरी
कोरीव अक्षरात गिरवला होता
तुझ्यामाझ्याकडूनच
तो कधी हरवला होता
हरवलेल्या त्या क्षणात
अख्ख आयुष्य कोरायचंय……
जास्त नाही मागणं माझं
मला फक्त एक क्षण जगायचंय…..
कारण नसतानाही जेंव्हा
आपण खूपखूप भांडत राहिलो
तुझेमाझे वेगवेगळे
जुनेच हिशेब मांडत राहिलो
हिशेब चुकते करता करता
एक हातचा राहून गेला
तुझामाझा तो क्षण
डोळ्यावाटे वाहून गेला
ओघळणाऱ्या त्या क्षणाला
अलगद ओंजळीत टिपायचंय
जास्त नाही मागणं माझं
मला फक्त एक क्षण जगायचंय…..
मला फक्त,
एक क्षण जगायचंय……..
- मीनल